जग्गा जासूस या चित्रपटामध्ये कॅतरिना कैफ व रणबीर कपूर.
जग्गा जासूस या चित्रपटामध्ये कॅतरिना कैफ व रणबीर कपूर. 
मनोरंजन

मांडणी आणि सादरीकरणाची कमाल!

महेश बर्दापूरकर

रणबीर कपूरच्या अष्टपैलू अभिनयानं नटलेला ‘जग्गा जासूस’ हा चित्रपट भन्नाट अनुभव आहे. दिग्दर्शक अनुराग बसूनं ‘बर्फी’नंतर आपली गोष्ट सांगण्याची जबरदस्त शैली इथंही वापरली आहे. एका अनाथ, बोलताना अडखळणाऱ्या मुलाची वेगानं फिरवणारी गोष्ट सांगताना संगीत आणि कॅमेरा छान वापर करीत दिग्दर्शकानं अविस्मरणीय अनुभव दिला आहे. मध्यंतरापर्यंत मनोरंजनाचा सर्वोच्च बिंदू गाठणारा हा चित्रपट त्यानंतर थोडा संथ झाला असली, तरी हा ‘रोलर कोस्टर’पद्धतीचा अनुभव एकदा घ्यावा असाच आहे.

‘जग्गा जासूस’ची कथा सुरू होते १९९०च्या दशकात. भारतात घडलेल्या पुरुलिया शस्त्रास्त्र प्रकरणाची आठवण करून देत गोष्ट पुढे सरकते. याच काळात जन्मलेल्या जग्गा या अनाथ, आत्मविश्‍वास गमावलेल्या, अडखळत बोलणाऱ्या छोट्या मुलाची ओळख आपल्याला होते. एका रुग्णालयातच राहणाऱ्या या छोट्या मुलाला टुटी फुटी (शाश्‍वत चटर्जी) (कहानी या चित्रपटातील थंड डोक्‍यानं खून करणारा बाबू.) भेटतो व त्याच्या आयुष्यात मोठा फरक पडतो. समस्येच्या मुळापर्यंत जाण्याची, तिचा पाठपुरावा करण्याची व मेंदूचा उजवा भाग वापरत आत्मविश्‍वास मिळवण्याची क्‍लृप्ती तो जग्गा शिकवतो व गायब होतो. मोठा झालेला व पूर्ण बदललेला जग्गा (रणबीर कपूर) आता होस्टेलमध्ये राहू लागतो व बुद्धीच्या जोरावर छोट्या-मोठ्या प्रकरणांचा छडा लावतो. पत्रकार श्रुती (कॅतरिना कैफ) अशाच एका प्रकरणातून त्याच्या आयुष्यात येते. टुटी फुटीचं गायब होणं आणि पुरुलिया प्रकरणाचा संबंध असल्याचं जग्गाच्या लक्षात येतं आणि जगभरात शस्त्रास्त्रांची तस्करी करणाऱ्यांचा पाठलाग जग्गा सुरू करतो. भ्रष्ट पोलिस अधिकारी (सौरभ शुक्‍ला) जग्गाच्या मार्गात अडथळे निर्माण करतो. बशीर ॲलेक्‍झांडर या तस्कराच्या तळावर जग्गा जाऊन पोचतो...

चित्रपटाच्या कथेत वेगळेपण आहेच, त्याचबरोबर तिचं सादरीकरण आजपर्यंतच्या हिंदी चित्रपटांत अभावानंच दिसलं आहे. या प्रयोगशिलतेसाठी दिग्दर्शकाला शंभर टक्के गुण द्यावे लागतील. कथेच्या सुरवातीला जग्गानं लावलेल्या दोन हत्याकांडांचा छडा, त्यांचं सादरीकरण आणि वेग यांमुळं प्रेक्षक खिळून राहतो. मध्यंतरानंतर जग्गा मुख्य प्रकरणाच्या मागं लागतो व विविध देशांत त्याचा प्रवास सुरू होतो. हा भाग तुलनेनं संथ आणि लांबला असला, तरी तो रटाळ कुठंच होत नाही. कमीत कमी संवाद, जोरदार ॲक्‍शन आणि प्रासंगिक विनोद यांमुळं धमाल येते. चित्रपटाचा शेवट थोडा उरकल्यासारखा वाटतो आणि त्यात दुसऱ्या भागाची बीजं पेरून ठेवल्याचं स्पष्ट दिसतं. रवी बर्मन यांचा कॅमेरा, प्रीतमचं संगीत, अमिताभ भट्टाचार्यची गीतं, मोरक्कोमधील देखणी लोकेशन्स चित्रपटाला अधिक मनोरंजक बनवतात.  

रणबीर कपूरचा अवर्णनीय अभिनय ही चित्रपटाची मोठी जमेची बाजू. फक्त गाण्यातच नीट बोलू शकणारा; अन्यथा अडखणारा, खटपट्या, प्रत्येक प्रकरणाच्या मुळापर्यंत जाणारा जग्गा त्यानं फारच छान साकारला आहे. पहिल्या प्रसंगापासूनच तो परकाया प्रवेश करतो आणि त्याची प्रत्येक कृती प्रेक्षकांच्या भावनांच्या हिंदोळ्यावर खेळवते. श्रुतीच्या कृतीमुळं नुकसान झाल्यावर त्यानं चिडून व्यक्त केलेलं मनोगत चित्रपटाचा उत्कर्षबिंदू ठरावा. कोणतंही ग्लॅमर नसलेल्या भूमिकेत कॅतरिना कैफचा चांगला प्रभाव पडला आहे. रणबीरच्या अभिनयावर व्यक्त होण्याचं काम तिनं इमाने इतबारे केलं आहे. शाश्‍वत चटर्जीच्या वाट्याला आव्हानात्मक भूमिका आली आहे आणि ती त्यांनी जबरदस्त साकारली आहे. सौरभ शुक्‍ला नेहमीप्रमाणेच धमाल. 
एकंदरीतच, वेगळी मांडणी आणि सादरीकरण असलेले चित्रपट पाहण्याची आवड असणाऱ्यांनी चुकवू नये, अशीच ही मेजवानी आहे...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT