strike
strike sakal
मराठवाडा

Jalna News : अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीही संपात

सकाळ वृत्तसेवा

जालना : जुन्या पेन्शनसाठी शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून संप पुकारला आहे. यात अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचारीही संपावर गेल्याने आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे.

शिवाय दहावी व बारावी बोर्डाची परीक्षा सुरू असताना काही पर्यवेक्षकही संपावर गेल्याचे चित्र आहे. दरम्यान, बुधवारी (ता.१५) जिल्हाधिकारी कार्यालयात कामावर हजर झालेल्या काही कर्मचाऱ्यांना संपकऱ्यांनी काम बंद करून बाहेर काढल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मंगळवारपासून (ता.१४) बेमुदत संपावर गेले आहेत. या संपामध्ये महसुलासह अत्यावश्‍यक सेवा देणारे आरोग्य कर्मचारीही संपावर गेले आहेत. त्यामुळे कंत्राटी आरोग्य कर्मचारी आणि कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांवर भार पडला आहे.

जिल्ह्यात महसूलचे एकूण ९ हजार ६९२ कर्मचारी आहेत. त्यांपैकी २०३ कर्मचारी हे पूर्व परवानगीने रजेवर गेलेले आहेत. तर तब्बल चार हजार ७२० कर्मचारी संपात सहभागी असून चार हजार ७६९ कर्मचारी कामावर असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

याशिवाय अत्यावश्‍यक सेवेत मोडणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयाअंतर्गत एकूण ५७७ कर्मचारी आहेत. त्यांपैकी गट क व गट डचे एकूण ८४ कर्मचारी संपावर आहेत. शिवाय जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रासह आरोग्य विभागातील एकूण ६६८ पैकी ३३० कर्मचारी संपावर केले गेले आहेत.

यात परिचारिका, सेवक, लिपिक, आरोग्य सेवक, सेविकांचा समावेश आहे. त्यामुळे लसीकरण थांबविण्यात आले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा ही कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अवलंबून असल्याचे चित्र आहे. शिवाय जिल्हा स्त्री व बाल रूग्णालयातील १२० कर्मचाऱ्यांपैकी सात कर्मचारी संपावर आहे. या शिवाय जालना नगरपालिकेचे सुमारे २०० कर्मचारी संपावर गेल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्रामुख्याने स्वच्छता कर्मचाऱ्यांचा समावेश असून कंत्राटी कर्मचाऱ्यांवर शहराची स्वच्छतेचा भार पडला आहे. तसेच जिल्ह्यातील दोन हजार ३२२ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीही संपावर गेले आहेत. त्यामुळे दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेचे नियोजन पुन्हा करण्याची वेळ शिक्षण विभागावर आली असून ऐनवेळी पर्यवेक्षक बदलण्यात आले आहेत.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी काही कर्मचारी आपल्या कार्यालयात हजर झाले होते. मात्र, संपकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात फेरी मारत कार्यालयात हजर झालेल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर येण्याचे आवाहन केले, तसेच त्यांना बाहेर आणल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.

आरोग्य विभागाचे वर्ग क, वर्ग डचे ८४ कर्मचारी संपावर गेले आहेत. मात्र, आरोग्य सेवा कुठे ही विस्कळीत झालेली नाही. सर्व वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यामुळे आरोग्य सेवा सुरळीत आहे.

— अर्चना भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक, जालना

शिक्षक संपावर गेलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षकांमध्ये बदल करण्यात आला आहे. परीक्षा सुरळीत सुरू आहे. या संपाचा बोर्डाच्या परीक्षेवर परिणाम नाही.

— मंगल धुपे, शिक्षणाधिकारी, जालना

नगरपालिकेचे २०० कर्मचारी संपावर आहेत. यात स्वच्छतेचे कर्मचारी अधिक आहेत. त्यांना कामावर हजार होण्याचे आवाहन केले आहे. शहरातील स्वच्छता आणि पाणी पुरवठा सेवा सुरळीत ठेवली आहे.

— संतोष खांडेकर, मुख्याधिकारी, नगरपालिका, जालना.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT