लातूर : पिकांवरील विविध रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्याधुनिक फवारणी यंत्राच्या साह्याने करण्यात येत होती. आता त्याच यंत्राने जिल्ह्यातील गावागावांत कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून निर्जंतुकीकरणासाठी फवारणी सुरू आहे. ग्रामपंचायतींकडून पाणी शुद्ध करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या टीसीएल अर्थात ब्लिचिंग पावडरचा यासाठी उपयोग केला जात असून अनेक ग्रामपंचायतींकडून निर्जंतुकीकरणासाठी हायड्रोक्लोराईडची मागणी वाढली आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यात ग्रामपंचायतींना गावांत निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. या निर्जंतुकीकरणासाठी सध्या हायड्रोक्लाराईडचा तुटवडा जाणवत असून ही औषधी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केवळ प्राथमिक आरोग्य केंद्रांनाच उपलब्ध करून दिली आहे. काही दिवसांपूर्वी प्रत्येक आरोग्य केंद्राला पाच लिटरचे प्रत्येकी ७५ कॅनचे वाटप जिल्हा परिषदेने केले असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणखी दोन हजार कॅनची मागणी करण्यात आली असून लवकरच ते उपलब्ध होतील, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली. हायड्रोक्लोराईड औषधी कोणत्याही ग्रामपंचायतीकडे उपलब्ध नाही. बाजारातही ती उपलब्ध होत नसल्याने गावांची अडचण झाली आहे. काही ग्रामपंचातींची औषध खरेदीची ऐपतही नाही. यामुळे संकटाच्या काळात जिल्हा परिषदेने या औषधीचा पुरवठा करावा, अशी मागणी ग्रामपंचायतींकडून होत आहे.
वाचा ः लातुरात सहा ठिकाणी मिळणार शिवभोजन, संचारबंदीत गरजूंना मिळतोय आधार
औषधी खरेदीची मुभा
पाणी शुद्धीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या टीसीएलमध्ये हायड्रोक्लोराईडचे प्रमाण आहे. यामुळे सध्या ग्रामपंचायतींकडून टीसीएलची फवारणी करण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. परगे यांनी टीसीएल फवारणीतून निर्जंतुकीकरण होत असल्याचे सांगितले. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) उदयसिंह साळुंके यांनी निर्जंतुकीकरणासाठी टीसीएलचा वापर योग्य व पूरक नसल्याचे सांगितले. यामुळे ग्रामपंचायतींना उपलब्ध निधीतून दर्जेदार हायड्रोक्लोराईडची खरेदी करण्याची मुभा देण्यात आली असून त्यासाठी सविस्तर सूचनाही दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.