Vijay-Desai 
मुक्तपीठ

गोव्याच्या भूमीत...

विजय देसाई

गोव्यात सुशेगात होतो. आकाशाच्या निळ्या तुकड्याने घराबाहेर काढले. लाल वाटेने निघालो. दिलखेचक दृश्‍य होतं समोर... तोच तो आला समोर आनंदपिसारा फुलवून.

एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात गोव्यात पोचलो. सगळीकडे उन्हाचं चकचकीत साम्राज्य, घराभोवतीच्या माडपोफळी, आंबा, फणस, जांभळीच्या गर्दीनं सौम्य झालेलं, पण ठिकाण (बागायत) सोडून राज्य महामार्गावर आलं, की वितळल्यासारखा घाम फुटायचा आणि अंघोळीवर पाणी पडायचं. हे सर्व स्वीकारलं, की गोव्याचं निरागस सौंदर्य वर्षातून अनेक वेळा इथं यायला भाग पाडतं.

घरातल्या काही कार्यामुळे दोन दिवस घरात थांबलो. तिसऱ्या दिवशीही विश्रांती घ्यायचा विचार होता. गोव्यात आल्यावर कौलारू घराच्या आणि घरातल्या स्वागतोत्सुक माणसांच्या सहवासात मन सुशेगात होतं आणि पाठ टेकताक्षणीच गाढ झोप लागते. 

सकाळी लवकर जाग आली. अंथरुणातूनच भिंगातून (छपरात उजेडासाठी बसविलेल्या काचेतून) झाडांच्या गर्दीतून सुटलेला आकाशाचा निळाभोर तुकडा किंचित उजळलेला दिसला आणि राहावलं नाही. उठलो, कपडे करून पायात चप्पल सरकवून बाहेर पडलो. बाहेर पडताना बरोबर नेहमी कॅमेरा असतो. पण का कुणास ठाऊक त्या वेळी तो घ्यावासा वाटला नाही. काही वेळेस निसर्ग आणि आपण यात कोणताही अडसर नको वाटतो. बाहेर आलो.

माडपोफळीच्या गर्दीतून सुटलेल्या पाऊलवाटेनं राज्य महामार्ग गाठला. रस्ता पार करण्यासाठी वाहनं पाहताना उजवीकडे पाहिलं, तर रस्त्याच्या कडेला पूर्वेकडं भगवा, केशरी गुलमोहोर पिसाऱ्यासारखा जमिनीकडे झुकला होता. मागे तशाच रंगाचे सूर्यबिंब वर येत होतं. वेगातल्या वाहनांमधून शिताफीनं रस्त्याचा पैल गाठला. दोही बाजूंनी लाल कौलारू चिऱ्याची घरं. काही सिमेंटचीही बैठी घरं. ओसरीवरून लाल कोब्याच्या पायऱ्या खाली अंगणात उतरलेल्या, वाळत घातलेल्या सोलांनी (कोकम) अंगण व्यापलेलं, कुंपणाच्या कडेने अबोली फुललेली. पलीकडून पडलेल्या उन्हामुळं जास्तच नाजूक झालेली आणि कुंपणाच्या आत कुठंतरी फुललेल्या मोगरीचा मंद दरवळ सकाळच्या शांत वातावरणात. थोडं पुढे गेल्यावर वस्ती संपली. लाल मातीचा रस्ता उताराला लागला. रस्त्याच्या दोन्ही बाजूकडून लालसर खडकही उतरत गेलेले. डावीकडे खडकांशी पायाशी पाण्याचा नैसर्गिक प्रवाह. खाली पाण्याची नैसर्गिक कुंडं आणि आजूबाजूच्या वाड्या-वस्त्यांवरील पाण्यात खेळणारी छोटी मुलंही नैसर्गिक अवस्थेतच होती. गच्च माडांनी पाणवठ्यावर सावली धरली होती. मस्त मजेशीर दृश्‍य होतं. पुढे पाऊलवाटेनं आकर्षकपणे उजवीकडे वळण घेतलं. वाटेच्या दोन्ही बाजूला किंचित खाली हिरवीगार शेती. त्यात पसरलेलं पाणी उन्हात चमकत होतं. बिलोरी ऐन्यागत. त्या हिरव्या मंचावर शुभ्र बगळ्यांचा लांबवर पसरलेला थवा.

