Purushottam Karandak : पुण्यातीलच नव्हे तर अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेली अत्यंत बहुमानाची आणि बहू प्रतिष्ठित समजली जाणारी 'पुरुषोत्तम करंडक' (Purushottam Karandak) ही एकांकिका स्पर्धा सध्या चर्चेत आहे. स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच एक मोठी घटना घडली. एकही एकांकिका पात्र नाही असे कारण देऊन परीक्षकांनी यंदा करंडक कोणालाही दिला जाणार नाही अशी घोषणा केली. एकांकिका स्पर्धेमध्ये ही घटना पहिल्यांदाच घडली असून, याचा मोठ्या स्तरावर निषेध केला जात आहे.
परीक्षकांच्या मते, करंडक देण्याच्या योग्यतेची एकांकिका आणि अभिनय आढळून आलेला नाही. त्यामुळे परीक्षकांनी केवळ सांघिक पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे koकोणत्याही महाविद्यालयाल हा करंडक मिळू शकलेला नाही. ज्या स्पर्धेसाठी मुलं वर्षभर जीवाचं रान करतात त्यांच्या पदरी असा निकाल यावा ही दुर्दैवी बाब असल्याने आता विविध स्तरातून या स्पर्धेचा आणि परीक्षकांच्या निर्णयाचा निषेध केला जात आहे. अशातच मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते विजू माने (Viju Mane) यांनी एक खरमरीत पोस्ट शेअर करुन 'पुरुषोत्तम करंडक' बाबत निषेध नोंदवला आहे.
विजू माने म्हणतात, 'निषेध! मी ही स्पर्धा पाहिलेली नाही त्यामुळे एकांकिकांच्या दर्जाबद्दल मी बोलू शकत नाही, परंतु या वृत्तीचा मला कायम राग येतो. एखाद्या धावण्याच्या स्पर्धेत धावणारे पाच जण असतील तर त्यात सगळ्यात पुढे असेल तो पहिला येणं हे सामान्य स्पर्धेतले लॉजिक इथे का लावलं जात नाही? मुळात अमुक एक दर्जा असलेल्या एकांकिका हव्या आहेत असं जर परीक्षकांना वाटत असेल, तर त्यांनी प्राथमिक फेरीतच दर्जेदार एकांकिका नाहीत म्हणून स्पर्धा होणार नाही असं जाहीर करून टाकावं. म्हणजे दिवस-रात्र प्रयत्न करणाऱ्यांचा विनाकारण हिरमोड होणार नाही. एकांकिका करणाऱ्या मुलांना उगाच 'नाडण्याची करणी' करणारे असे परीक्षक मी एकांकिका करत असतानाही होते. तेव्हा सुद्धा माझं हेच मत होतं. ज्या लोकांमध्ये स्पर्धा आहे त्या लोकांमधला जो उत्तम आहे त्याला पहिला क्रमांक द्या.'
पुढे ते म्हणतात, 'तुम्ही तरी तुमच्या शाळेत 100 पैकी 100 मार्क कधी मिळवले होते का? पण म्हणून एखाद्या वर्गात 65 मार्क मिळवणारा मुलगा सर्वोच्च मार्क मिळवणारा असेल तर त्याला पहिला क्रमांक द्यायचा नाही याला काय अर्थ आहे. मला तेव्हाही असं वाटायचं की आधी परीक्षकांची नावं जाहीर करा. मग आम्ही तशी एकांकिका सादर करू. दिवस काही फार बदललेले नाहीत.' अशा शब्दात त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.
यंदा पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीचं परीक्षण परेश मोकाशी, हिमांशु स्मार्त आणि पौर्णिमा मनोहे यांनी केले होते. ही स्पर्धा 17 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर या दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ 23 सप्टेंबर रोजी भरत नाट्य मंदिर येथे होणार आहे. परंतु परीक्षकांचा निकाल खटकल्याने हे प्रकरण अधिक चिघळणार असे दिसते आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.