दिग्दर्शक आणि अभिनेता यांच्यात एक अनोखं नातं असतं. त्यांची केमिस्ट्री चित्रपटाच्या रूपातून प्रेक्षकांसमोर येते. अशीच दिग्दर्शक-अभिनेत्याची सुपरहिट जोडी म्हणजे अभिजित देशपांडे आणि सुबोध भावे.
- अभिजित देशपांडे, सुबोध भावे
दिग्दर्शक आणि अभिनेता यांच्यात एक अनोखं नातं असतं. त्यांची केमिस्ट्री चित्रपटाच्या रूपातून प्रेक्षकांसमोर येते. अशीच दिग्दर्शक-अभिनेत्याची सुपरहिट जोडी म्हणजे अभिजित देशपांडे आणि सुबोध भावे. ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या तुफान गाजलेल्या चित्रपटानंतर आता ते ‘हर हर महादेव’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. सुबोध आणि अभिजित यांची पहिली भेट ही ''आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर'' या चित्रपटाच्या निमित्तानं झाली होती.
अभिजित म्हणाला, ‘आमची पहिली भेट चुकामूकच होती. त्याला मी एडिटर अभिजित देशपांडे वाटलो आणि मला पाहिल्यावर त्याची मला ओळखण्यात थोडी चूक झाली आहे हे त्याला जाणवलं. पण मला दुखवायचं नाही म्हणून त्यानं अगदी भाबडेपणानं ते सावरून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच त्याची निरागसता आणि समोरच्याला न दुखावण्याची वृत्ती मला भावली. आम्ही ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’चं शूटिंग सुरू करणार होतो, तेव्हा मला सुबोधबरोबर काम करण्याचं थोडं दडपण आलं होतं. कारण त्यानं आधी ‘कट्यार काळजात घुसली’सारखा अप्रतिम चित्रपट दिग्दर्शित केला होता आणि'...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा माझा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट. मात्र, सुबोधच्या स्वभावामुळं ते दडपण फार काळ टिकलं नाही. सुबोधची भूमिका असो, त्याच्या आजूबाजूची माणसं असो वा इतर गोष्टी; सुबोधची सगळ्यांकडं बघण्याची संवेदनशीलता शिकण्यासारखी आहे. ती संवेदनशीलता त्याच्या कामात दिसून येते. सेटवर एकत्र काम करताना आमच्यात अनेकदा मतभेद होतात, पण त्यांचा शेवट चित्रपटाच्या भल्याचाच असतो. सगळ्यांमध्ये मिळून मिसळून तो काम करतो आणि अभिनेता म्हणून तो उत्तमच आहे. ‘हर हर महादेव’ या चित्रपटात त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका उत्कृष्ट साकारली आहे. यात बऱ्याचदा त्याला छोट्या सीनमध्ये अनेक भावना दाखवायच्या होत्या; पण त्यानं ते छान साकारलं.’
सुबोधनं सांगितलं, ‘अभिजित प्रचंड हुशार लेखक आहे, अत्यंत मनापासून चित्रपटावर प्रेम करणारा कलाकार आहे, तो अतिशय उत्तम प्रकारे गोष्ट सांगतो. त्याची जिद्द आणि चित्रपटांवर असलेलं प्रेम त्याच्या दोन्ही चित्रपटांचा भाग असल्याचं मी जवळून पाहिलं आहे. कामाच्या बाबतीत तो खूप हट्टी आहे. त्याला जसं हवं तसंच तो करतो. लिहिताना त्याच्या डोक्यात जे आलेलं असतं, तसंच त्याला पडद्यावर हवं असतं. मात्र, तितक्याच प्रामाणिकपणे ज्यांच्यावर तो चित्रपट बनवत आहे त्या व्यक्तीरेखांवर तो खूप प्रेम करतो आणि जेव्हा तो त्यांची गोष्ट सांगत असतो किंवा सेटवर एखादा सीन समजावत असतो तेव्हा त्याच्या कृतीतून आपल्याला जाणवतं की हा दिवस रात्र फक्त त्या व्यक्तीरेखांचा आणि गोष्टीचाच विचार करतो. तो त्या कथेचा ध्यास घेतो. ‘हर हर महादेव’च्या पोस्ट प्रोडक्शनचं काम वर्षभर करतोय, त्यासाठी असंख्य जागरणं त्यानं केली आहेत, हा चित्रपट तयार करताना अनेक अडचणी आल्या आहेत; पण अभिजितची चित्रपटावरची निष्ठा कणभरही कमी झालेली नाही.’
‘हर हर महादेव’ हा चित्रपट यंदाच्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याबद्दल अभिजित देशपांडे म्हणाला, ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांचं नातं आणि त्यांचा इतिहास हा तीन तासात दाखवणं आव्हान होतं.’ सुबोधनं सांगितलं, ‘शूटिंग सुरू होताना माझा ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकाचा परदेश दौरा होता. त्यानंतर लॉकडाऊन लागल्यानं शूटिंग 6-7 महिने पुढं गेलं. या चित्रपटात मला महाराजांची भूमिका साकारायला मिळाल्यानं त्यांचं दर्शन घडलं, असंच मला वाटतं.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.