जळकोट (लातूर): तालुक्यातील पशुवैद्यकिय केंद्रेच सलाईनवर असल्याची स्थिती असून ४७ गावांतील ५२ हजारांवर पशुधनाची भिस्त केवळ एका पदवीधर डॉक्टरवर आहे. पंचायत समितीत स्वतंत्र पूर्णवेळ पशुधन विकास अधिकारी (विस्तार) नसल्याने ५२ हजारांवर पशुधनाला वाली कोण? असा सवाल विचारला जात आहे. तर फिरते पशुवैद्यकिय रुग्णालय मंजुरीतून का वगळण्यात आले? असा सवाल विचारला जात आहे.
तालुकानिर्मितीला २२ वर्ष होत असली तरी अद्याप पंचायत समितीत स्वतंत्र कायमस्वरूपी पशुधन विकास अधिकारी व स्टाफ उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पशुवैद्यकिय अधिकाऱ्यालाच माहिती द्यावी लागते. त्यांनी पशुधनावर उपचार करायचे का या विभागाची माहिती प्रशासनाकडे वेळोवेळी सादर करायची? हा प्रश्न आहे.
डोंगरी तालुक्यात ४७ गावे असून शेतीला जोडव्यवसाय म्हणून अनेक शेतकरी पशुपालन करतात. विशेष म्हणजे तालुक्यातील अनेकांचा उत्कृष्ट पशुपालन स्पर्धेत पशुपालक म्हणून अनेक ठिकाणी गौरव झाला आहे. आपल्या लेकराप्रमाणे पशुंना सांभाळण्याचा प्रयत्न शेतकरी करतात. अनेकांना तर उत्कृष्ट पशुपालनाचा छंद आहे. जळकोट येथे श्रेणी एकचा व वांजरवाडा, घोणसी, कुणकी, अतनूर, या चार ठिकाणी श्रेणी दोनची पशुउपचार उपकेंद्रे आहेत. तर जगळपूर,उमरगा रेतु, तिरुका, माळहिप्परगा, मंगरूळ या ठिकाणी उपकेंद्राची गरज आहे.
तालुक्यातील पशुधन आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे,
११ हजार ८४३ (गाय बैल), १५ हजार ५५४ (म्हैस), ८ हजार ४४९(शेळ्या) ,४ हजार ४४९ ( मेंढ्या), १२ हजार ९५ (कोंबडे),अशी एकुण ५२ हजार ३९० एवढी संख्या आहे. याशिवाय कुञे, डुकरे,गाढव,घोडे हे वेगळी संख्या असून यात समाविष्ट नाही. असे पशुधन असल्याची माहिती तालुका पशुवैद्यकिय अधिकारी डॉ सुरेखा नामवाड यांनी दै.सकाळ शी बोलताना दिली.
तालुक्यासाठी डाॅ.सुरेखा नामवाड या केवळ एकच पदवीधर डॉक्टर असून उर्वरीत चार ठिकाणी प्रत्येकी एक पर्यवेक्षक व सेवक उपलब्ध असून तेच पशुवर उपचार करतात. प्रत्येक ठिकाणी एक पदवीधर डॉक्टर असणे आवश्यक आहे. तर पंचायत समितीत पशुधन विकास अधिकारी (विस्तार) हे पद भरले नसल्याने सर्व कामे एकाच डॉक्टरवर असल्याचे चिञ आहे. शासकीय बैठका, दैनंदिन रजिस्टर्स भरण्यातच त्यांचा वेळ जातो. त्यामुळे उपचारसेवा देण्यात अडचणी येतात.
श्रेणी-२ च्या केंद्रांना श्रेणी १ मध्ये रुपांतर करण्याची शासनाची योजनाही प्रलंबितच आहे. तर एक्सरे, अथवा तत्सम रुग्णसेवा तालुक्यात उपलब्ध नसल्याने अनेकदा उदगीरच्या पशुवैद्यकिय महाविद्यालयाचा आधार घेण्याची वेळ शेतकरी वर्गावर येते.अनेकदा योग्यवेळी उपचाराअभावी जनावरांचे मृत्यू होतात. त्यामुळे आर्थिक, मानसिक, शारिरिक ञास सहन करावा लागतो. त्यात जळकोट, कुणकी येथे एक पशुधन पर्यवेक्षक, दोन शिपाई, घोणसी येथे एक शिपाई, ही पदे रिक्त असल्याचे सांगण्यात आले.
२. फिरत्या पशुचिकित्सा पथकाचे काय झाले?
शासनाच्या स्तुत्य योजनेनुसार जिल्ह्यातील काही तालुक्यांना फिरते पशुचिकित्सा पथक मंजूर करण्यात आले, यात अगोदर जळकोटचे नाव होते. नंतर मात्र ते वगळण्यात आले. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हा डोंगरी तालुका असूनही असे का घडले? हा प्रश्न अनुत्तरित आहे.विशेष बाब म्हणून या तालुक्याला तात्काळ फिरते पशुचिकित्सा पथक मंजुर करुन कार्यान्वित करावे अशी पशुपालकांची मागणी आहे
पंचायत समितीत पशुधन विकास अधिकारी नसल्याने आवश्यक माहिती पाठवावी लागते. रिक्त पदे असली तरी उपलब्ध कर्मचाऱ्यांवर व पशुधन पर्यवेक्षकावर आम्ही पशुपालकांना प्रामाणिक सेवा देण्याचा प्रयत्न करतो. पशुप्रदर्शन, व इतर शासन योजनाही त्यांच्यापर्यत नेण्याचे उपक्रम आम्ही राबवतो.
-डॉ. सुरेखा नामवाड
(तालुका पशुवैद्यकिय अधिकारी)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.