नक्षीदार, मुक्त रांगोळीसारखा. खेकडे पकडण्यात मग्न. वरून खंड्याची सुसाट निळी झेप. सोबतीला गर्द झाडीत असंख्य पक्ष्यांची  प्रातःकालीन सुरेल मैफल, वाटचाल सुरूच होती, पण गुंतलेलं मन यातून बाहेर पडणं अशक्‍य. थोडं पुढे नीरव शांततेत अचानक उंच घनदाट झाडांच्या पसाऱ्यातून फाडफाड आवाज करत चार-पाच, खूप मोठ्या आकाराचे असावेत, पण लांब असल्याने ओळखू न आलेले पक्षी उडून गेले. पण, पुढे काही क्षणातच उलगडा झाला. काही अंतरावर नजरेच्या टप्प्यात एका शांत जलाशयावर झाडाची फांदी आडवी आली होती. मगाशी उडालेल्या पक्ष्यांपैकी दोन पक्षी त्या बाजूला येत होते. मी जलाशयाच्या डावीकडे होतो. त्यातला एक मध्येच दिसेनासा झाला आणि दुसरा काही क्षणातच, एखाद्या तय्यार गायकानं विलंबित लयीत स्वरांचं नक्षीकाम करत अलगद समेवर यावं, त्याच नजाकतीनं त्या फांदीवर अक्षरशः विराजमान झाला आणि काय सांगू माझी अवस्था! भूल पडणे, संमोहित होणे या शब्द-संकल्पनांच्या पलीकडे गेली. काही वेळानं सावधपणे थोडा पुढे गेलो आणि नजरेचं पारणं फिटलं.

डोक्‍यावर डौलदार तुरा, ऐटीत गर्विष्ठपणे डावीकडे वळवलेली मान, शरीरावर एका बाजूनं पडलेल्या उन्हामुळे झगमगत्या रंगांची उधळण आणि सैलपणे फांदीवरून खाली उतरलेला शेकडो जादूई डोळ्यांचा, मोहक, उन्हात किंचित थिरकणारा, बदलत्या विविध रंगांचा, भरघोस मखमली पिसारा. तो सुंदर रानमोर त्या फांदीवर मनमोर होऊन स्थिर झाला. माझे डोळे त्या दृष्यावर स्थिर झाले. 
मेंदूत ‘क्‍लीक’ झाले. 
आणि मनावर फोटो उमटला.
रानमोराचा.. 
मनमोराचा आनंदपिसारा अजूनही फुललेलाच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs SAW, 1st T20I: जेमिमाह रोड्रिग्सचं शानदार अर्धशतक, स्मृती मानधनाचीही मिळाली साथ; भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय

Accident News:'अपघातात आर्टिकामधील तिघे ठार तर दोन जखमी'; धरणगाव-धुपेश्वर रोडवरील घटना, चालकाचे नियंत्रण सुटल अन्..

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 : राज्यात कुठं कुणाचा नगराध्यक्ष? दिवसभरातील निकालासंदर्भातील घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Jejuri Fire Incident Video : निवडणुकीच्या विजय जल्लोषादरम्यान मोठी आग; दोन नवनिर्वाचित नगरसेवक भाजले, अनेक लोक जखमी, जेजूरीतील धक्कादायक Video समोर...

Gadchiroli Municipal Result: गडचिरोलीत काँग्रेस उमेदवाराचा अवघ्या 'एका' मताने विजय; पराभूत मांडवगडेंचा निकालावर आक्षेप!

SCROLL FOR NEXT