special story on Bollywood actor rishi kapoor
special story on Bollywood actor rishi kapoor  
मनोरंजन

खानदानी हिरो हरपला... 

शेखर जोशी

कोरोनाच्या संकटात चित्रपटसृष्टी हैराण असतानाच दोन दिग्गज अभिनेत्यांच्या सलग एग्झिटने जबर धक्‍का बसला आहे. इरफानच्या धक्‍क्‍यातून सावरण्यापूर्वीच गुरुवारची सकाळ सदाबहार सदा प्रफुल्लित असे लव्हर बॉय ऋषी कपूर आता आपल्यात नाहीत, अशी वेदनादायक बातमी घेऊन आली. दोघांचेही साम्य एकच...दोघेही कॅन्सरशी लढताना जगण्याची लढाई हरले. इरफानला चंदेरी दुनियेत खूप वेळाने स्कोप मिळाला आणि आता कोठे तो बहरत होता तोवर त्याला जीवनाच्या मध्यंतरातच आपल्या चित्रपट कारकिर्दीची अखेर करावी लागली. अगदी त्याचा "इग्लिश मीडिअम' चित्रपटगृहात प्रदर्शित न होता नेटफ्लिक्‍सवरून पाहावा लागला. त्याचा हा अखेरचा चित्रपटही एक "बाप' नव्या पिढीला म्हणजे आपल्या मुलीला समजावून घेताना त्याने केलेला अभिनय अक्षरश: प्रेक्षकांना खूप समृद्ध करतो. मात्र त्याच्या खऱ्या जिंदगीतली शोकांतिका त्याच्या प्रत्येक चाहत्याच्या डोळ्यात पाणी आणून गेली आणि आज ऋषीने तर त्याच्या आम्हा सर्व चाहत्यांना रडवलंच! कारण अमेरिकेत उपचारानंतर तो बरा होऊन परतला या समजामध्येच चाहते होते. 

