Whistle Blowing Suit : सृष्टीत अतिशय वेगाने अनाकलनीय बदल घडत आहेत. याचे पडसाद जगभर उमटत आहेत. या बदलांच्या मुळांपर्यंत जाऊन त्यांचे विश्लेषण करून उपाय सुचवण्याचा धाडसी प्रयत्न ‘व्हिसल ब्लोईंग सूट’ या चित्रपटात केला गेला आहे. जागतिक घडामोडींचा वेध प्रथमच, एका भारतीय चित्रपटात तोही आपल्या मराठी चित्रपटात घेतला जात आहे. भूत, वर्तमान आणि भविष्याचा समग्र धांदोळा घेत प्रभावी उपाय सुचवणारा मराठीतील हा पहिला विज्ञानपट असून ‘व्हिसल ब्लोईंग सूट’ चित्रपट जागतिक चित्रपट महोत्सवात दमदार हजेरी लावण्यासाठी आता सज्ज झाला आहे.
लेखक दिग्दर्शक ज्ञानेश्वर मर्गज यांच्या ‘आई श्री भगवतीदेवी प्रॉडक्शन’ या होम प्रोडक्शनची ही भव्य निर्मिती आहे. या चित्रपटाद्वारे त्यांनी धाडसी विषयाला हात घातला असून चित्रपट माध्यमात विलक्षण प्रयोग घडवून आणला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.
(Whistle Blowing Suit marathi movie trailer released cast)
हिंदी मालिका 'नोंकझोक' मधून बालकलाकार म्हणून काम करुन पुढे नाटक, मालिकांमध्ये अभिनयाचा ठसा उमटविणारी अभिनेत्री विशाखा कशाळकर या चित्रपटाद्वारे, मराठी चित्रपट क्षेत्रात पदार्पण करीत आहे. या चित्रपटातील विशाखाची भूमिका अत्यंत आव्हानात्मक असून आपल्या नैसर्गिक अभिनयाच्या जोरावर तिने या भूमिकेत चांगला प्रभाव टाकला आहे.
चित्रपटाचे भारून टाकणारे संगीत, चित्रपटाची शैली,अनेक लेअर्समध्ये भाष्य करणारे दिग्दर्शन, कथेचा छाती दडपविणारा आवाका, वैज्ञानिक कसोटीवर खरी उतरणारी अनेक वर्ष रिसर्च करुन लिहिलेली संहिता ही या चित्रपटाची काही वैशिष्टये ट्रेलर पहाताच लक्षात येतात. गुरु ठाकुर, वामन तावडे, ज्ञानेश्वर मर्गज यांनी लिहिलेल्या गीतांना परिक्षित भातखंडे यांचे संगीत लाभले आहे. संकलनाची जबाबदारी अनिल थोरात, ज्ञानेश्वर मर्गज यांनी सांभाळली आहे. ‘व्हिसल ब्लोईंग सूट’ या मराठीतील पहिल्या विज्ञानपटासंदर्भातील उत्कंठा सध्या शिगेला पोहोचलेली आहे. असा आगळावेगळा जागतिक प्रश्नांना भिडणारा विज्ञानपट आपल्या मराठी भाषेत निर्माण झाला आहे, हे विशेष कौतुकास्पद!
या चित्रपटात मानव आणि पृथ्वीच्या परस्पर संबंधांचा वेध घेतला गेला आहे. त्याचवेळी मानवी उत्क्रांतीही मांडली आहे. एका अत्यंत क्लिष्ट विषयाला मनोरंजक कथेद्वारे मांडणाऱ्या या चित्रपटाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. संशोधक, तज्ज्ञ, अभ्यासक यांच्यासोबतच सर्वसामान्य प्रेक्षकांनाही 'ग्लोबल वार्मिंग' ही संकल्पना, समस्या आणि त्यावरील उपाययोजना या चित्रपटाद्वारे अगदी सहजपणे कळेल अशीच या चित्रपटाची रचना आहे. अनेक पदर असलेली कथा, तेवढ्याच तोलामोलाचे दिग्दर्शन आणि दमदार अभिनयासोबतच व्हीएफएक्स, साऊंड,संगीत, वेशभूषा, छायांकन या सारख्या तांत्रिक बाबींवर देखील मेहनत घेतलेली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.