Manoj Jarange Patil sakal
मराठवाडा

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाचा लढा निर्णायक टप्प्यात, एकजूट कायम ठेवा

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रे देऊन आरक्षण मिळावे, यासाठी मी लढा देत आहे. मला कशाचीही अपेक्षा नाही.

अनिरुद्ध धर्माधिकारी

आष्टी - मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रे देऊन आरक्षण मिळावे, यासाठी मी लढा देत आहे. मला कशाचीही अपेक्षा नाही. आरक्षणाचा लढा निर्णायक टप्प्यात असून, कसे मिळवून द्यायचे ते मी बघतो. या आंदोलनात फूट पाडण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात. परंतु आता नाही तर कधीच नाही, याप्रमाणे आपली एकजूट कायम ठेवा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.

आष्टी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज (ता. सहा) सायंकाळी आयोजित जाहीर सभेत जरांगे पाटील बोलत होते. यावेळी मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, ता. 1 जून 2004च्या शासननिर्णयाप्रमाणे मराठा व कुणबी एकच आहेत. त्यात सुधारणा करून कायदा पारित करून आरक्षण द्या, असा प्रस्ताव मी शासनापुढे ठेवला आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्या. आम्ही लहान-मोठे भाऊ म्हणून राहू, अशी मागणी जरांगे पाटील यांनी शासनाला केली.

मराठा मुलांची शिक्षणासाठी तसेच नोकरीसाठी जी ससेहोलपट सुरू आहे, त्यासाठी हा लढा आहे. समाजातील तरुणांवर बेरोजगारीमुळे आत्महत्या करण्याची वेळ आली आहे हे पाहावत नाही. आरक्षण नसल्याने एका टक्क्यानेही शिक्षणाची व नोकरीची संधी हुकते तेव्हा काय वेदना होतात, हे आता मराठा समाजाला समजायला लागले आहे. मी घरंदाज मराठा आहे. या आंदोलनातून काही मिळेल अशी मला अपेक्षा नाही.

समाजाला मायबाप मानणारा मी असून, समाजाशी कदापि गद्दारी करणार नाही. उपोषण सोडण्याची विनंती करण्यासाठी आलेल्या प्रत्येक मंत्र्याला, जे काही तुम्हाला सांगायचे ते येथेच सर्वांसमोर सांगा. माझ्या कानात नको, असे म्हणत होतो. समाजाला आरक्षण कसे मिळवून द्यायचे, हे माझ्यावर सोडा. फक्त एकजूट होऊन पाठीशी भक्कमपणे उभे राहा, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले.

डास सुद्धा माझ्या नादी लागत नाही...

किरकोळ शरीरयष्टीच्या व आपल्या आंदोलनाने महाराष्ट्र हलवून टाकलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी उपोषणाचा आढावा घेताना सांगितले की, उपोषणामुळे माझे शरीर अशक्त झाले आहे. माझे वजन अवघे 35 किलो आहे.त्यामुळे सध्या डास सुद्धा माझ्या नादी लागत नाहीत.

माझ्या स्वागतासाठी होणा-या गर्दीमुळे मला चालण्याचीही गरज पडत नाही, मी आपोआप पुढे ढकलला जातो, असे सांगत मी कोणालाही न टाळता सर्वांच्या स्वागताचा स्वीकार करीत असल्याचे जरांगे पाटील यांनी आवर्जून सांगितले.

आत्महत्येचे पाऊल उचलू नका

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी माझा लढा सुरू असून, समाजबांधवांच्या भक्कम साथीमुळे हा लढा निर्णायक टप्प्यात आला आहे. यापुढेही ही एकजूट कायम ठेवा. कोणी फूट पाडण्याचा प्रयत्न करू शकते, त्यामुळे सावध राहा. शांततेच्या मार्गाने व कोणतीही जाळपोळ, उद्रेक न होऊ देता हे आंदोलन यशस्वी करायचे आहे. आरक्षणासाठी समाजबांधवांनी आत्महत्येचे पाऊल उचलू नये, असेही आवाहन जरांगे पाटील यांनी केले.

समाजबांधवांची तुडुंब गर्दी, जेसीबीने पुष्पवृष्टी, औक्षण

मनोज जरांगे पाटील यांचे आष्टी शहरात आगमन झाल्यानंतर सुमारे पन्नासहून अधिक जेसीबी मशीनद्वारे त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच फुलांचा गालिचा अंथरुण त्यांचे व्यासपीठावर भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. महिलांनी त्यांचे औक्षण केले. तसेच मोबाईल टाॅर्च दाखवून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. सभेसाठी सकाळपासून गावागावांतून समाजबांधव दुचाकी फे-या काढून आष्टीत दाखल होत होते.

चारही बाजूंचे रस्ते व चौक गर्दीने फुलले होते. भगव्या टोप्या व झेंड्यांमुळे आष्टी भगवीमय झाली होती. टाळ्या व शिट्यांच्या गजरात जरांगे पाटील यांच्या भाषणाला जोरदार दाद देण्यात आली. तत्पूर्वी विविध वक्ते व समाजातील मुलींनी भाषणे करून आरक्षणाची आग्रही मागणी केली. सभेसाठी आलेल्यांना मुस्लिम बांधवांनी पाण्याची व्यवस्था केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Junnar Beef Seized: 'जुन्नरला चार गाई व दोन टन गोमांस जप्त'; जुन्नर पोलिसांची धडक कारवाई

Latest Marathi News Live Update: डाळी उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यास नाफेड मार्फत भारत सरकार ते खरेदी करणार-अमित शाह

OBC Reservation : धनगर समाजाने सत्ता काबीज करुन ओबीसींचं आरक्षण वाढवावं; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला

Mumbai Politics: तीन महिन्यांत ५ भेटी… ठाकरे बंधुंची युती पक्की की अजूनही चर्चा? पाहा सर्वात चर्चेत असलेली राजकीय भेटीची टाइमलाइन

Kojagiri Pournima 2025: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूर मार्ग मंगळवारपर्यंत बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

SCROLL FOR NEXT