Muktapeeth 
मुक्तपीठ

नांदत्या घराची किंमत... 

मधुरा दाते

वृद्धाश्रम ही आजची गरज आहे. तेथे सगळे काही मिळते. तरीही 'नांदत्या घरा'चे सुख नाही मिळत. या नांदत्या घरात वावरण्याचे, स्वयंपाकघरातील सत्तेचे चार क्षणही सुखवणारे ठरतात. 
 

कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत अनेक कंपन्या हल्ली सामाजिक समस्या आणि सामाजिक गरज याच्याशी निगडित उपक्रम राबवत असतात. असाच एका कंपनीचा सामाजिक उपक्रम म्हणून दिवाळी मेळावा आयोजित केला होता तो एका वृद्धाश्रमात. गमतीशीर स्पर्धा, बालपणीच्या आठवणी जागृत करणारे खेळ आणि सुग्रास जेवण असे त्या कार्यक्रमाचे स्वरूप होते. तब्बल चार तास या आजी-आजोबांबरोबर होतो. आयोजनात असणाऱ्या आम्हा पंचवीस जणांना खूप कृतकृत्य झाल्यासारखे वाटत होते. फार मोठे काहीतरी आजी-आजोबांसाठी केल्यासारखे वाटून आम्ही जरा हवेतच गेलो होतो. त्यांना दिलेल्या भेटवस्तू, मिठाई, देणगीचा चेक हेच आमच्या लेखी खूप मोठे कर्तृत्व गाजवणे होते. 

त्या कार्यक्रमाची छायाचित्रे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच पेनड्राइव्हमध्ये पाठवतो असे व्यवस्थापकांनी सांगितले होते. वाटले, कोणी ऑफिस बॉय येईल पेनड्राइव्ह घेऊन. मी दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचीच वाट बघत होते. साधारण साडेसातच्या सुमारास मोबाईल वाजला. जरा थकलेला, पण मार्दवपूर्ण असा एका आजींचा आवाज पलीकडून ऐकू आला, ''मी आलेय फोटो घेऊन. डेक्कनच्या बस स्टॅंडवर उतरलेय. पत्ता समजावून सांगता का?'' 

अरे बाप रे...एवढ्या वयस्क आजी पेनड्राइव्ह घेऊन आल्या! मी माझ्या लेकीला गाडीने पिटाळले त्यांना आणायला. टू व्हिलरवर बसून आजी आल्या. फिकटसे नऊवारी पातळ, सुपारीएवढा अंबाडा, हसतमुख चेहरा, हातात मोबाईल आणि पेनड्राइव्ह छोट्याशा बटव्यात. आजी घरात आल्या. थोडे सावरूनच हॉलमध्ये सोफ्यावर बसल्या. वृद्धाश्रमातील वातावरण, तिथले सहयोगी, तिथे मिळणारे औषधोपचार सगळ्याबद्दल अगदी भरभरून बोलल्या. कमालीची बाब म्हणजे येऊ घातलेल्या निवडणुका, बदललेले सामाजिक-राजकीय वातावरण, पुण्याचे बदललेले हवामान, कितीतरी विषयांवर आजी बोलत होत्या. ''तुम्ही पुण्याच्याच का?'' मी त्यांना विचारले. पण संभाषणाची गाडी आता वैयक्तिक विषयावर आल्याचे पाहून आजीनी खूप चतुराईने संभाषणाला सुरेखसे वळण दिले. आजी दूरचित्रवाणी आणि वाचन याद्वारे जगाशी संपर्क ठेवून होत्या. नव्या काळाशी स्वतःला जोडून होत्या. गमतीची गोष्ट म्हणजे माझा व्हाट्‌सऍप नंबर घेतला अन्‌ तत्क्षणी 'हॅलो मधुरा' म्हणून छानशी 'स्मायली' पण पाठवली. 

