धरीला मनी नाद जरा अन् पुन्हा जागी बसवला दात खरा. खूप आनंद मिळाला.
नातवंडांसह भटकायला निघालो. खंडाळ्यात सगळ्यांना चिक्कीचा एकेक तुकडा दिला. चिक्कीचा कडक तुकडा खाताना माझा एक दात चिक्कीत रुतून बसला. चिक्की खाता येईना. चिक्की ओढून काढताना तो चिक्कीसकट बाहेर आला. माझी ती अवस्था पाहून नातवंडं हसायला लागली. दंतपंक्तीत खिंडार पडले. जिभेने ते जाणवले. मोठे सहानुभूती दाखवत मनातून हसत होते. मी मात्र तो चिक्कीचा तुकडा दातासह खिशात ठेवला. सहल आनंदात पार पडली. रुतलेला दाताचा तुकडा मला स्वस्थ बसू देत नव्हता. जीभ वारंवार दाताच्या खिंडारातून फिरत होती. मग श्रावणात अनेक व्रतापैकी एक मौन व्रत स्वीकारून खिंडारावर ओठांचा पडदा टाकला. हा दात जतन करावा, असे मनात आले. कित्येक पूर्वजांनी दात, केस, शवसुद्धा जतन करून ठेवले आहेत. एकदंत म्हटले की मनात श्रीगणेश, वराह अवताराच्या सुळक्यावर तोललेली पृथ्वी आली. दात दाखवणे, दात धरणे, दात घशात घालणे, बत्तिशी तोडणे, दातावर पडणे हे जमते. पात्र रंगवताना त्या पात्राचे सुळे मोठे दाखवून योग्य तो परिणाम साधता येतो. वेडेवाकडे फराळे दात म्हणजे मनाची विकृती. मनाच्या भावना दाताच्या रेषांनी दाखविता येतात. असा सगळा विचार करता शरीराची ही अमौलिक वस्तू जतन करण्याचा मी ध्यास घेतला.
घरी आलो. चिक्कीतून दात काढायचा प्रयत्न केला. तेथेही तो अडून बसला. चिक्की बत्याने कुटून त्याला अलगद बाहेर काढला. अंगठीच्या छोट्या बॉक्समध्ये ठेवून दिला. बरेच दिवस ती आठवण जात नव्हती. शेवटी ती दाताची पेटी तज्ज्ञ डॉक्टरांसमोर ठेवली. मला हाच दात त्या जागी बसवायचा आहे, ही विनंती डॉक्टरांनी मान्य केली. वेळ व पैसा थोडा जास्त लागला; पण बळजबरीने पडलेली वस्तू परत त्याच जागी सुखरूप ठेवण्याचा आनंद काही औरच वाटला. आता पुन्हा पुन्हा आरशात बघून दात विचकून हसतो आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.