मेन स्ट्रिम हिंदी चित्रपटसृष्टीत ऋषी कपूरचे योगदान मोठे आहे. ज्या सत्तरच्या दशकात अत्यंत संस्कारित हिरो आणि हिरोईन असायचे त्या काळात "बॉबी'मधून लव्हर बॉय ही इमेज घेऊन आपल्या वडिलांच्याच आरके या भव्य बॅनरच्या नावाखाली ऋषी कपूर आला आणि त्याने 90 च्या दशकापर्यंत आपले स्थान ध्रुवासारखे अढळ ठेवले. अर्थात कोठे थांबायचे याचे अचूक भान ठेवत त्याने आपल्यात बदलही घडवला. खरे तर ऋषी कपूरला चित्रपटसृष्टीतील फार मोठी रंगभूमी आणि चित्रपट याची परंपरा असलेल्या कपूर घराण्यात जन्म झाला आणि बालपणापासून त्याला भूमिका मिळाल्या त्यामुळे त्याच्या जगण्याएवढीच त्याची चित्रपट कारकीर्दही प्रचंड मोठी आहे. राज कपूरसारख्या प्रतिभाशाली दिग्दर्शक अभिनेत्याच्या पोटी जन्म घेऊनही त्या वलयाशिवाय त्याने आपली स्वत:ची इमेज बनवली. आमच्याच पिढीत अँग्री यंग मॅन अमिताभ हे आकर्षण एवढे भव्य होते की त्याच्या चित्रपटांच्या लाटेत राजेश खन्नासारखे सुपरस्टार बाजूला पडले. मात्र ऋषी कपूर अढळ राहिला. त्याच्या चित्रपटांनी देमार (ऍक्‍शन) चित्रपटांना टाळत प्रेम करायला शिकवले. ज्या काळात देवानंद, शशिकपूर, संजीवकुमारपासून ते धर्मेंद्र, जितेंद्र, विनोद खन्ना अशी मोठी स्टार लाईन असताना त्या काळात एकाबाजूला त्याने आपल्या प्रेमकथांची एक वेगळी मालिका सुरू ठेवली होती. 1973 मध्ये "बॉबी'पासून सुरू झालेली ही मालिका "लैला मजनू', "सरगम', "कर्ज', "हम किसीसे कम नही' असे सांगत 1984 च्या "सागर'मध्ये पुन्हा त्याच डिंपलसोबत आणखी प्रेमकथा बॉक्‍स ऑफिसवर यशस्वी केली होती. त्यानंतर....पुन्हा 90 चे दशक उजाडेपर्यंत चॉंदनी, दिवानापर्यंत त्याची ही दिवानगी अव्याहतपणे सुरू राहिली. याचकाळात किती तरी नवे चेहरे आले संजय दत्त, सनी देवोल, कुमार गौरव, अमिर खान, शाहरुख, सलमान पर्यंतचे सर्व हिरो या काळात आपल्या "लव्हस्टोरी'नेच चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवत होते तरी ऋषी कपूर नव्वदच्या काळापर्यंत म्हणजे 30 वर्षे आपली लव्हर बॉय ही प्रतिमा कायम ठेवली होती. म्हणजे भारतीय चित्रपट सृष्टीचा जो सुवर्णकाळ होता तेव्हापासून ते आजच्या डिजिटल क्रांतीपर्यंतच्या चित्रपटापर्यंत दोन युगांना जोडणारा हा कलावंत होता. ऋषी कपूरने एक सुरी चित्रपट केले अशी टीकाही होत असते, परंतु टीकाकारांमुळे फारसे विचलित न होता. त्याने मेन स्ट्रिम चित्रपट सोडून वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला नाही. याच काळात समांतर चित्रपटाची म्हणजेच इटालियन न्युरिऍलिझम आणि फ्रेच न्यू व्हेव याच्या परिणामातून एक नवा प्रवाह घेतलेली ही चळवळही सुरू होती. या चळवळीतून उत्पल दत्त, गिरीश कर्नाडपासून ते अमोल पालकेर, नरसुद्दिन शहापर्यंतची दिग्गज मंडळी अभिनय करत होती. पण ऋषी कपूरचा हा पिंड हा नव्हता. त्याने करमणूक प्रधान, लोकांचे निव्वळ रंजन करणारे चित्रपट दिले. रंजन करण्यापेक्षा चित्रपटमाध्यमाचे एक कर्तव्य असते ते म्हणजे सामाजिक, वैश्‍विक दर्शन आणि त्यातून सामाजिक जाणिवा प्रगल्भ करणे. अशा वाटेने ऋषी कपूर कधीच गेला नाही. मात्र जेव्हा आपण एखाद्या कलेचे अंतिम साध्य काय याचा विचार करतो तेव्हा "आनंद' हेच प्रयोजन सर्वांत मोठे असते. वास्तवापूासन मैलो दूर जात रोमॅंटिसिझमच्या बेहोशित धुंद असलेले चित्रपट ऋषी कपूरने आमच्या आधीच्या (म्हणजेच आम्ही प्राथमिक शाळेत असल्यापासून ते कॉलेजला जाईपर्यंत) व नंतरच्या पिढ्यांना दिले. "लैला मजनू' "कर्ज', "हम किसीसे कम नही', यांदो की बारात, "हिना' "प्रेमरोग' या चित्रपटांनी त्या काळात धमाल केली होती. "बॉबी'च तर युग असे होते की, राख्यांपासून पावडरच्या डब्यापर्यंत प्रत्येक वस्तूला "बॉबी'चे नाव दिले जात होते. त्याच्या चित्रपटातील गाणी हा तर एक स्वतंत्र विषय आहे. त्यांनी चार पिढ्यांना मंत्रमुग्ध केलं. त्याबाबतीत खूप भाग्यवान अभिनेता होता. ऋषीचे आज जेव्हा हे जुने चित्रपट टीव्हीवर लागतात तेव्हा आपण विचार करतो अरे त्याचा "सागर' आला तेव्हा आपण नुकते दहावीची परीक्षा देऊन कॉलेजला जाण्याच्या उंबरठ्यावर होतो...""चेहरा है क्‍या चॅंद खिला है...'' आरडीने संगीत दिलेले गाणं ओठावर घेऊनच कॉलेजची पायरी चढलो आणि त्यानंतर पुढील दोन वर्षांतच ऋषी कपूर याचीच परंपरा चालविणारे चित्रपट घेऊन अमिर खान, शहारूख खान या आपल्या वयाच्या हिरोंचे युग सुरू झालं होतं. आज ऋषी कपूरचा मुलगा रणबीरची पिढी काही अपवाद सोडले तर तिच लव्हबॉयची परंपरा पुढे नेत आहे. ...डिंपल, नितूपासून ते माधुरी दीक्षित, दिव्याभारती, चुही चावला आणि वर्षा उसगावकरपर्यंत तीस एक नायिकांसोबत त्याने हिरो म्हणून चित्रपट केले. हिंदी चित्रपटांनी प्रेमाची जी फॅक्‍टरी सुरू केली त्याचा प्रभाव सर्वांत परिणामकारकपणे कोणी निर्माण केला त्यात ऋषी कपूरचे योगदान मोठे आहे. अर्थात हा किती व्हर्सटाईल अभिनेता आहे ते दोन हजार नंतरच्या दशकातील त्याच्या चित्रपटातून दिसते. "फना'मधील चरित्रभूमिकेत कजोलच्या बापाची भूमिका साकरणारा...आणि "अग्निपथ'मधील रौफलाला हा त्याने साकारलेला खलनायक पाहताना अंगावर शहारे येतात. खलनायक म्हणून त्याचा हा पहिला प्रयोग चित्रपट रिमेक असूनही प्रेक्षकांना भावला. "औरंगजेब', "पटियाला हाऊस', यामध्ये त्याचा कसदार अभिनय तर पहायाला मिळालाच, पण "डी-डे'मध्ये त्याने अंडरवर्ल्डच्या डॉनची (दाऊद साधर्म्य असेली) साकारलेली भूमिका त्याच्या कारकिर्दींतील अभिनयाचं उत्तुंग दर्शन घडविणारं होतं. अशा भूमिका हा एकेकाळचा लव्हरबॉय म्हणून शिक्का असेलेला अभिनेता कसा करू शकतोय असा धक्‍काच त्याने दिला. एकूणच त्याच्या जाण्याने अमिताभही हादरून गेला आहे. सारे बॉलीवुड शोकमग्न आहे. समकालीन राजकीय सामाजिक घडामोडींवरही ऋषी कपूरने ट्विटरच्या माध्यमातून भाष्य केल्यानंतर वाद उद्‌भवला होते. असा हा थेट भिडणारा आणि चार पिढ्यांना आनंद देणारा तारा आज निखळला आहे.

हे पण वाचा -  गुड न्यूज : भारतातच तयार होणार कोरोनाची लस!                                                    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT