कलाकारांच्या पडद्यावर दिसणाऱ्या बॉण्डिंगच्या प्रेमात प्रेक्षक नेहमीच असतात, पण या उत्तम ऑनस्क्रीन बॉण्डिंगचं मूळ कारण असतं पडद्यामागची मैत्री.
- प्रार्थना बेहेरे, संकर्षण कऱ्हाडे
कलाकारांच्या पडद्यावर दिसणाऱ्या बॉण्डिंगच्या प्रेमात प्रेक्षक नेहमीच असतात, पण या उत्तम ऑनस्क्रीन बॉण्डिंगचं मूळ कारण असतं पडद्यामागची मैत्री. मालिकेच्या निमित्तानं भेट होऊन काहींची कमी वेळातच चांगली मैत्री होते. असेच दोन आघाडीचे कलाकार म्हणजे प्रार्थना बेहेरे आणि संकर्षण कऱ्हाडे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतल्या यांच्या मैत्रीचे मोठ्या संख्येने चाहते आहेत. याच निमित्तानं त्यांची भेट झाली आणि त्यांची छान गट्टी जमली.
प्रार्थना म्हणाली, ‘संकर्षण आणि मी खूप कमी दिवसांत एकमेकांचे खूप चांगले मित्र-मैत्रीण झालो आहोत. आम्हा दोघांचं ट्युनिंग खूप छान आहे आणि मला त्याचं म्हणणं नेहमी पटतं. त्याचं वागणं-बोलणं, संस्कार, विचार फार प्रभावी आहेत. आम्ही गप्पा मारताना मला त्याच्याकडून नवीन काहीतरी शिकायला, जाणून घ्यायला मिळतं. तो खरोखर एक गुणी मुलगा आहे. तो गुणी आहे व तितकाच खोडकरही आहे! सेटवर खूप मस्ती करणारा, कोणाची टिंगल करणारा, मिमिक्री करणारा सेटवर कोणी असलं, तर तो संकर्षणच. त्यामुळे तो मला सेटवर कायम हसवत असतो. तो जितका खोडकर आहे तितकाच संस्कारीही आहे. त्याला आता दोन मुलं आहेत आणि त्यांनाही संकर्षण उत्तम संस्कार देतोय, हे बघून मला खूप छान वाटतं. तो एक हरहुन्नरी कलाकार आहे; लेखक, दिग्दर्शक, अभिनेता सूत्रसंचालक अशा अनेक भूमिका तो समर्थपणे साकारतोय. तो स्वतःच अभ्यास करून अभिनय करतो, हे मी रोज बघते. तो अत्यंत हुशार आहे, पण त्याला त्याचा अजिबात गर्व नाही. याउलट तो सतत नवं काय करता येईल, नवं काय शिकता येईल याच्या मागं असतो. त्याला आयुष्यात खूप काही मिळवायचंय, मोठं व्हायचंय आणि त्यासाठी तो प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. एखादी नवीन कविता केली, की तो मला आवर्जून ऐकवतो. कोणतीही व्यक्ती आधी चांगली माणूस असल्यास तिच्या कामातही ते दिसून येतं आणि तसंच संकर्षणच्या बाबतीतही होतं. त्याचा स्वभाव हा अत्यंत प्रामाणिक, निर्मळ असल्यानं त्यानं लेखन केलं, अभिनय केला किंवा दिग्दर्शन केलं; त्याचं काम हे उत्तमच होतं.’’
संकर्षणनं प्रार्थनाबद्दल बोलताना सांगितलं, ‘प्रार्थना खूप खरी आहे आणि ती सगळ्यांबरोबर सारखी आहे. तिच्यात भेदभाव ही भावनाच नाही. तिची पार्श्वभूमी व आताची तिची प्रसिद्धी यांचा विचार करताना हा थोडा जवळचा, हा थोडा लांबचा, या लोकांबरोबरच राहायचं, त्या लोकांशी बोलायचंच नाही असे ती कप्पे कधीच करत नाही. तिचा स्वभाव हा सगळ्यांसाठी सारखा आहे. ती सर्वांना सामावून घेते; हा तिच्यातला खूप चांगला गुण आहे आणि तो मला आत्मसात करायला खरोखर आवडेल. कारण एखादी व्यक्ती माझ्या जवळची झाल्यास ती खूप जवळची होते, नाहीतर अजिबात होत नाही; पण प्रार्थनाचं तसं नाही. तसंच तिच्यात एखादी गोष्ट स्वीकारण्याची ताकद आहे. तिला काहीतरी येत नसल्यास प्रामाणिकपणे ती ते मान्य करते व येत नसलेली ती गोष्ट शिकण्यासाठी प्रयत्न करते. मला वाटतं कोणत्याही कलाकारात ही स्वीकारण्याची ताकद असणं खूप महत्त्वाचं असतं, जी प्रार्थनामध्ये प्रचंड प्रमाणात आहे. अभिनेत्री म्हणून ती खूप मेहनती आहे. मला तिचं ‘मितवा’ चित्रपटातलं काम खूप आवडलं. त्यासोबतच ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील नेहा कामत ही भूमिका ती ज्याप्रकारे साकारत आहे, त्यासाठी तिचं खूप कौतुक वाटतं. कारण ही भूमिका तिच्यासाठी आव्हानात्मक होती. सेटवरती आमची मजा मस्ती सुरूच असते. मालिकेत आमच्यात जसं बॉण्डिंग दिसतं तशीच छान मैत्री आमची ऑफक्रीनही आहे.’’
(शब्दांकन - राजसी वैद्य)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.