cabinet meeting Marathwada chhatrapati sambhajinagar today CM shinde ajit pawar fadnavis political news rak94 
छत्रपती संभाजीनगर

Cabinet Meeting : निधी मिळणार की घोषणाच होणार? तब्बल सात वर्षांनी आज मराठवाड्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक; वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यामध्ये आज (ता. १६) रोजी तब्बल सात वर्षांनी होत असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. आता मराठवाड्याला थेट निधी मिळणार की पुन्हा नुसताच घोषणांचा पाऊस पडणार, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. या बैठकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री, मंत्र्यांसह सरकारी अधिकाऱ्यांची पंचतारांकित बडदास्त ठेवली जाणार असल्याने विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. सरकारकडूनही या आरोपांचे खंडन करण्यात आले.

कोणत्याही प्रदेशाच्या शाश्वत विकासाचे मूळ पाण्यात असते. पाण्याची उपलब्धता असेल तरच शेती बहरते, उद्योग वाढतात, रोजगार निर्मिती होते. मराठवाड्याचा शाश्वत विकास साधण्यासाठी प्राधान्याने सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मराठवाड्याच्या विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम आखला जातो मात्र प्रत्यक्षात पदरात जेवढे जाहीर केले तेवढेही आजवर पडत नसल्याने अनुशेषच वाढत गेल्याचे दिसून येते. मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी, विकासाचा समतोल साधण्यासाठी निधी मिळावा, अशी मराठवाडावासीयांची अपेक्षा आहे.

निधीअभावी अनुशेष वाढला

मराठवाड्यात सर्वांत महत्त्वाचा प्रश्न हा सिंचनाचा आहे. साधारणत: १९९४ पासून सिंचन अनुशेषाच्या प्रश्नांवर आवाज उठविला जात आहे. कायम अवर्षणाचा सामना कराव्या लागणाऱ्या मराठवाड्यात सिंचनाचा अनुशेष असूनही तो दूर करण्यासाठी निधी दिला जात नाही; पर्यायाने सिंचनाचा अनुशेष निधी अभावी वाढत असल्याची स्थिती आहे.

चाळीस हजार कोटींचे प्रस्ताव

या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल ४० हजार कोटींहून अधिक रकमेचे प्रस्ताव मंजूर करण्यात येणार असल्याचे समजते. मराठवाड्यातील अनेक सिंचन प्रकल्प अपूर्ण असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे विविध जलसिंचन प्रकल्पांसाठी २१ हजार कोटींची तरतूद अपेक्षित आहे. या बैठकीत कृषी विभागासाठीही ६०० कोटींचे प्रस्ताव येणार असल्याचे समजते. मराठवाड्यात सात वर्षांपूर्वी झालेल्या बैठकीत ५० हजार कोटींच्या निधीची घोषणा करण्यात आली होती.

ही बैठक दुष्काळग्रस्त भागासाठी आहे की महायुतीच्या मंत्र्यांच्या पर्यटनासाठी? आतापर्यंत मराठवाड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकांची पंरपरा ट्रिपल इंजिन सरकारने मोडीत काढली असून, आधी मुख्यमंत्र्यांचा मुक्काम हा ‘सुभेदारी’ या शासकीय विश्रामगृहात असायचा. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुक्काम ३२ हजार रुपये भाडे असलेल्या आलिशान हॉटेलमध्ये असेल.

- विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते

मराठवाडा दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे. तीन तासांच्या बैठकीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे, यातून मराठवाड्याच्या पदरी काही पडण्याची सुतराम शक्यता नाही. हाच खर्च दुष्काळग्रस्तांवर करा. आजपर्यंत सर्व मुख्यमंत्री ‘सुभेदारी’ विश्रामगृहात थांबले मात्र ‘सुभेदारी’ सोडून तारांकित हॉटेलमध्ये राहणारे मुख्यमंत्री औटघटकेचे सुभेदार आहेत.

- खा. संजय राऊत, ठाकरे गटाचे नेते

या बैठकीतून नवीन काही मिळेल असे वाटत नाही. सात वर्षांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील घोषणांची पूर्तता आधी करावी. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१६ मध्ये मराठवाडा विकासाचा ४९ हजार कोटींचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला होता, त्यापैकी १-२ टक्केच कामे झाली आहेत.

- अंबादास दानवे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT