वालसावंगी : रब्बी पीक पेरणीसाठी बैलांच्या साह्याने शेत तयार करताना शेतकरी. 
वालसावंगी : रब्बी पीक पेरणीसाठी बैलांच्या साह्याने शेत तयार करताना शेतकरी.  
मराठवाडा

पावसाचे घाव विसरून रब्बीची तयारी 

विशाल अस्वार

वालसावंगी (जि. जालना) -  भोकरदन तालुक्‍यात प्रारंभी पाऊस मेहेरबान राहिला. नंतर मात्र त्याने रौद्ररूपच धारण केले. प्रारंभी सततच्या पावसाने उसंत मिळू दिली नाही. नंतर परतीच्या पावसाने पिकांचे होत्याचे नव्हते केले. शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. आता पावसाचे हे घाव विसरून कशीबशी पैशाची तजवीज करीत शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागला आहे. शेताची मशागत करणे, पेरणीसाठी शेत तयार करण्याची लगबग सुरू आहे. खरीप हंगाम तोट्यातील ठरल्याने आता शेतकऱ्यांची रब्बी हंगामावर सर्व मदार आहे. 

पावसाने केला खरीप पिकाचा घात 
दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांनी खासगी कर्ज काढून, उसनवारी करून खरीप हंगामात पेरणी, लागवड केली; मात्र यंदा बहरलेल्या खरीप पिकाचा घास पावसामुळे हिरावला गेला. खरीप पिके हातची गेली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. अगदी लावलेला खर्चदेखील वसूल झाला नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक अवस्था आणखी बिकट झाली आहे. 

रब्बीसाठी शेतीची मशागत 
वालसावंगी परिसरात गेले काही दिवस पावसाने उघडीप दिली आहे. शिवाय ऊनदेखील चांगले तापत आहे. त्यामुळे रब्बीसाठी शेत तयार करणे सुरू आहे. शेतशिवारांत सध्या रब्बी पिके लागवडीची तयारी सुरू आहे. सकाळपासूनच शेतकरी शेतात कष्ट घेताना दिसत आहेत. रब्बीसाठी शेत मोकळे करण्यासाठी शेतकरी मका, सोयाबीन सोंगणी करण्यावर भर देत आहेत. 

हरभरा, गहू लागवडीकडे कल 
सततचा पाऊस झाल्याने परिसरात पाणी उपलब्ध झालेले आहे. सिंचनाची चांगली सोय असल्याने परिसरात हरभरा, गहू लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर कल आहे. शिवाय काही शेतकरी मका, भाजीपाल्याचे देखील उत्पन्न घेण्याची तयारी करीत आहेत. 

पैशांची तजवीज करताना दमछाक 
खरीप पिके हातची गेल्याने, तसेच गेल्यावर्षीही हाती काहीच लागले नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे नातेवाईक यांच्याकडून उसने पासने पैसे आणून, रब्बीचे बी-बियाणे उधारीवर आणून ताळमेळ केला आहे. पीकविम्याचे पैसे, शासनाची नुकसानभरपाई रब्बी पिकाच्या तोंडावर मिळाल्यास मोठ्या प्रमाणावर पैशाची टंचाई दूर होण्यास मदत होईल. त्यामुळे तातडीने मदत देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. 

यंदा बहरलेली खरीप पिके सततच्या पावसामुळे वाया गेली. त्यामुळे मोठे नुकसान झाले. आता रब्बी पिकासाठी शेत तयार करीत असून, या पिकांतून दोन पैसे मिळतील अशी आशा आहे. 
- नारायण गवळी, शेतकरी 
------- 
रब्बी हंगामासाठी पैशांची तजवीज करताना अडचणी येत आहेत. बियाणेदेखील उधारीवर आणले आहे. निदान रब्बी पिकाच्या वेळी तरी पावसाने हजेरी लावू नये. प्रशासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्यांना कर्ज सहज उपलब्ध व्हावे. 
- रामदास बोडखे, शेतकरी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Russia-Ukraine War: मानवी तस्करी प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, रशियन नागरिकासह चौघांना अटक

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 08 मे 2024

ढिंग टांग : अस्सावा सुंदर नोटांचा बंगला..!

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT