reneuka-kalmbe
reneuka-kalmbe 
मुक्तपीठ

रूळ, सांधे आणि सिग्नल

रेणुका नागेश काळंबे

धुराच्या रेषा हवेत काढत येणारी आगीनगाडी सर्वसामान्यांच्या नेहमीच कुतूहलाचा विषय बनून राहिली आहे. भारतभर पसरलेली भारतीय रेल्वे आकर्षणाचा विषय असते. कसे असते रेल्वेचे अंतरंग? कर्मचाऱ्यांची कार्यपद्धती कशी? एवढ्या मोठ्या विस्तारलेल्या रेल्वेत सुसूत्रता कशी राहते? प्रत्येकाच्या मनात हा प्रश्‍न असतो. आम्ही भाग्यवान. वडील रेल्वे ड्रायव्हर. भुसावळ, अकोला, नांदगाव (जि. नाशिक) सारख्या रेल्वेमय गावात आमचे बालपण गेले. इंग्रजांनी गोऱ्या साहेबांसाठी बांधलेल्या प्रशस्त, हवेशीर, एकही भेग नसलेल्या दगडी बांधकामाच्या, आजूबाजूला भरपूर मोकळी जागा अशा क्वॉर्टरमध्ये आम्ही वाढलो.

रेल्वेने किती तरी कामगारांना आपल्यात सामावून घेतले. त्यांच्या रोजी रोटीची व्यवस्था केली. यात ड्रायव्हार, असिस्टंट, स्टेशन मास्तर, गॅंगमन, इंजिनियरपासून रेल्वे क्रॉसिंगवर काम करणाऱ्या गेटमनपर्यंत रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या अगणित कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मधुकर आढाव माझे वडील. आधी अकोल्याला कोळशाचे इंजिन (स्टीम इंजिन) वर काम करीत. लालभडक कोळशाच्या निखाऱ्याजवळ काम करणे खूप कष्टाचे असे. वडिलांच्या हातावर नेहमी भाजल्याच्या खुणा असत. ते पाहून मला भारी वाईट वाटे. ते म्हणत पोटासाठी करावे 

लागते बेटा. ‘अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरवीशी जगदीशा’ आणि खरेच या अन्नासाठी कित्येक रेल्वे कर्मचाऱ्यांना हजारो किलोमीटर रेल्वे चालवून रात्र नाही, दिवस नाही, सणसूद नाही असे काम करावे लागे. 

भुसावळला भारताच्या प्रत्येक राज्यातून आलेले अठरा पगड जातीचे लोक आनंदाने राहत. रात्री-अपरात्री कधीही बोलावणे येई. तेवढ्या रात्री वडील अंघोळ करून, पोथी वाचून ड्यूटीवर जात. स्टोव्ह किंवा शेगडीवर आई डबा करून देई. भुसावळला क्वॉर्टरपासून स्टेशन बरेच लांब होते. भर पावसात, सारे जग गाढ झोपेत असताना खांद्यावर बॅग, एका हातात छत्री धरून सायकलवर कामावर जावे लागे. ड्रायव्हरपासून सिग्नलमनपर्यंत सर्वांना झोपेचे, जेवणाचे वेळापत्रक सांभाळावे लागे. ड्यूटीवर झोप येऊ नये म्हणून वडील रात्री कमी जेवत. झोपेची एक डुलकी लाखो लोकांचा जीव घेऊ शकते ही जाणीव प्रत्येकाच्या मनात असे. वडील गाडी सुरू करण्याआधी कुलस्वामिनीच्या तसबिरीला नमस्कार करीत. आपल्या कुटुंबासाठी आपल्याला सुरक्षित जायचे आहे, ही भावना नेहमी मनात असे. 

घरातल्या चिंता, भांडणे वडिलांच्या कानावर जाऊ द्यायची नाहीत, कारण त्यांची जबाबदारीची नोकरी आहे, हे आई आम्हाला नेहमी सांगायची. 

जवळपास एखादा अपघात झालाच तर विशिष्ट भोंगा वाजे. त्या वेळी पुढ्यातले ताट बाजूला सरकवून गणवेश घालून कामगारांना धावत जावे लागे. ज्या घरातील कर्ता माणूस त्या दिवशी ड्यूटीवर असे, त्या कुटुंबाच्या पोटात धस्स होई. आपल्या माणसाला सुखरूप पाहीपर्यंत जिवात जीव नसे. मात्र कर्मचाऱ्यांची काळजी रेल्वे प्रशासनातर्फे व्यवस्थित घेतली जाते. दर सहा महिन्यांनी प्रशिक्षण, परीक्षा असे. प्रत्येकाला काटेकोर अभ्यास करावा लागे. वैद्यकीय तपासणी काटेकोर होत असे. सर्व मित्रमंडळी एकत्र जमली की एखादा अपघात का व कसा झाला, यावर चर्चा होत असे. ती चूक आपल्याकडून होऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेतली जाई. एकही अपघात न करणाऱ्या ड्रायव्हरचा रेल्वेतर्फे विशेष सत्कार केला जातो. कोणत्याही सणाला कर्मचारी घरी असतील याची शाश्‍वती नसे. मात्र लक्ष्मीपूजनाला मुस्लिम, ख्रिश्‍चन ड्रायव्हर मुद्दाम ड्यूटी मागून घेत. त्यामुळे हिंदू बांधवांना घरी राहायला मिळत असे. एकमेकांचे सण सांभाळले जात. निवृत्तीच्या वेळेस आपली ड्यूटी आपण चोख बजावली, सुरक्षित केली म्हणून रेल्वे ड्रायव्हर समाधानी असत. या दिवशी रेल्वे इंजिन मस्तपैकी सजवीत. इंजिन ड्रायव्हरला मानाने ड्रायव्हर सीटवर बसवीत. पण या दिवशी दुसरे ड्रायव्हर गाडी चालवीत. प्रत्येक स्टेशनवर निवृत्त होत असलेल्या ड्रायव्हरचा सत्कार केला जात असे. या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावर खूप समाधान असे. एका डोळ्यात आनंदाश्रू, तर दुसऱ्या डोळ्यात या सर्वांचा निरोप घ्यावा लागणार म्हणून दुःखाश्रू असत. 

तो सारा काळ आयुष्याच्या रूळावरून वेगाने सरकत गेला. वाटेत अनेक सांधे आले. जरासा खडखडाट झाला कधी तरी, पण कित्येकदा सांधा बदलल्याची जाणीवही झाली नाही आजवरच्या प्रवासात. केवळ इंजिन ड्रायव्हरनाच कळू शकतील अशा खुणा, सिग्नल मिळाले वाटेत. त्या खुणा नीट जपत गाडी हाकली की प्रवासही सुरळीत होतो. आता रेल्वेशी थेट संबंध उरला नाही. तरीही आजही जेव्हा एखादी रेल्वेगाडी नजरेसमोरून धडधडत जाते, तेव्हा माझ्या मनात जपलेल्या सुंदर आठवणी मनभर सैराट पसरतात. हवेत काढलेल्या धुराच्या रेषेसारख्या ...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT