Sridevi Prasanna Marathi Movie Review
Sridevi Prasanna Marathi Movie Review esakal
मनोरंजन

Sridevi Prasanna Movie Review : लग्न करायला जाताय, 'श्रीदेवी प्रसन्न' पाहून गेलात तर 'एवढे गुण' नक्की जुळतील!

प्रेरणा जंगम

Sridevi Prasanna Marathi Movie Review : लग्नाचं वय झालं की घरच्यांकडून, नातेवाईकांकडून लग्न कधी करणार? सर्रास याविषयी विचारलं जातं. फक्त एवढ्यावरच ते थांबत नाही तर आपलं लग्न हाच चर्चेचा विषय बनतो. मात्र लग्न का करायचयं? जर तुम्हाला हा प्रश्न कुणी विचारला तर तुम्ही याचं उत्तर काय द्यालं? हे उत्तर सापडलं तर यातच तुमचा लग्नाबद्दलच्या विचारांचा गुंता सुटेल.

जर याचं उत्तर नाही सापडलं तरीही हा गुंता सुटू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे 'श्रीदेवी प्रसन्न' हा चित्रपट. जोडीदार कसा निवडावा याचे धडे हा चित्रपट देत नसून जोडीदार निवडतानाची एक गोड गोष्ट तुमच्यासमोर सादर होते, ज्यात श्रीदेवी आणि प्रसन्नची हटके प्रेमकहाणी आपल्याला बघायला मिळते.

हा चित्रपट सुरुवातीपासूनच तुम्हाला उत्तम कथा,संवाद आणि संगीतामुळे खिळवून ठेवतो. दिग्दर्शक विशाल मोढवेने दिग्दर्शनाच्या पदार्पणातच सिक्सर मारलाय असं म्हणणं वावगं ठरणार नाही. एकतर सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर अशी कमाल जोडी आणि या जोडीला घेऊन श्रीदेवी प्रसन्न ही हटके पात्रे समोर आणण्याचं उत्तम काम विशाल मोढवेने केलंय. तर अदिती मोघेच्या लेखणीतून आलेली ही कथा आणि पात्रे तुम्हाला त्यांच्या वेडेपणात, त्यांच्या वावरण्यात, बोलण्यात सहभागी करुन घेतात आणि तुमची उत्कंठा शेवटपर्यंत कायम ठेवतात.

चित्रपटाची कथा कळाली तर त्यातली अर्ध्या अधिक उत्सुकता बहुधा निघून जाऊ शकते. त्यामुळे या चित्रपटाच्या कथेबद्दल फार न सांगता वेंगुर्ल्याची श्रीदेवी जिचं अख्ख कुटंबं विशेषकरून तिची आजी पूर्णपणे फिल्मी आहे तर दुसरीकडे मुंबईचा प्रसन्न जो लग्न या विषयाबद्दल प्रचंड गोंधळ झाला आहे. दोघांचं हेच वेगळेपण या दोघांना कसं एकत्र आणतं आणि त्यात काय काय अडचणी येतात, काय गंमत घडते हे सगळं पाहणं मजेशीर आहे. या सगळ्यात त्या दोघांचं कुटुंब आणि त्यातील विविध पात्र रंजक वाटतात. श्रीदेवी आणि प्रसन्नच्या लव्हस्टोरीची सुरुवात आणि त्याचा शेवट काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल.

अभिनेत्री सई ताम्हणकर या चित्रपटात श्रीदेवी ही व्यक्तिरेखा साकारतेय तर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर प्रसन्नची व्यक्तिरेखा साकारतोय. या चित्रपटाच्या निमित्ताने दोघं पहिल्यांदाच जोडी म्हणून एकत्र झळकत आहेत, असं असलं तरी सई आणि सिद्धार्थ एकत्र सुंदर दिसतायत, शिवाय बऱ्याच काळाने एका वेगळ्या जोडीच्या माध्यमातून ही लव्हस्टोरी पाहायला मजा येते. दोघही एकत्र सीन, संवाद, गाणी यामध्ये लक्ष वेधून घेतात. या चित्रपटात सईने तिची ही बाजू आणखी योग्य पद्धतीने वापरल्याचं जाणवतं. श्रीदेवी ही भूमिका सईपेक्षा किंवा तिने आत्तापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा किती वेगळी आहे हे सहजतेने सादर होतं. सईच्या या सहजतेमुळे श्रीदेवीच्या भूमिकेतून ती मनं जिंकते.

