Nilesh Mohrir and Pranoti Mohrir
Nilesh Mohrir and Pranoti Mohrir Sakal
मनोरंजन

लग्नाची गोष्ट : फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड...

सकाळ वृत्तसेवा

- नीलेश व प्रणोती मोहरीर

मालिकांची शीर्षकगीतं असो वा चित्रपट गीतं, आपल्या गोड संगीतानं प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालणारा आघाडीचा संगीतकार नीलेश मोहरीर. त्यानं सहा वर्षांपूर्वी प्रणोतीशी लग्नगाठ बांधली. ती एका मल्टिनॅशनल कंपनीत मोठ्या पदावर काम करते. त्यांचं अरेंज विथ लव्ह मॅरेज. पहिल्याच भेटीत त्यांच्यात भरपूर गप्पा झाल्या आणि आपण हे नातं पुढं न्यायला हवं, असं दोघांनाही वाटलं. पुढचा एक आठवडा एकमेकांबरोबर वेळ घालवत एकमेकांना नीट जाणून घेतल्यावर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

प्रणोती म्हणाली, नीलेश हा माझा नवरा कमी आणि मित्रच जास्त आहे. तो अत्यंत समजूतदार, शांत, प्रेमळ. तो प्रत्येकाला जीव लावतो. त्याचा आयुष्याकडं बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. तो कायम भविष्याचा विचार करतो. एखाद्या कठीण परिस्थितीत कोणालाही न दुखावता सर्व बाजूंचा विचार करून मार्ग काढत त्यांना प्रेरणा दिली पाहिजे हा त्याचा विचार असतो. त्याचबरोबर त्याचा स्वभाव शांत आणि प्रेमळ असल्यानं अनेक गोष्टी आपोआप सोप्या होऊन जातात. मला काही अडचण आल्यावर नीलेशकडं त्याचं उत्तर नसलं, तरी तो माझ्याबरोबर आहे या विचारानंच त्या गोष्टीतून मार्ग काढण्यासाठी मला प्रोत्साहन मिळतं. कामाच्या बाबतीत तो फार मेहनती आहे. नीलेशचं संगीत आणि त्याची वक्तृत्त्वकला मला प्रचंड आवडते. त्यानं संगीतबद्ध केलेली सगळीच गाणी मला खूप आवडतात, पण ‘कळत नकळत’, ‘उंच माझा झोका’, ‘तुजवीण सख्या रे’, ‘स्वामिनी’ या मालिकांची शीर्षकगीतं, ‘मितवा’, ‘मंगलाष्टक वन्स मोअर’, ‘व्हॉट्सअप लग्न’ या चित्रपटातील त्याची गाणी माझ्या विशेष आवडीची आहेत.’’

नीलेशनं प्रणोतीच्या स्वभावाबद्दल बोलताना सांगितलं, ‘‘प्रणोतीच्या स्वभावातला मला सर्वाधिक आवडणारा गुण, ती खूप प्रॅक्टिकल आहे. तिचा स्वभाव खूप सकारात्मक आणि बोलका असल्यानं ती प्रत्येकाला सामावून घेते. त्यामुळं ती जिथं असेल तिथलं वातावरण कायम प्रसन्न आणि आनंदी असतं. ती समजूतदारही आहे, तिचा तिच्या भावनांवर संयम असतो. आतापर्यंत कधीही मी तिला गरजेपेक्षा जास्त प्रतिक्रिया देताना पाहिलं नाही. त्याचप्रमाणे तिला माणसांची उत्तम पारख आहे. समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललं आहे किंवा एखादी कृती करण्यामागचा त्याचा उद्देश काय असू शकतो हे तिला अचूक समजतं. कामाच्या बाबतीत ती खूप प्रामाणिक आहे. विज्ञान शाखेची विद्यार्थिनी असल्यानं ती प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास करूनच पुढचा निर्णय घेण्याची तिला सवय आहे. कामाच्या बाबतीत मी आतापर्यंत कधीही तिला चालढकल किंवा टाळाटाळ करताना पाहिलेलं नाही. अत्यंत मन लावून आणि मेहनत घेऊन ती तिचं काम करत असते. कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याचा त्यांचा स्वभाव असल्यानं आम्ही कधीही एकमेकांच्या कामांच्या बिझी शेड्युलबद्दल तक्रार करत नाही.’’

‘प्रणोती माझी खरी समीक्षक आहे. ती प्रेक्षक म्हणून माझं गाणं ऐकते आणि मला सांगते, की ते गाणं प्रेक्षकांना आवडेल की नाही. तिनं सांगितलेलं प्रत्येक वेळा खरं होतं. एखादं गाणं माझ्या मनासारखं होत नाही, तोवर मी अस्वस्थ असतो. त्या काळात मला शांत ठेवण्याचं काम ती करते. माझं काम कुठवर आलं आहे, मला चाल सुचतेय की नाही हे सगळं तिला मनापासून जाणून घ्यायचं असतं,’’ असं नीलेश सांगतो, तर ‘‘कामामुळं अनेकदा घरी यायला मला उशीर होतो. पण आतापर्यंत कधीही नीलेशनं तक्रार केलेली नाही. आम्ही कामाच्या बाबतीत एकमेकांना पूर्ण स्पेस देतो,’’ असं प्रणोती म्हणाली. अशाप्रकारे एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत हे कपल प्रवास करीत आहे.

(शब्दांकन - राजसी वैद्य)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Elections 2024: नगरमध्ये PM मोदींनी लालूंवर सोडले टीकास्त्र! मुस्लिम आरक्षणावरून सुरू झाला वाद, काय म्हणाले?

Ajit Pawar : दत्ता भरणेंचा शिवीगाळ केल्याच्या व्हिडिओ व्हायरल; अजितदादा म्हणतात, हस्तक्षेप केला कारण...

Gold Investment: सोन्याचे भाव भिडले गगनाला.. यंदाच्या अक्षय तृतीयेला सोने खरेदी करावी का? तज्ज्ञ काय सांगतात

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : रायगडमध्ये मतदारांनी मतदानानंतर केलं रक्तदान..

SCROLL FOR NEXT