सेलू (परभणी) : राज्यभरात कोरोना संसर्गजन्य रोगाने धुमाकूळ घातल्याने राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ राज्यशासनाने कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी बंद ठेवली. याचाच परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होताना दिसत असल्याने पालकवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
जगभर धुमाकूळ घातलेल्या 'कोरोना' विषाणूने गेल्या वर्षभरात सर्वच क्षेत्रांवर आघात केला असून शैक्षणिक क्षेत्रावर विपरीत परिणाम पहावयास मिळत आहे. पुढारलेल्या देशात पायाभूत सुविधा दर्जेदार व अत्याधुनिक असल्याने तेथील शैक्षणिक क्षेत्रात याचा कमी प्रभाव जाणवत असला तरी आपल्या देशातील बहुतांश भागात शिक्षणाचे तीन तेरा वाजलेले आहेत. सुबक डोक्यातून निघालेल्या ऑनलाइन शिक्षण संकल्पनेतून के.जी. ते पी.जी. शिक्षण आता मोबाईलद्वारे शिकवले जात असून घरामध्ये आता विद्यार्थ्यांपेक्षा पालकांची शाळा भरलेली दिसत आहे. ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या अत्याधुनिक सुविधा जसे की नेटवर्कचे जाळे, मोबाईल स्पीड, माफक खर्च आदी बाबींचा अभाव मोठ्या प्रमाणात अजूनही आपल्याकडे आहे. ग्रामीण भागात तर ऑनलाइन शिक्षण अधिक खडतर झाले असून विद्यार्थी तर विद्यार्थीसोबत पालक सुद्धा मेटाकुटीला येत आहेत.
काही हौशी विद्यार्थी तर पालकांकडे मोबाईलसाठी हट्ट करून फेसबुक व्हाट्सअप या मनोरंजन करणाऱ्या सोशल मीडियावर २४ तास कार्यरत झाले आहेत तर प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत पालकांना तासनसात मोबाईल हातात धरून बसावं लागत आहे. सद्यस्थितीत ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे शाळेला अभ्यासक्रम पूर्ण करण्याची तर विद्यार्थ्यांना घरबसल्या पास होण्याची ओढ लागली असल्याचे निदर्शनास आले आहे.
हा 'कोरोना' संसर्ग कधी थांबेल हे जरी माहीत नसले तरी विद्यार्थ्यांना खेळत बागडत शिक्षण घ्यायचे थांबले आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोबाईलचे ऑनलाइन ज्ञान असले तरी मित्रांसोबत कॉलेज कँटीनला मजा करायला न मिळाल्यामुळे घरी पालकांपुढे बसून ऑनलाइन तासाचा मात्र कंटाळा आलेला आहे.
खर पाहिलं तर सद्यस्थितीत ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे लहान मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होत असून कुटुंबासमवेत असूनसुद्धा मुले एकलकोंडी होत चालली आहेत. गुणवत्ता व संस्कारयुक्त शिक्षण हे शाळेच्या बाकावरच मिळू शकत ते मोबाईलच्या स्क्रीनवर हायटेक शिक्षणाने मिळणार नाही. भविष्यात या शिक्षणामुळे मुले अभ्यासात पास म्हणून मिरवतील मात्र आयुष्यात नापास होण्याची भीती जास्त बळावत चालली आहे. शिक्षण हायटेक व्हावे ही काळाची गरज असली तरी या ऑनलाइन शिक्षणाने गुणवंत विद्यार्थ्यांपेक्षा रोबो जास्त दिसतील.
मी एक गृहिणी असून माझी मुलगी कोरोनामुळे इयत्ता दुसरीचे शिक्षण पूर्ण न करता आता इयत्ता तिसरीचे ऑनलाइन वर्ग मोबाईलवर करत आहे. शाळेने ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू केला असून माझ्या मुलीसह मला तासनतास मोबाईलवर वेळ घालवावा लागत आहे. त्यामुळे मुलीच्या डोळ्यावर आता मोबाईलचा परिणाम होत असून चिडचिड आणि रात्रीची झोप सुद्धा विस्कळीत झाल्याचे दिसत आहे. आम्हाला पालक म्हणून मुलांच्या शिक्षणाबाबत आता काळजी वाटत आहे.
- पूनम पवन मंत्री, गृहिणी, सेलू.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.