उमरगा (जि.उस्मानाबाद) : उमरगा शहर व ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढत चालला आहे. गेल्या पंधरा दिवसात पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या बेधडक येत आहे. बुधवारी (ता. पाच) पाठविलेल्या ४२ स्वॅबचा अहवाल गुरुवारी (ता. सहा) रात्री अकरा वाजता प्राप्त झाला असून त्यात २७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. शुक्रवारी (ता.सात) घेण्यात आलेल्या अँन्टीजेन टेस्टमध्ये चार रुग्ण आढळून आले तर गुरुवारी पाठविलेल्या स्वॅबचा अहवाल शुक्रवारी रात्री आला त्यात २१ पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे गेल्या ४८ तासात तब्बल ५२ जण पॉझिटिव्ह आले असून आता रुग्णसंख्या ५४१ वर पोहचली आहे.
शहर व तालुक्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. शंभरात किमान साठ व्यक्ती पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत, कांही लक्षणे नसले तरी पॉझिटिव्ह अहवाल येत असल्याने लोकांना अजब वाटत आहे, त्यामुळे तपासणीला जाण्यासाठी कांही लोकांची नकारात्मक मानसिकता दिसत आहे. बुधवारी उमरग्यातुन पाठविलेल्या २९ स्वॅब पैकी २१ तर मुरूममधून पाठविलेल्या तेरा स्वॅब पैकी सहा जण पॉझिटिव्ह आले आहेत. आता शहरात एकुण ३५५ ( ३६५ ) तर ग्रामीणमध्ये १६५ ( १७६) संख्या झाली आहे. त्यात सोळा जणांचा मृत्यू झाला असून अडीचशेहुन रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत.
सध्या उपचारासाठी दाखल झालेल्या २६४ रुग्णसंख्येत आणखी वाढ झाली आहे. गुरुवारी रात्री आलेल्या २७ पॉझिटिव्ह मध्ये शहरातील पतंगे रोडचे सहा, बालाजी नगरच्या नऊ जणांचा तर मुरुमचे सहा, माडजचे दोन आणि नाईचाकुर, जकेकुर, गुंजोटी, तुरोरी येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शुक्रवारी उमरग्यातील ५२ अँन्टीजेन टेस्टमध्ये तहसीलमधील एम.आर.जी.एस. विभागातील ऑपरेटर व एक लिपीक तर खाजगी रुग्णालयातील पॉझिटिव्ह आलेल्या आष्टा (कासार ता. लोहारा) येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर मुरुममध्ये सोळा टेस्टमध्ये एका बँकेचा शाखाधिकारी पॉझिटिव्ह आला आहे.
दरम्यान शुक्रवारी साडेआठ वाजता प्राप्त झालेल्या २१ पॉझिटिव्हमध्ये उमरगा शहरातील बालाजी नगर, काळे प्लॉट येथे प्रत्येकी तीन, पतंगे रोड येथे दोन तर उपजिल्हा रुग्णालयातील महिला कर्मचारी व गौतमनगरमधील एक पॉझिटिव्ह आला आहे. ग्रामीणमध्ये गुंजोटीत पाच, तुरोरीत तीन, कोरेगाववाडी, कराळी व निलंगा तालुक्यातील हत्तरगा येथील प्रत्येकी एक जण पॉझिटिव्ह आला आहे.
अँन्टीजेन टेस्ट वाढवण्याची गरज
शहरात व ग्रामीण भागात पसरत चालला संसर्ग आटोक्यात येण्यासाठी स्वॅब घेण्यात येत असले तरी गतीने चाचण्या होण्यासाठी अँन्टीजेन टेस्टची संख्या वाढवण्याची गरज आहे. जिल्ह्यासाठी भरपूर किट्स उपलब्ध झाल्या आहेत. शहरातील व्यापाऱ्यांच्या तपासणीत अनेक जण पॉझिटिव्ह आले होते, अन्य व्यापाऱ्यासह भाजी विक्रेत्यांचीही चाचणी घेणे आवश्यक आहे. दरम्यान शहरातील मिनाक्षी मंगल कार्यालयातील कोरोना केअर सेंटरमध्ये बेडची सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. बऱ्याच पॉझिटिव्ह रुग्णांना होम क्वारंटाइन करण्यापेक्षा या ठिकाणी सोय केली तर गल्लोगल्ली घरात रहाणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णा विषयीचा नागरीकांचा गैरसमज दूर होईल.
संपादन-प्रताप अवचार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.