आपल्या सहजसुंदर अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात घर केलेले आजच्या काळातले दोन लोकप्रिय कलाकार म्हणजे आशुतोष गोखले आणि अनघा अतुल.
- आशुतोष गोखले, अनघा अतुल
आपल्या सहजसुंदर अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात घर केलेले आजच्या काळातले दोन लोकप्रिय कलाकार म्हणजे आशुतोष गोखले आणि अनघा अतुल. हे दोघंही ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून आपल्या भेटीला येतात. त्यांची भेट २०१९मध्ये याच मालिकेच्या सेटवर झाली व काही दिवसांतच दोघं एकमेकांचे खास मित्र-मैत्रीण बनले.
अनघानं सांगितलं, ‘आशुतोषला भेटण्याआधी मी त्याची कामं पाहिली होती. आमच्या काही कॉमन फ्रेंड्सकडून मी आशुतोषबद्दल ऐकून होते. त्यामुळं तो कसा आहे, हे मला थोडं माहीत होतं. ‘रंग माझा वेगळा’ ही माझी पहिलीच मालिका आणि आमच्या पहिल्याच भेटीत त्यानं मला कम्फर्टेबल केलं. पुढं महिन्याभरातच आमच्यात खूप छान मैत्री झाली. त्याचा स्वभाव खूप मनमिळाऊ आहे. तो आपणहून अनोळख्या व्यक्तीशी बोलायला जात नाही; पण ओळख झाल्यावर तो त्या व्यक्तीला पटकन आपलंस करतो, हक्कानं त्याच्या मनातलं स्पष्टपणे सांगतो. कुठल्याही विषयावर संवाद साधण्याची कला त्याच्यात आहे. विविध विषयांचं ज्ञान त्याला आहे.
त्यामुळं आम्ही एकमेकांशी भरपूर गप्पा मारतो आणि विचारांची देवाण-घेवाण करतो. एक सहकलाकर म्हणूनही तो फार समजूतदार आहे. आमच्या वाट्याला एकत्र सिन्स कमी आले, मात्र त्यातही आम्ही प्रत्येक सीन धमाल करीत केला. मी त्याला माझ्या कामाबद्दल विचारल्यावर तो मला महत्त्वाचे सल्ले देतो. काय छान झालं किंवा काय अजून छान होऊ शकतं, हे अगदी स्पष्टपणे सांगतो. मला शांत राहायला आवडतं, पण आशुतोषमुळं मी व्यक्त व्हायला शिकले. त्याचबरोबर त्यानं मला वाचनाची आवड लावली. तो उत्कृष्ट अभिनेता आहे. त्यानं आतापर्यंत साकारलेली प्रत्येक भूमिका त्याच्या आधीच्या भूमिकेपेक्षा वेगळी होती. त्याची सगळीच कामं मला आवडली, पण ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकातलं काम मला विशेष आवडलं.’’
आशुतोष अनघाबद्दल बोलताना म्हणाला, ‘अनघाची कोणाबरोबरही पटकन आणि छान मैत्री होते. ती फार सहज नवीन माणसांमध्ये सामावते. बोलताना समोरच्या व्यक्तीला कम्फर्टेबल करण्याचं श्रेय तिला जातं. कदाचित ती त्या व्यक्तीशी गप्पा मारू शकणार नाही, पण अनघाकडं त्या व्यक्तीला विचारायला प्रश्न असतात. तिला कायम नवनवीन गोष्टी जाणून घ्यायच्या असतात, विविध विषयांवरची माहिती मिळवायची असते. संवाद घडताना एखाद्या व्यक्तीनं बोलणं जितकं महत्त्वाचं असतं, तितकंच ते दुसऱ्यानं ऐकून घेणंही. अनघा समोरचा माणूस बोलत असलेली प्रत्येक गोष्ट मनापासून ऐकते, हा तिच्यातला एक खूप चांगला गुण आहे. ती समजूतदार आणि मॅच्युअर व त्याचबरोबर अल्लडही आहे
सेटपासून माझं घर बरंच लांब असल्यानं सुरुवातीचे काही दिवस मी तिच्याकडं राहायचो आणि तीही न कंटाळता व आपलेपणानं माझ्यासाठी सगळं करायची. कामाच्या बाबतीतही ती अतिशय प्रामाणिक आहे. ‘अनन्या’ या नाटकातलं तिचं काम मला आवडलं, तसंच आमच्या ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतलं तिचं कामही मला आवडतं. तिच्यामुळं मी अनेक नवीन गोष्टी करू लागलो. अनघाशी मैत्री होण्यापूर्वी काय कपडे घातले पाहिजेत याचा मी फारसा विचार करायचो नाही, स्वतःसाठी कपडे खरेदी करायला अजिबात आवडायचे नाहीत. पण अनघामुळे मी स्वतःच्या ड्रेसिंग सेन्सकडं लक्ष देऊ लागलो, स्वतःसाठी कपडे खरेदी करण्यात रस घेऊ लागलो. तिनं कपड्यांच्या बाबतीत मला अपडेट केलं. आता मला जेवण आणि विविध पदार्थ बनवायला शिकण्यातही रस वाटू लागला आहे. आम्ही कोणत्याही विषयावर एकमेकांशी कधीही बोलू शकतो, इतके आता आम्ही एकमेकांच्या आयुष्यातले हक्काचे मित्र-मैत्रीण झालो आहोत.’’
(शब्दांकन - राजसी वैद्य)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.