सध्या 'झिम्मा २', 'ओले आले' या चित्रपटांमधून मनं जिंकणारा सिद्धार्थ चांदेकर प्रसन्नच्या भूमिकेतूनही या चित्रपटातून त्याच्या कामाचं वेगळेपण सिद्ध करतो. प्रसन्नच्या भूमिकेत फार विविधता नाहीय, आपण बऱ्याचदा अशी मुलं कदाचित अनेकदा पाहिली असतील, हा विचार प्रसन्नकडे बघून येणं यातच सिद्धार्थ यशस्वी ठरलाय.

याशिवाय रसिका सुनीलचं पात्र उत्तम लिहीलय असं जाणवतं. तिनेही त्याला पूर्णपणे न्याय दिलाय. सिद्धार्थ बोडकेची चित्रपटात एन्ट्री झाल्यापासून तो लक्ष वेधून घेतो. त्याच्या भूमिकेत एक चार्म आहे, हावभावांची सलगता आहे.

सुलभा आर्या यांचं आजीचं पात्र मजेशीर वाटतं आणि त्यांनी अतिशय उत्तम सादर केलय. याशिवाय संजय मोने, समीर खांडेकर, आकांशा गाडे, शुभांगी गोखले, वंदना सरदेसाई, रमाकांत दयामा, राहुला पेठे या कलाकारांचा पात्रही फार मजेशीर आहेत आणि त्यांनी उत्तम साकारली आहेत. या चित्रपटातील प्रत्येक पात्राचा संवाद जमेची बाजू वाटते. शिवाय या चित्रपटातील स्वाती हे महत्त्वाचं पात्र कथेत आणखी रंग भरतं असं म्हणू शकतो.

या चित्रपटातील विनोदी सीन्स आणि त्यातील संवाद खळखळून हसवतात. भावुक सीन्सने चित्रपटात कमी जागा घेतली असली तरी ती योग्य वेळी आलीत आणि तितकी प्रभावी वाटतात. मुख्य म्हणजे लग्नासाठी जोडीदार शोधणाऱ्यांना या चित्रपटाची कथा आपलीशी वाटू लागेल आणि तितकीच कनेक्ट होणारी आहेत.

श्रीदेवी राहत असलेलं वेंगुर्ला बे ठिकाण किंवा गोव्यातील सीन्स ही दृश्ये या चित्रपटात उत्तम टिपली आहेत. तर गाण्यांचं छायांकन आणखी चांगलं होऊ शकलं असतं असं जाणवतं. या चित्रपटातील गाणी कथेला न्याय देणारी आहेत, जी उत्तम लिहिली गेलीत आणि सादरही छान झालीत. अमीतराज यांचं संगीत, क्षीतिज पटवर्धन यांचे गीत असलेली गाणी कथेला न्याय देणारी आहेत. दिल मे बजी गिटार हे गाणं तर चित्रपटाची शोभा आणखी वाढवतं. ज्यात सई ताम्हणकर आणि सिद्धार्थचा धमाल डान्स, गाण्याचा रंगीबेरंगी फील, कलरफुल कपडे, लखलखाट मजा आणतो.

तरुण पिढीला हा चित्रपट जास्त आवडेल, शिवाय कोणत्याही वयोगटाचं मनोरंजन करणारी ही स्टोरी अतिशय रंजक आहे.

रेटिंग - ४ स्टार्स

----------------------------------------------------------

चित्रपटाचे नाव - श्रीदेवी प्रसन्न

कलाकार - सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर, संजय मोने, समीर खांडेकर,आकांशा गाडे, शुभांगी गोखले, वंदना सरदेसाई, रमाकांत दयामा, राहुल पेठे

दिग्दर्शक - विशाल मोढवे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात अर्ध्यातासापासून ईव्हीएम बंद

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT