मुक्तपीठ

कालाय तस्मै नमः!

मंगला साठे

हवाई दलात प्रवेश कसा करायचा, हेही भुसावळमधल्या मुलाला माहीत नव्हते. त्याने माहिती मिळवत हवाई दलात प्रवेश मिळवला. तेथे नाव मिळवले आणि देशासाठी मरणही पत्करले.

पंकजला संरक्षण क्षेत्रात काम करायचे होते. विशेषतः हवाई दलाचे आकर्षण होते. पण, हवाई दलात जायचे कसे, हे भुसावळसारख्या गावात आम्हाला कळत नव्हते. आता बत्तीस वर्षांनीही या परिस्थितीत फार फरक पडला असेल असे नाही. पंकजने पुणे विद्यापीठातून पदवी मिळवताना भौतिकशास्त्रात सुवर्णपदक प्राप्त केले होते. लगेचच तो तंत्रशिक्षण महाविद्यालयात अध्यापक म्हणून रुजूही झाला होता. पण हवाई दलाची ओढ कायम होती. दरम्यान, त्याने माहिती मिळवली व आवश्‍यक परीक्षा दिली. लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर पुढील निवडीसाठी अलाहाबादला बोलावण्यात आले. तेथे कसून चाचण्या झाल्यावर त्याची हवाई दलात निवड झाली.

हैदराबादमधील एक वर्षाचे प्रशिक्षण अतिशय कठीण होते. पहाटे पाच वाजता दिवस सुरू व्हायचा. प्रशिक्षण संपल्यानंतर हैदराबाद येथेच पासिंग आउट परेड होती. तत्कालीन लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या हस्ते पंकजला "पायलट ऑफिसर'ची पदवी देण्यात आली. (आता "फ्लाइंग ऑफिसर'ची पदवी मिळते.) पंकजचे पहिले रुजू व्हायचे ठिकाण होते दूर आसाममध्ये तेजपूर येथे. पुढे पंजाब, गुजरात, राजस्थान, दिल्ली, कोईमतूर, श्रीनगर, सुदान असे बऱ्याच ठिकाणी पोस्टिंग झाले. पंकजने त्याच्या हवामान विभागाच्या शाखेत अतिशय चांगले नाव मिळवले होते. कारण त्याचे हवामानाचे अंदाज अचूक असत. विमानचालकांना उड्डाण करण्यास अनुकूल हवामान आहे अथवा नाही, हे तो अचूक सांगत असे. पंकज साठेने हिरवा झेंडा दाखवल्यावरच वैमानिक उड्डाण करायचे. एवढेच काय, स्थानिक लोकसुद्धा हवामानाचे अंदाज पंकजला विचारायचे. तो अगदी इतक्‍या वेळेपासून इतक्‍या वेळेपर्यंत पाऊस राहील आणि अमुक वेळी उघडीप राहील, असे अचूक सांगत असे. अतिशय हसतमुख आणि सर्वांना मदत करणारा होता माझा मुलगा.

पंकज हवामान खात्यात काम करत असला, तरी त्याने अतिशय महत्त्वाचा फोटो इंटरप्रिंटरचा अभ्यासक्रमही पूर्ण केला होता. अतिशय कमी अधिकारी हा अभ्यासक्रम पूर्ण करतात, त्यामुळे त्याला कायमच "ऑपरेशनल बेसेस'वर महत्त्वाची कामगिरी करण्यास बोलावण्यात येत असे. सुदानमध्ये दुर्गम भागातही त्याने काम केले. त्याने भारतियार युनिव्हर्सिटी, कोईम्बतूरहून हवामानसंबंधीत विषयात एम.फिल. केले होते. एम.फिल. गाइड म्हणूनही काम केले होते. नंतर राजस्थान, गुजरात, सौराष्ट्र, कच्छ भागात "नैर्ऋत्य पावसाच्या दरम्यान होणारी अतिवृष्टी' हा विषय घेऊन पीएच.डी.चा अभ्यास सुरू केला होता. कोईम्बतूरमध्ये असताना त्याने मिड लेवल ऑफिसर्सच्या प्रशिक्षण पद्धतीत महत्त्वाचा बदल केला होता. चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आणि टेबल टेनिस, लॉन टेनिस, स्क्वॅश व क्रिकेट हे खेळही तो उत्तम खेळत असे.

तो विद्यार्थिप्रिय शिक्षक होता आणि सर्वांना प्रोत्साहन देण्याची त्याची कला वाखाणण्याजोगी होती. भुसावळमधील त्याचा एक मित्र हवाई दलाच्या पहिल्या चाचणीतच दोन वेळा अनुत्तीर्ण झाल्याने खूप निराश झाला. तेव्हा पंकजनेच त्याला प्रोत्साहन दिले, त्याचा अभ्यास करवून घेतला आणि त्या मित्रानेही हवाई दलात छान सर्विस केली. हवाई दलात फारच कमी संख्येने मुले येतात. किंबहुना विद्यार्थ्यांना या क्षेत्राबद्दल फारच कमी माहिती आहे. त्यामुळे या क्षेत्रात कारकीर्द घडवण्याचा विचार खूपच कमी मुले करतात. परिणामी, हवाई दलात अधिकाऱ्यांची पदे रिक्त राहतात, हे पंकजच्या लक्षात आले. कोईम्बतूरला "एअरफोर्स ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉलेज'मध्ये असताना त्याने एक मोटारसायकल मोहीम काढली. या मोहिमेतील सर्वांनी अस्मानी रंगाचा ट्रॅक सूट घातला होता. याच रंगाच्या व कॉलेजचे नाव असलेल्या कॅप डोक्‍यावर चढवलेल्या होत्या. ही मोहीम कोईम्बतूर ते मदुराई अशी होती. मार्गावरील प्रत्येक महाविद्यालयात जाऊन या टीमने हवाई दलाबद्दल विस्तृत माहिती दिली. कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य आणि पालक या सर्वांना माहिती दिली. हवाई दलाविषयी जागृती करण्याचा त्यांचा उद्देश सफल झाला. त्या वर्षी जास्त विद्यार्थी या क्षेत्रातल्या परीक्षेला बसले. केवळ हवाई दलातच नव्हे, तर लष्करात व नौसेनेत अधिकारीपदासाठी त्या वर्षी दक्षिण भारतातील मुलांनी मोठ्या संख्येने परीक्षा दिली होती.

एका मोहिमेवर असतानाच ग्रुप कॅप्टन पंकज साठे याचे 2014मध्ये निधन झाले. तब्बल 29 वर्षे तो मातृभूमीची सेवा करीत होता. त्याचे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वीस पुष्पचक्रे पंकजला वाहण्यात आली होती. बंदुकांची फैर हवेत झाडून सलामी देण्यात आली होती. मुलाने अखेरपर्यंत देशसेवा केली, याचा मला सार्थ अभिमान वाटतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

SCROLL FOR NEXT