ब्रेकफास्टची वेळ होती. नवरा ग्राउंडवरून दहा मिनिटांत येणार होता. मी बटाटे पोह्यांची तयारी करून ठेवली होती. मला कंपनीत छायाचित्र आणि बातमी पाठवायची होती. लेक पसार झाली काहीतरी काम काढून. शेवटी मी डायनिंग टेबलवर लॅपटॉप घेतला नि गॅसवर कढई ठेवली. माझी धांदल पाहून आजी म्हणाल्या, ''मी करते गं पोहे, तू निश्‍चिंतपणे तुझे काम हातावेगळे कर.'' मी जरा संकोचले, पण पर्याय नव्हता म्हणून तेथून बाजूला झाले. माझे काम होईस्तोवर पोहे तय्यार. भरपूर ओले खोबरे आणि कोथिंबीर घालून आजींनी मस्त पोहे केले होते. हक्काने पापड मागून घेतले. मी भाजते म्हटले तर म्हणाल्या, ''थांब, मी तळते की...'' 

एव्हाना लेक आणि नवरा घरी आले. आम्ही एकत्र ब्रेकफास्ट करायला घेतला. आजींच्या हातचे चविष्ट पोहे खाऊन घरातले खूश झाले. माझ्या नवऱ्याशी आणि लेकीशीही त्यांच्या मस्त गप्पा सुरू झाल्या. 'जाते जाते' म्हणणाऱ्या आजी जेवण करूनच निघाल्या, इतका आग्रह माझ्या माणूसवेल्हाळ लेकीने आणि नवऱ्याने त्यांना केला. आजी नातीबरोबर रमल्या होत्या. आजीने खान्देशी भरीत करून नातीच्या आणि जावयाच्या आग्रहाला पोच दिली. 

त्या निघाल्या, तसे मी जरा संकोचून आजींना म्हटले, ''आजी, खूप त्रास घेतलात हो.'' 

आजी जे उतरल्या त्यात समाधान होते आणि वेदनाही. त्या म्हणाल्या, ''लेकीकडे कसला गं आलाय त्रास? खरे सांगू, नांदत्या घरात खूप दिवसांनी वावरले. बाईची सत्ता स्वयंपाकघरात असते. तुझ्या स्वयंपाकघरातही हक्क दाखवला...खूप छान वाटले गं.'' 

या एका वाक्‍यात मीच रडवेली झाले. ''पुन्हा याल ना?'' त्या उत्तरादाखल किंचित हसल्या अन्‌ म्हणाल्या, ''परमेश्‍वराची इच्छा.'' 

खरे तर सणासुदीला पाव्हण्यारावळ्यांचा जरा जास्त राबता झाला की मी वैतागायची. पण आजींच्या 'नांदत्या' या एका शब्दाने मला घराची किंमत कळली. दिवाळीनिमित्ताने आजीची आठवण झाली. दिवाळी फराळाला त्यांना दिवसभरासाठी बोलवावे म्हणून फोन केला तर आजी त्यांच्या 'हक्काच्या घरी' चार दिवसांसाठी गेल्याचे कळले. छान. मला त्याचाही आनंद झाला. त्याचवेळी मनात आले, दिवाळी चारच दिवस असते की, थोडीच वर्षभर राहते?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील एक कोटी महिलांना लखपती बनविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

Raj Thackeray : पुराणमतवाद्यांना शिंगावर घेणारे आजोबा! राज ठाकरेंनी शेअर केला प्रबोधनकरांसोबतचा लहानपणीचा फोटो; जयंतीनिमित्त सांगितली आठवण

IND vs PAK: सूर्यकुमारचा अपमान करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूच झाला ट्रोल; आता म्हणतोय, आफ्रिदीला कुत्रा म्हणणाऱ्या इरफान पठाणला...

Mumbai News: आझाद मैदानाशेजारील दुकानं बंद होणार, स्टॉलधारकांवर पालिकेचा कारवाईचा बडगा

दीड वर्षही झालं नाही आणि झी मराठीची आणखी एक मालिका घेणार निरोप? अभिनेत्रीच्या भावुक पोस्टमुळे चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT