Marathi news Shashi Kapoor dies profile
Marathi news Shashi Kapoor dies profile  
मनोरंजन

तेरा मुझसे है पहले का नाता कोई...

सकाळ डिजिटल टीम

भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल सर्वोच्च मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार 2015 मध्ये ज्येष्ठ अभिनेते, निर्माते-दिग्दर्शक शशी कपूर यांना मिळाला होता. शशी कपूर या पुरस्काराचे 46 वे मानकरी होते. दादासाहेब फाळके पुरस्कार हिंदी चित्रपटसृष्टीतील 'प्रथम परिवार' मानल्या जाणाऱ्या कपूर कुटुंबाला तिसऱ्यांदा मिळाला होता. शशी कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर (1971), मोठे भाऊ राज कपूर (1987) यांना या पुरस्काराने याआधी सन्मानित केले होते. 

शशी कपूर यांनी बालकलाकार म्हणून 'आग' चित्रपटातून पदार्पण केले. त्यांनी 'आवारा' चित्रपटात राज कपूर यांच्या बालपणीची भूमिका साकारली. वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला आणि वडील पृथ्वीराज कपूर यांच्यासह पृथ्वी थिएटरमध्ये काम करू लागले. त्यांनी 'आरके'च्या 'जागते रहो', 'दिल्ली दूर है' अशा काही चित्रपटांसाठी सहायक दिग्दर्शक म्हणूनही काम केले. पृथ्वी थिएटर बंद झाल्यानंतर ते पुन्हा चित्रपटांकडे वळले; परंतु 'धरमपुत्र', 'मोहब्बत इसको कहते है', 'हॉलीवूड इन बॉम्बे' असे काही चित्रपट फारसे न चालल्यामुळे त्यांच्यावर 'अपयशी कलाकार' असा शिक्का मारण्यात आला. मात्र, प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता त्यांनी जिद्दीने काम सुरू ठेवले आणि त्याचेच फळ म्हणून की काय 'जब जब फूल खिले' हा चित्रपट 'सुपरहिट' ठरला. त्यानंतर एकापेक्षा एक यशस्वी चित्रपट देऊन अल्पकाळातच ते आघाडीचे कलाकार बनले.

बालकलाकार, नायक, चरित्र अभिनेता, निर्माता-दिग्दर्शक अशी अष्टपैलू कामगिरी त्यांनी केली. त्यांनी व्यावसायिक चित्रपटांप्रमाणे 'ऑफ बीट' विषयांवरील कलात्मक चित्रपटांमध्येही काम केले. विशेष म्हणजे, त्यांनी 'कलयुग', 'जुनून', 'विजेता', 'उत्सव' अशा कलात्मक चित्रपटांची निर्मिती केली. सुपरस्टार राजेश खन्ना आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांनी काम केले. अमिताभबरोबर त्यांची जोडी चांगलीच जमली. 'दीवार', 'त्रिशूल', 'काला पत्थर', 'कभी कभी' अशा 11 चित्रपटांत ही जोडी झळकली. 'दीवार'मधील त्यांच्या संवादाची जुगलबंदी आजही रसिकांच्या आठवणीत आहे. ''तुम्हारे पास क्‍या है?... मेरे पास मॉं है'', हा गाजलेला संवाद असंख्य रसिकांना मुखोद्गत आहे. राखी आणि शर्मिला टागोर या नायिकांबरोबर त्यांची जोडी चांगलीच जमली.

'चोर मचाये शोर', 'फकिरा', 'कन्यादान', 'सत्यम शिवम सुंदरम', 'आ गले लग जा', 'शर्मिली', 'दूसरा आदमी', 'बसेरा', 'नमक हलाल', 'त्रिशूल', 'प्रेमकहानी', 'रोटी कपडा और मकान' अशा 100 हून अधिक चित्रपटांत त्यांनी काम केले. 'अजूबा' हा त्यांनी दिग्दर्शित केलेला एकमेव चित्रपट. प्रसन्न व्यक्तिमत्त्व आणि कसदार अभिनयाच्या बळावर 1960 ते 1980 अशी दोन दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या शशी कपूर यांना 'पद्मभूषण'ने सन्मानित करण्यात आले होते. प्रकृती साथ देत नसल्याने काही वर्षांपासून ते चित्रपटांपासून दूर राहिले. 

गाजलेली गाणी

  • तेरा मुझसे है पहले का नाता कोई (आ गले लग जा)
  • ओ मेरी शर्मिली (शर्मिली)
  • परदेसीयोंसे ना अखियॉं मिलाना (जब जब फूल खिले)
  • घुंगरू की तरह (चोर मचाये शोर)
  • ले जायेंगे ले जायेंगे (चोर मचाये शोर) 
  • कह दूँ तुमे (दीवार)
  • ना ना करते प्यार (जब जब फूल खिले)
  • मोहब्बत बडे काम की चीज है (त्रिशूल)
  • तोता मैना की कहानी (फकिरा)
  • एक डाल पर तोता बोले (चोर मचाये शोर)

गाजलेले 10 चित्रपट

  • जब जब फूल खिले
  • शर्मिली 
  • आ गले लग जा
  • चोर मचाये शोर 
  • फकिरा 
  • कभी कभी
  • दीवार
  • त्रिशूल
  • सत्यम्‌ शिवम्‌ सुंदरम्‌
  • दूसरा आदमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

IPL, LSG vs RR: संघाचा विजय, पोराची पहिली फिफ्टी अन् कुटुंबाचं सेलिब्रेशन; पाहा राजस्थानच्या जुरेलचा स्पेशल Video

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT