sane guruji
sane guruji 
मुक्तपीठ

जगाला प्रेम अर्पावे

सतीश दगडूलाल जैन


गुरुजींचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. त्या ठिकाणी खोताचे काम ते करीत असत. खोताचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होती. ही पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की, सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले. अशा रितीने बडे घर पण पोकळ वासा झालेल्या या घराण्यात 24 डिसेंबर 1899 रोजी पांडुरंग सदाशिवांचा जन्म झाला. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. त्यांनी इंग्रजी साहित्यामध्ये एम. ए. ही उच्च पदवी मिळवली होती. 

शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरुजींनी अमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून सहा वर्षे (1924 ते 1930) नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतीगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्र येथे त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला. 

इ.स. 1928 साली त्यांनी "विद्यार्थी' हे मासिक सुरू केले. त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत असत. इ.स. 1930 साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. त्यांनी 'कॉंग्रेस' नावाचे साप्ताहिक काढणे, दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न करणे, जळगाव जिल्ह्यातील फैजपूरयेथील कॉंग्रेस अधिवेशन (1936) यशस्वी होण्यासाठी कार्य करणे, इ.स. 1942 च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार या माध्यमांतून त्यांनी राजकीय कार्य केले. फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचारसरणी अनुसरून त्यांनी 'मैला वाहणे' व ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली. त्यानी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली. "पत्री' या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून त्यांनी देशभक्तिपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील बलसागर भारत होवोसारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या. 
समाजातील जातिभेद, अस्पृश्‍यता यासारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी 1946 च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला. या भूमिकेला पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांनी या मुद्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. "एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले,' असे त्या वेळी म्हटले गेले. 

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले. स्वातंत्र्यानंतर आंतरभारती चळवळीच्या मार्गाने त्यांनी भारतजोडण्याचा प्रयत्न केला. विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते. ते स्वतः तमिळ, बंगाली आदी भाषा शिकले होते. 
1948 मध्ये त्यांनी "साधना' साप्ताहिक सुरू केले. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, लेख, निबंध, चरित्रे, कविता यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो. मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात. त्यांनी एकूण 73 पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. श्‍यामची आईही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली. आचार्य विनोबा भावे-रचित "गीता' प्रवचनेसुद्धा विनोबा भावे यांनी धुळे येथील तुरुंगात (1932) सांगितली व साने गुरुजींनी लिहिली. याच धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल सुमारे 15 महिन्यांचा तुरुंगवास भोगला. तसेच पुढे बंगलोर येथील तुरुंगात असताना त्यांनी तिरुवल्लिवर नावाच्या कवीच्या 'कुरल' नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर केले. नंतर फ्रेंच भाषेतील Les Mis्नrables या कादंबरीचे 'दु:खी' या नावाने मराठीत अनुवादन केले. डॉ. हेन्‍री थॉमस या जगप्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञाच्या The story of human race या पुस्तकाचे मराठीत "मानवजातीचा इतिहास' भाषांतर केले. "करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे' हे गुरुजींच्या जीवनाचे सार होते. मनोरंजनातून मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी गुरुजींनी अनेक पुस्तके लिहिली. साने गुरुजींचे भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मावर निरतिशय प्रेम होते. त्यानी भारतीय संस्कृती हा ग्रंथ लिहिला. तसेच भारतीय संस्कृतीतील अनेक महापुरुषांची चरित्रे लिहिली. त्यांचे 'मोरी गाय' हे पुस्तक प्रसिद्ध आहे. मातृहृदयी गुरुजींनी आई वडिलांच्या प्रेमावर "मोलकरीण' नावाची अप्रतिम कादंबरी लिहिली ज्यावर पुढे जाऊन मराठी चित्रपट निघाला. गुरुजींनी लिहिलेली 'खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे' ही कविता 

जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित 
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे 
जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती 
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे 
समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा 
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे 
सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल 
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे 
कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे 
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे 
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी 
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे 
असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या 
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे 
भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात 
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे 
असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे 
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे 
जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा 
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे 

ही कविता भारतीय संस्कृतीची द्योतक आहे. त्यांनी आपल्या प्रेमळ व्यक्तित्वाने पुढील पिढीतील थोर व्यक्तित्वे घडविली. त्यात एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, मधु दंडवते, ग. प्र. प्रधान, प्रकाशभाई मोहाडीकर, प्रा. प्र. द. पुराणिक, वा. रा. सोनार, सी. एन. वाणी, शांतीलाल पटणी, यदुनाथ थत्ते, राजा मंगळवेढेकर, रा. ग. जाधव, दादा गुजर यांचा प्रामुख्याने उल्लेख करावासा वाटतो. 
1930 मध्ये साने गुरुजी त्रिचनापल्लीच्या तुरुंगात होते. त्यावेळी दक्षिणेकडच्या अनेक भाषातज्ज्ञांशी त्यांच्या संबंध आला होता. अनेक भाषांचे वैभव आपल्याला अज्ञात असल्याचे त्यांना जाणवले. आपण भारतात राहत असूनही इथल्या वेगवेगळ्या प्रांतांत बोलल्या जाणाऱ्या भाषांची माहिती आपल्याला नसते; या भाषा शिकायच्या असल्यास तशी संस्थाही आपल्याकडे नाही याची खंत नेहमी साने गुरुजींना वाटायची. यातूनच 'आंतरभारती'ची संकल्पना त्यांना सुचली. 

प्रांतीयता या भारतीयाच्या एकत्वाला बाधक ठरणार असे त्यांना वाटू लागल्यामुळे त्यांनी प्रांताप्रांतांतील द्वेष नाहीसा होऊन सर्व बंधुत्वाचे वातावरण वाढावे, यासाठी निरनिराळ्या प्रांतातील लोकांना परस्परांच्या भाषा शिकाव्यात, चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतरभारतीचा प्रयोग करून पाहण्याचे ठरविले. त्यासाठी पैसा जमवून निरनिराळ्या प्रांतीय भाषा शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनाप्रमाणे काही सोय करावी; ही मनीषा त्यांनी महाराष्ट्र साहित्य संमेलनामध्ये याच ठरावावर बोलताना व्यक्त केली होती. त्यासाठी त्यांनी काही पैसाही गोळा केला होता. पण हे कार्य अपुरे असतानाच 11 जून 1950 रोजी त्यांनी आत्महत्या केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Virat Kohli : 'तुमच्यापेक्षा माझा खेळ मी अधिक जाणतो म्हणूनच....' विराट कोहलीने टीकाकारांना दिले उत्तर

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

SCROLL FOR NEXT