FILM REVIEW: CHI VA CHI SAU KA
FILM REVIEW: CHI VA CHI SAU KA 
मनोरंजन

वाचा गंमतीशीर लग्नसोहळाचे चित्रपट परीक्षण! (चि. व चि. सौ. कां.)

संतोष भिंगार्डे

'हरिश्‍चंद्राची फॅक्‍टरी' आणि "एलिझाबेथ एकादशी' या दोन्ही यशस्वी चित्रपटानंतर दिग्दर्शक परेश मोकाशीची तिसरी कलाकृती म्हणजे "चि. व चि. सौ. कां' हा चित्रपट. मुळात लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना. कधी कुणी ऍरेंज मॅरेज करतं; तर कधी कुणी लव्ह मॅरेज; मात्र यातील सगळीच लग्नं टिकतात असं नाही. उलट अलीकडे तर घटस्फोटाचं प्रमाण वाढत चाललंय. आपला जोडीदार निवडण्याबाबत हल्लीची पिढी सजग आणि जागरूक आहे.

आपली ती किंवा आपला तो कसा असावा? याचे निश्‍चित असे ठोकताळे हल्लीच्या पिढीने बांधलेले असतात. "चि. व चि. सौ. कां' या चित्रपटामध्ये याच गोष्टीवर प्रकाश टाकण्यात आलाय. सत्यप्रकाश (ललित प्रभाकर) आणि सावित्रीची (मृण्मयी गोडबोले) ही कथा आहे. सत्यप्रकाश हा पर्यावरणप्रेमी असतो. पाण्याचा कमीत कमी वापर कसा होईल? याकडे त्याचा कटाक्ष असतो; तर सावित्री ही प्राणिप्रेमी असते. ती प्राण्यांची डॉक्‍टर असते. तिला मांसाहार केलेला अजिबात पसंत नसतो. त्यामुळे रिक्षात बसतानाही ती रिक्षावाल्याला शाकाहारी की मांसाहारी असं विचारते. रिक्षावाला शाकाहारी असला की, मगच ती त्या रिक्षात बसते. अशी ही भिन्न प्रवृत्तीची दोघं असतात. त्यांच्या घरची मंडळी त्यांचं लग्न करण्याचा विचार करीत असतात. 

एके दिवशी सावित्रीच्या घरी सत्यप्रकाश आणि त्याची आई (सुप्रिया पाठारे) व वडील (प्रदीप जोशी) येतात. त्या वेळी सावित्री एक वेगळीच अट आपल्या पालकांसमोर ठेवते. ती अट असते एकमेकांना समजून घेतल्यानंतरच लग्न करण्याची. अर्थात, लिव्ह-इन-रिलेशनशिपची. या गोष्टीला सावित्रीच्या घरच्या मंडळींचा सुरुवातीला विरोध असतो; परंतु नंतर तिचे आई-वडील तयार होतात. सत्यप्रकाशही हा नवीन प्रयोग करायला काय हरकत आहे? या मताचा असतो. मग काय... सावित्री सत्यप्रकाशच्या घरी येते आणि त्यानंतर एकच धमाल उडते. सत्यप्रकाश आणि सावित्री यांचे लग्न जुळते का...? ते एकत्र राहात असताना त्यांच्यामध्ये काय काय गमतीजमती घडतात...

दोन्ही घरची मंडळी काय निर्णय घेतात... वगैरे गोष्टींचा उलगडा चित्रपटात होतो. 
दिग्दर्शक परेश मोकाशीने एक नवीन संकल्पना घेऊन चित्रपट बनविला आहे. केवळ मनोरंजन न करता सामाजिक संदेशही देण्याचा त्याने प्रयत्न केलाय. त्याबद्दल त्याचं कौतुक करावंच लागेल. दोन भिन्न आचार - विचारांच्या व्यक्ती एकत्र आल्या की काय गंमत घडते? हे त्याने चांगलंच मांडलंय. कुटुंबा-कुटुंबांमध्ये असणारे अंतर्गत हेवेदावे आणि रुसवे-फुगवे दिग्दर्शकाने छान टिपलेत. विशेष म्हणजे, दोन्ही कुटुंबांतील गमतीजमती पाहताना एकच धमाल येते. दिग्दर्शकाने कथेची मांडणी उत्तम केली आहे. लेखिका मधुगंधा कुलकर्णीने कथेद्वारे वेगळा विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

चित्रपट पूर्वार्धात अगदी वेगाने सरकतो. भारत गणेशपुरेच्या सूत्रसंचालनाने त्याला वेगळाच साज चढलेला आहे. ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले ही एक नवीन जोडी मराठी सिनेसृष्टीला या निमित्ताने मिळालीय. या दोन्ही कलाकारांनी छान अभिनय केला आहे. मृण्मयीची भूमिका काहीशी रफटफ आहे. चित्रपटातील तिच्या वागण्या-बोलण्यात कमालीचा आत्मविश्‍वास जाणवतो. तिने सावित्रीची भूमिका साकारताना कोणतीही कसर भूमिकेत राहणार नाही याची पुरेपूर काळजी घेतलीय.

अन्य कलाकारांनीही चोख कामगिरी बजावली आहे. ज्योती सुभाष यांनी साकारलेली आजीची भूमिका भाव खाऊन जाते. तरीही विशेष कौतुक करावं लागेल ते बालकलाकार पुष्कर लोणारकरचे आणि शर्मिष्ठा राऊतचे. या दोन कलाकारांमुळे हा चित्रपट हसतखेळत पुढे सरकतो. सुधीर पळसाने यांची सिनेमॅटोग्राफीही उत्तम आहे; मात्र क्‍लायमॅक्‍सच्या अगोदर हा चित्रपट काहीसा भरकटलेला वाटतो. आपण जणू काही नाटक पाहात आहोत की काय असा भास होतो. चित्रपटातील संवाद खुसखुशीत असले, तरी संगीताच्या पातळीवर चित्रपट निराशा करतो. तरीही एक गमतीशीर कौटुंबिक लग्नसोहळा म्हणून या चित्रपटाकडे नक्कीच पाहता येईल. लग्न, मनोरंजन आणि सामाजिक संदेश असा तिहेरी योग या चित्रपटात आलेला आहे. हा एक नर्मविनोदी चित्रपट आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; एरर 502 काय आहे?

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: शिवम दुबे गोलंदाजीला आला अन् चेन्नईला विकेटही मिळवून दिली; बेअरस्टोचं अर्धशतक हुकलं

SCROLL FOR NEXT