hemangi kavi and sandip dhumal
hemangi kavi and sandip dhumal sakal
मनोरंजन

लग्नाची गोष्ट : साध्या-छोटी गोष्टींमध्येच आनंद

सकाळ वृत्तसेवा

- हेमांगी कवी, संदीप धुमाळ

कधी विनोदी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणणारी, तर कधी भावनिक भूमिकांमधून प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणणारी अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी. एक चतुरस्र अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. तिच्या पतीचं नाव संदीप धुमाळ. संदीप सिनेमॅटोग्राफर आहे. या दोघांचं लव्ह मॅरेज. एका चित्रपटाच्या सेटवर त्यांची ओळख झाली. आता त्यांच्या लग्नाला १३ वर्षं झाली आहेत.

हेमांगीने सांगितलं, ‘संदीप हा अत्यंत मितभाषी आहे. यासोबतच तो खूप शांत आणि संयमीही आहे. आतापर्यंत मी कधीही त्याला चिडलेलं पाहिलेलं नाहीये. तो खूप समजूतदार आहे, मला तो खूप समजून घेतो. त्यामानानं मी तापट आहे. मला राग आला की मी तो व्यक्त करते. असे आमचे स्वभाव एकमेकांच्या विरुद्ध असल्यानं आम्ही आमचं एकत्र आयुष्य खूप छान बॅलन्स करू शकतो. इतकी वर्षं त्याच्याबरोबर राहून माझा तापटपणा बराच कमी झाला आहे.

मीही शांतपणे गोष्टी हाताळू लागले आहे. आम्ही एकाच क्षेत्रात काम करत असल्यानं आम्ही कामाच्याही बाबतीत एकमेकांना उत्तमरीत्या समजून घेऊ शकतो. आम्हा दोघांनाही आपल्याजवळ असलेल्या कोणत्याही गोष्टीचा देखावा करायला आवडत नाही. किंवा आमच्या दोघांच्या आवडीनिवडीही साध्या आहेत. त्यामुळं आम्हा दोघांनाही एकमेकांना या बाबतीत सांभाळून घेण्याची गरज लागत नाही. कारण मला जे आवडतं तेच त्यालाही आवडतं. रंग, कपडे, जेवण, फिरायला जाण्याची ठिकाणं या सगळ्या आमच्या सारख्याच आवडीनिवडी आहेत. कामाच्या बाबतीत आतापर्यंत वेळोवेळी त्याने मला पाठिंबा दिलेला आहे, मला प्रोत्साहन दिलं आहे. या त्याच्या सगळ्याच गोष्टी मला खूप आवडतात.’’

हेमांगीबद्दल बोलताना संदीप म्हणाला, ‘‘हेमांगीचा स्वभाव हा अत्यंत मनमिळाऊ आणि गप्पिष्ट आहे. तिला लोकांशी संवाद साधायला खूप आवडतं आणि ती खूप चांगल्या प्रकारे सगळ्या वयोगटातल्या माणसांशी संवाद साधू शकते. ती सगळ्यांमध्ये स्वतःला छान सामावून घेते. तिला थोडा पटकन राग येतो; पण राग येण्यामागचं कारणही तितकंच मोठं असतं. ती कायम चुकीच्या गोष्टीविरुद्ध आवाज उठवते. एखादी चुकीची गोष्ट घडत असल्यास ती कधीच त्याचं समर्थन करत नाही. हेमांगी प्रत्येक गोष्टीचा चहूबाजूंनी विचार करून निर्णय घेते आणि हेच तिच्याकडून मी शिकत आलो आहे. या बाबतीत तिनं मला योग्य मार्गदर्शन करून समोरच्या गोष्टीकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलला आहे, हा एक मोठा बदल तिच्या माझ्या आयुष्यात येण्यानं झाला. तसंच मीही आता थोडासा चिडू लागलो आहे. आम्ही दोघंही फूडी आहोत, दोघंही उत्कृष्ट स्वयंपाक करतो. आम्हा दोघांनाही वेगवेगळे पदार्थ बनवणं, अॅक्शन फिल्म्स किंवा हिंदीमध्ये डब केलेले साऊथ चित्रपट बघणं, फिरायला जाणं फार आवडतं.’’

हेमांगीने साकारलेल्या सगळयाच भूमिका संदीपला आवडल्या आहेत. तर लवकरच हेमांगी ‘पांडू’ या चित्रपटातून एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याबाबात बोलताना ती म्हणाली, ‘‘हा माझ्या मित्रांचा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने हा माझा खूप जुना मित्र आहे. तसंच कुशल बद्रीके आणि मी ‘फू बाई फू’पासून एकत्र काम करत आलो आहोत. त्यामुळं त्याच्या बायकोची भूमिका करताना मला नवीन काहीच वाटलं नाही. म्हणूनच या चित्रपटात काम करण्याचा अनुभव फारच मजेदार होता. सेटवर अगदी घरचं वातावरण होतं. ठाणे हे माझं माहेर आणि या चित्रपटाचं शूटिंग तिथेच झालं आहे. ही भूमिका साकारण्यासाठी मला वेगळे असे काही कष्ट घ्यावे लागले नाहीत, ना कोणता वेगळा अभ्यास करावा लागला. कारण मी जशी आहे, मी माझ्या नवऱ्याशी जसं बोलेन तसंच मला या चित्रपटात बोलायचं आहे. फक्त संदीप हा कुशल या चित्रपटात जशी भूमिका साकारत तसा अजिबात नाहीये. आम्ही सगळ्यांनी खूप मनापासून काम केलं आहे, आम्ही सगळ्यांनी या चित्रपटाची संपूर्ण प्रोसेस खूप एन्जॉय केली आहे. त्यामुळे प्रेक्षकांनाही पडद्यावर बघताना तितकीच मजा येईल याची मला खात्री आहे.’’

(शब्दांकन : राजसी वैद्य)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT