Andhadhun Movie Review
Andhadhun Movie Review  
मनोरंजन

अंदाधुन : ससा आणि कासवाची गुंगवणारी शर्यत 

मंदार कुलकर्णी

'अंदाधुन' हा चित्रपट थ्रिलर असला, तरी सस्पेन्स थ्रिलर नाही, हे पहिल्यांदाच सांगायला पाहिजे. 'कहानी', 'रेस' किंवा 'दृश्‍यम'सारखा शेवटी एक अचाट धक्का त्यात नाही. मात्र, त्यामुळे काही फरक पडत नाही. 'थ्रिलर'चा बादशहा श्रीराम राघवन शेवटी एखादा धक्का देण्यापेक्षा चित्रपटभर असे धक्के पेरत राहतो आणि प्रेक्षकाला गुंगवत राहतो.

'अंदाधुन' ही अगम्य, अशक्‍य आणि अतर्क्‍य घटनांची एक मालिकाच आहे. चित्रपट या माध्यमावर कमालीची पकड असलेला राघवन या घटनांशी, पात्रांच्या मानसिकतेशी आणि प्रतीकांशी खेळत राहतो. ही धक्‍क्‍यांची मालिका 'जॉनी गद्दार'इतकी खमंग नाही हेही खरं असलं, तरी एकामागोमाग एका अशा वेगनं घडणाऱ्या घटनांची गुंफण प्रेक्षकांना अक्षरशः झिंगवून टाकते. एकीकडं प्रेक्षकांना धक्के देत असताना राघवन त्यांच्यापुढं एक अत्यंत अनोळखी असं जगही साकारत जातो आणि गोडगुलाबी मुखवट्यांमागचा काळा रंग दाखवत राहतो. हे एकेक मुखवटे टराटरा फाटताना रंगणारा पाठशिवणीचा खेळ हेच 'अंदाधुन'चं वैशिष्ट्य. 

'अंदाधुन' ही खरं तर ससा आणि कासवाची एक शर्यत आहे. मात्र, ही शर्यत एकरेषीय नाही. ती विलक्षण अडथळ्यांची आहे, ससा आणि कासवाची एकमेकांवर कुरघोडी करण्याची आहे आणि त्यांच्या मनाच्याही खेळाची आहे. चित्रपटाची सुरवात होते तेव्हा आपल्याला दिसतो एक अंध पियानोवादक आकाश (आयुष्मान खुराना). पुण्यात आलेल्या आकाशची सोफीशी अक्षरशः 'अपघाता'नं ओळख होते. सोफीच्या वडिलांच्या हॉटेलमध्ये पियानो वाजवायला लागतो. तिथंच त्याला भेटतात जुन्या जमान्यातले दिग्दर्शक प्रमोद सिन्हा (अनिल धवन). अनिल धवन यांची तरुण पत्नी सिमी (तब्बू) अतिशय उत्साही आणि चाणाक्ष आहे. सिन्हा त्याच्या घरी पियानो वाजवायला येण्याचं आमंत्रण देतात आणि मग पुढं काय काय घडत जातं त्याचा थक्क आणि अचंबित करणारा प्रवास राघवन मांडतात. 
एखाद्या शांत तळ्यात अचानक दगड पडल्यावर तरंग उमटतात आणि नंतर उमटतच राहतात, तशा प्रकारची चित्रपटाची मांडणी आहे. पहिला जवळजवळ अर्धा तास राघवन चित्रपट मुद्दामच शांत ठेवतात. मात्र, एका विशिष्ट टप्प्यानंतर हळूहळू ते ज्या काही झापडा द्यायला लागतात, त्या प्रत्यक्षच अनुभवण्यासारख्या आहेत. 'लाफिंग बुद्धा', 'अंध ससा' अशा एकेक प्रतिमांचा त्यांनी केलेला वापर उत्तम. हा चित्रपट एक सेकंदभरही दिग्दर्शकाच्या हातातून निसटत नाही. त्यामुळं तो करत असलेला खेळ आपण थक्क होऊन बघत राहतो. कलाकारांची अचूक निवड हे राघवन यांचं वैशिष्ट्य. मध्यमवर्गीय जाणिवांशी नातं असलेला आयुष्मान, थ्रिलरशी नव्यानं नातं तयार करत असलेली तब्बू, किंवा आपल्या 'सैराट' फेम छाया कदम अशा कलाकारांची निवड चित्रपटात आणखी मजा आणते. चित्रपटाचं नव्वद टक्के चित्रीकरण पुण्यात झालं आहे ही एक जादाची माहिती. 
आयुष्मानला चित्रपटात त्याला अनेक बारीकसारीक गोष्टी दाखवायला मिळाल्या आहेत. त्याच्या चेहऱ्यात एक मुळातच डॅंबिसपणा आहे. राघवन त्याचा पुरेपूर वापर करून घेतात. मात्र, या चित्रपटात खरी बाजी मारते ती तब्बू. पहिला अर्धा-पाऊण तास तब्बूला फार काही काम नाही. मात्र, नंतर काही घटना घडल्यानंतर ती संपूर्ण चित्रपट अक्षरशः ताब्यात घेते.

काही घटना घडल्यानंतर तब्बूच्या चेहऱ्यावरच्या प्रत्येक प्रतिक्रियांकडं प्रेक्षक लक्ष देऊन बघायला लागतात इतकं ती सुरेख भावदर्शन करते. ज्येष्ठ अभिनेते अनिल धवन यांचे जुने चित्रपट, त्यांचं व्यक्तिमत्त्व यांचा वापर राघवन यांनी नजाकतीनं करून घेतला आहे. राधिका आपटे परफेक्‍ट. नायकाला स्कूटरवरून घेऊन जाण्याचं काम याही चित्रपटात तिच्या वाट्याला आलं आहे. छाया कदम अतिशय छोट्या भूमिकेत धमाल करतात. संगीतकार अमित त्रिवेदी यांना खरं तर खूप चांगली संधी होती, मात्र एक-दोन गाणी सोडली तर ती चित्रपटाला तितकी पूरक ठरत नाहीत. शेवटचं गाणं मात्र उत्तम. डॅनिएल बी. जॉर्ज यांच्या पार्श्‍वसंगीताचा विशेष उल्लेख करावा लागेल. पियानोचा वापर जबरदस्त. एकुणात, ससा आणि कासवाची ही शर्यत अतिशय रंगतदार आणि रंजक आहे. या शर्यतीत कोण जिंकतो वगैरे प्रश्‍न खरं फिजूल आहेत. आपण फक्त त्या शर्यतीचा प्रवासच एंजॉय करायचा. या माध्यमाचा आनंद घ्यायला तितका 'डोळस'पणा आपण दाखवायलाच पाहिजे, बरोबर ना? 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT