औरंगाबाद : येत्या तीन दिवसांत मराठवाड्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला. गुरुवारी (ता. १४) मराठवाड्यातील काही भागांत पाऊस झाला. दरम्यान, वीज कोसळल्याच्याही घटना घडल्या; तसेच यावर्षी विजा जास्त पडण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे विजेपासून बचाव कसा करावा, याच्या खास टिप्स eSakal.com च्या वाचकांसाठी...
विजांपासून वाचण्यासाठी वीजविरोधी यंत्र बसविणे गरजेचे आहे; मात्र प्रशासनाला याच्याशी काहीही देणे-घेणे नसल्याचे पाहायला मिळते. शहरातील कार्यालयांवर हे यंत्र बसविण्याची; तसेच बसवून घेण्याची जबाबदारी ही महापालिकांची आहे, तर अन्य सरकारी, निमसरकारी कार्यालयांवर बसविण्याची जबाबदारी ही महसूल प्रशासनाची आहे; मात्र याकडे अक्षरश: डोळेझाकपणा सुरू आहे. विजेचे बळी हे प्रशासनाच्या अनास्थेचेच बळी आहेत, असेच म्हणावे लागेल.
जाणून घ्या - नऊ टक्के भागात कोरोना व्यापला तरीही...
कसा असतो विजेचा प्रवाह?
मॉन्सूनच्या आधी आणि मॉन्सून संपताना विजा चमकतात. वीज खाली आली की जीवित, वित्तहानी होते. आकाशातून कोसळणारा प्रचंड विद्युत प्रवाह म्हणजे वीज पडणे किंवा चमकणे होय. आकाशातून कोसळणाऱ्या विजेचा प्रवाह प्रचंड म्हणजे सरासरी २५ हजार अॅम्पिअरपासून ४० लाख अॅम्पिअरपर्यंतचाही असू शकतो. वीज हा निसर्गचक्राचा भाग आहे. कमीत कमी रोध असेल अशा वस्तू, ठिकाण किंवा व्यक्तीवर कोसळणे हा भौतिकशास्त्राचा नियम पाळण्याचे काम वीज करते. जीवघेणी वीज कधी, कुठे, कशी, कोणावर कोसळते हे जाणून घेणे, त्यापासून स्वसंरक्षण करणे आणि कोणावर वीज कोसळलीच तर त्या व्यक्तीला मदत करून तिचे प्राण वाचविणे एवढेच या निसर्गचक्रात आपल्या हाती आहे.
हेही वाचा - औरंगाबादेत१८ महिण्यांच्या बाळाला कोरोना
अशी घ्या काळजी?
ओल्या भिंती आणि धातूंचे फर्निचर-घरातील ओल आलेल्या भिंती आणि त्यांच्या संपर्कात ठेवलेले टेबल, खुर्ची, सोफा, दिवाण, कपाट आदी धातूच्या वस्तू विद्युत संवाहक आहेत. घराबाहेर वीज पडली तरी क्षणाचाही विलंब न करता या वस्तूंच्या माध्यमाने ती घरात व घरातील वस्तूंच्या संपर्काने आपल्यापर्यंत पोचू शकते. घरात लाकडी फर्निचरचा उपयोग करणे आणि भिंतींना ओल येऊ नये म्हणून पावसाळ्याआधीच त्या दुरुस्त करून घेणे स्वसंरक्षणासाठी नक्कीच लाभदायी ठरेल.
पाण्याच्या नळातूनही येऊ शकते वीज
प्रत्येक घरात वापराच्या अथवा पिण्याच्या पाण्याची सोय ही धातूच्या पाइप आणि नळातूनच होत असते. दूर कोठेही या पाइपवर वीज कोसळली तरी पाणी हे विद्युत संवाहक असल्याकारणाने प्रचंड विद्युतधारा या नळाच्या पाइपवाटे व्यक्तींपर्यंत पोचून प्राणहानी होऊ शकते. म्हणून गच्चीवर पाणी साठविण्याच्या टाक्यांचे गज व पाइप बाहेर निघालेले नसावेत.
मोबाईल आणि विजांचा काहीच संबंध नाही.
