औरंगाबाद, : स्मार्ट सिटी योजनेतून सुरू केलेल्या स्मार्ट बससेवेत आता शहरातील विद्यार्थ्यांना प्रवासभाड्यात एसटी महामंडळाप्रमाणेच 66.67 टक्के एवढी सवलत मिळणार आहे. अंध, दिव्यांग यांना 75 टक्के तर त्यांच्यासोबत असणाऱ्या एका साथीदारास 50 टक्के सवलत महापालिकेकडून जाहीर केली जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव बुधवारी (ता.11) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात येणार आहे.
महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेतच्या पॅनसिटी प्रकल्पाअंतर्गत शहरात 100 स्मार्ट बस सुरू करण्याचे नियोजन केले आहे. स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत शहरात 23 जानेवारीला नवीन सिटी बससेवा सुरू झाली. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या सेवेचे लोकार्पण झाले. स्मार्ट सिटी बोर्डाने टाटा कंपनीकडून 100 बस खरेदी केल्या आहेत. टाटा कंपनी टप्प्याटप्प्याने सर्व बसचा पुरवठा करीत आहे; मात्र एसटीकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने आतापर्यंत यातील 54 बसच रस्त्यावर धावत आहेत. उर्वरित बस तशाच जागेवर उभ्या आहेत; मात्र आता लवकरच पूर्ण बस रस्त्यावर धावणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवरच प्रशासनाने एसटी महामंडळाकडून विद्यार्थी, अंध, अपंगांना दिल्या जाणाऱ्या प्रवासभाड्यातील सवलती स्मार्ट बसद्वारेही सुरू करण्याचा निर्णय स्मार्ट सिटीच्या मंडळाने घेतला आहे. त्यानुसार यासंबंधीचा प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेसमोर प्रशासनाकडून ठेवला जाणार आहे. स्मार्ट बसच्या प्रवासभाड्यात विद्यार्थ्यांना 66.67 टक्के, अंध व अपंगांना 75 टक्के आणि त्यासोबतच्या एका साथीदारास 50 टक्के सवलत देण्याचे या प्रस्तावात सूचित केले आहे. शहरात एसटी महामंडळाच्या बस सुरू असताना 2017-18 या आर्थिक वर्षात विद्यार्थ्यांना एक कोटी 27 लाख 99 हजार 614 रुपयांची सवलत मिळाली होती. तर अंध, दिव्यांग व त्यांचे साथीदार यांना 10 लाख 65 हजार 743 रुपये एवढी सवलत मिळाली होती. आता हीच सूट स्मार्ट बस सेवेतूनही देण्याचे नियोजन असून, खर्च मात्र महापालिका तिजोरीतून प्रस्तावित केला जाणार असल्याचे या प्रस्तावात म्हटले आहे.
महिनाअखेरपर्यंत होतील 100 बस
स्मार्ट बससाठी नव्याने 186 चालक-वाहक स्मार्ट बससाठी रुजू होणार आहेत. हे कर्मचारी आल्यानंतर बसची संख्या वाढणार आहे. त्यासाठीचे नियोजन आता अंतिम टप्प्यात आहे. सप्टेंबरअखेरपर्यंत 90 बस रस्त्यावर धावतील; तर 10 बस राखीव ठेवल्या जाणार असल्याची माहिती नुकतीच आयुक्तांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.