किरणकुमार जोहरे (भौतिकशास्त्रज्ञ व हवामानतज्ज्ञ, पुणे) ः मोबाईल विजांना आकर्षित करतात, हाही गैरसमजच आहे. विशेषत: ऐकीव माहितीमुळे हा गैरसमज वेगाने पसरला गेला. मागे मुंबई येथे समुद्रकिनारी आपल्या मित्रांचे मोबाईल सांभाळणाऱ्या एका मुलीवर वीज कोसळली. मोकळ्या जागी उभे असल्याने उंची वाढल्यामुळे वीज आकर्षणाने अशी दुर्घटना झाली. सर्वांचे मोबाईल या मुलीकडे होते हे विजा आकर्षित होण्याचे कारण मुळीच नाही. व्यावहारिक दृष्टिकोनातून बघितले तर मोबाईलच्या सिग्नल पॉवरपेक्षा, मोबाईल टॉवरवर मोबाईल रेंजसाठी कार्यरत असलेल्या असंख्य मोबाईल अँटिनांची सिग्नल पॉवर हजारोपट जास्त असते. अशावेळी विजा या सेन्सर अँटिनावर कोसळणे किंवा त्यांची दिशा बदलताना दिसणे तरी आवश्यक आहे; मात्र असे होत नाही. यावरूनही हे सत्य सिद्ध होते, की मोबाईल विजांना आकर्षित करीत नाही.
घरात सुरक्षित कसे व्हावे?
विद्युत उपकरणाचा धोका?
विजांची वादळे होत असताना सातत्याने विजा पडत असतात. विद्युत खांब उंच असल्याने त्यांवर विजा पडण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. याशिवाय जमिनीवर पडणाऱ्या विजा जमिनीखाली असणाऱ्या विद्युतवाहक केबल्समधूनही (अंडरग्राउंड) घरातील विद्युत उपकरणापर्यंत पोचून होणाऱ्या दुर्घटनांची संख्या मोठी आहे. म्हणून विजा कडाडत असताना विद्युत उपकरणे बंद ठेवणे चांगले.
विजा चमकताना घराबाहेर सुरक्षित कसे व्हावे?
झाडाखाली का थांबू नये?
पावसामुळे ओली झालेली झाडे ही असुरक्षित आसरा आहेत. म्हणून विजा चमकताना झाडांखाली बिलकूल थांबू नये. झाडावर वीज कोसळली तरी झाडापासून विजेच्या शलाका निघून झाडाखाली थांबणाऱ्या व्यक्तीच्या शरीराच्या संपर्कात येतात व विजेचा शॉक लागून व्यक्ती दगावू शकते.
विजा पडताना कानाची सुरक्षितता हवी
विजा पडतात तेव्हा त्या हवेला अक्षरश: जाळत मार्गक्रमण करतात. परिणामी, हवेची निर्वात पोकळी निर्माण होते. ही निर्वात पोकळी भरून काढण्यासाठी आजूबाजूची हवा प्रचंड वेगाने एकाच पोकळीत शिरू पाहते आणि हवेचे थर एकमेकांवर आदळल्याने प्रचंड गडगडाट ऐकू येतो. यातून निर्माण होणाऱ्या एकॉस्टिक शॉक वेव्हज या खिडकीची काचेची तावदानेही तोडून टाकतात. या आवाजामध्ये कानाचा नाजूक पडदा फाडून टाकण्याएवढी ऊर्जाही असते. म्हणून कानात बोटे घालून कानाच्या पडद्याचे संरक्षण करणे हा उत्तम उपाय होय.
विजा पडत असताना असुरक्षित जागा
यामुळे येतो ढगांमधून आवाज
दोन ढगांची टक्कर झाली की विजा चमकतात, असे अनेकांनी ऐकले असेल; मात्र वैज्ञानिक सत्य काही वेगळेच आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ढगांतून जेव्हा विद्युतभार वाहून जातो तेव्हा वीज चमकते. ढगांच्या टकरीचा येथे काही एक संबंध नाही.
लायटिंग अरेस्टर आणि सुरक्षित घर
आकाशातून कोसळणाऱ्या विजेला झेलण्यासाठी लायटिंग अरेस्टरचा उपयोग करतात. अनेकदा विजा कोसळून आगीही लागतात. यांपासून बचावासाठी लायटिंग अरेस्टर लाभदायी सिद्ध होते. वर्ष १७५२ मध्ये बेंजामिन फ्रॅंकलिन यांनी लायटिंग अरेस्टरचा शोध लावला. लायटिंग अरेस्टर लावणे आणि घरात थांबले, की आपण विजांपासून सुरक्षित असतो, असा अनेकांचा गैरसमज असतो. लायटिंग अरेस्टर आसपासच्या उंच वस्तूंमध्ये सर्वाधिक उंचीवर आहे का, हेच लायटिंग अरेस्टरने मिळणारा फायदा दर्शविते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.