मुक्तपीठ

आजी... संस्कारपीठ !

शीतल ठुसे

आजी नातवंडांसाठी प्रियच असते; पण ती साऱ्या गावाचीच आजी झालेली असेल, नवऱ्याची सावलीसारखी सोबत करूनही केवळ सावली राहिलेली नसेल, तर ती अधिकच आवडत असते. ही एका आजीची नव्हे, तर गावाच्या भल्यासाठी झटणाऱ्या एका स्त्रीची कहाणी आहे.

"आई एक गजबजलेले गाव असते', असे फ. मुं. शिंदे यांनी म्हटले आहे. मी म्हणेन, आजी हे प्रत्येकाच्या मनात वसलेले, गजबजलेले गाव असते. साऱ्या नात्यांना प्रेमाच्या रेशीमनात्याने बांधून ठेवणारी, साऱ्या घराला एक ठेवणारी, मायेची ऊब देणारी प्रेमळ व्यक्ती असते. कोणत्याही समस्येवर आपल्या अनुभव समृद्धतेचा वारसा सांगणारा सहज उपाय आजीकडून आपल्याला नेहमी मिळतो. कोणत्याही आजारावर मायेची फुंकर घालत घरगुती पण तत्काळ फरक पडणारे औषध कोणाकडून मिळत असेल तर ते आजीकडून. आजीच्या दृष्टीने नातवंडं म्हणजे दुधावरची साय.

आजीच्या हातची चव अनेकांना भुरळ घालते. कोणत्याही पदार्थात कधीही बाहेरचे मसाले न घालताही अनोखी चव येते त्याचे कारण पदार्थ करताना त्यात ओतलेली ममता असते. नातवडांच्या खोड्या सहजतेने पोटात घालणारी, प्रसंगी त्यांची बाजू घेऊन आई-बांबांची समजूत घालणारी केवळ आजीच असते. आजकाल नोकरी निमित्ताने आई-वडील अनेक तास घराबाहेर असतात, अशा वेळी मायेने संगोपन करणारी व्यक्ती म्हणजे आजी. हे सारे आठवण्याचे कारण म्हणजे माझ्या आजीचे नुकतेच निधन झाले. आजी होती तोवर तिचे प्रेम आपल्याला कसे मिळेल, हाच विचार असे. तिचा वावर सतत आपल्या आसपास आहे, असे वाटत होते, ती गेल्यानंतरही. आता ती नाही, हेच काही काळ स्वीकारता आले नाही. आजी आपल्यात नाही, ही पोकळी आजही सहन होत नाही. कारण, माझी आजी केवळ आजी नव्हती, तर माझ्या दृष्टीने चालते-बोलते विद्यापीठ होती. माझ्या आजीचे नाव शांताबाई गजानन वाघ.

आम्ही सारे जण आमच्या आजीला "बाई' म्हणत असू, तर शिरूरवासीयांची ती "वकिलीणबाई' होती. कारण आजोबा वकील होते. जवळ जवळ 70 ते 80 वर्षांपूर्वीचा काळ. फायनल झालेली माझी आजी माझ्या आजोबांबरोबर म्हणजे अप्पांबरोबर शिरूरमध्ये आली. अप्पांबरोबरच संसार म्हणजे जणू अग्निकंकणच हाती ल्यायली होती. कारण, अप्पांनी पैसा हे सर्वस्व कधीच मानले नाही. पक्षकाराला जेवायला घालून वेळप्रसंगी भाड्यासाठी पैसे द्यायचे, अशी वकिली त्यांनी केली. सत्तर वर्षे भाडेकरू म्हणून जो वाडा सांभाळला, तो त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या व सगळ्यांच्या इच्छेनुसार घरमालकाला प्रामाणिकपणे परत केला. असा हा सात्त्विक संसार करताना अनेक संकटे अत्यंत आनंदाने आमच्या बाईने झेलली. सहनशीलता, सात्विकता, दयाळूपणा, ममत्व, कर्तव्यपरायणता आणि अजूनही अनेक अशा सत्त्वगुणांचा खजिना म्हणजे माझी आजी होती. आमचे भाग्य खूप थोर म्हणून या खजिन्यातील गुणांचे माणिकमोती आम्हाला मिळाले. आमची बाई ही एक "संस्कारपीठ' होती.
बाईने आमच्यावर कधी मुद्दाम, सांगूनसवरून संस्कार केलेले आठवत नाही. तिच्या प्रत्यक्ष कृतीतून नकळतपणे मनावर उतरत राहिले. माझी आजी आनंदयात्री होती. आपल्या वागण्याने स्नेहाचे, आनंदाचे चांदणे सभोवार शिंपडले आणि आसमंत आनंदमय केले. द्वेष, मत्सर, उणेदुणे, राग याचा स्पर्शही कधी माझ्या आजीने स्वत:ला होऊ दिला नाही. खूप मोठे कुटुंब तिने तिच्या प्रेमाच्या धाग्याने एकत्र बांधून ठेवले. आजोबांच्या आजारपणात आमची आजी त्यांची आई बनली. मी आजीच्या चेहऱ्यावर पुसटशीही कंटाळलेली, त्रासिक रेषा कधी पाहिली नाही. आज जेव्हा आम्ही संसार करतो, तेव्हा तिचे ते मोठेपण आणि सोशिकता प्रकर्षाने जाणवते. आपल्या मनाविरुद्ध काही झाले तर आपल्याला वाईट वाटते; पण आजी मात्र अतिशय आनंदी राहिली. प्रत्येक गोष्ट स्वीकारत पुढे जायचे आणि प्रेम करत आनंदाने जगायचे, हे आजीने आम्हाला शिकवले. "माझेच चुकले', हा आजीचा मूलमंत्र कोणत्याही परिस्थितीत तडजोड करण्यासाठी किती योग्य आहे, ते आता कळते. "राणीसारखं खावे आणि दासीसारखे काम करावे', हे आजीचे वाक्‍य कायमस्वरूपी मनावर ठसलेय. उत्तम आरोग्याची गुरुकिल्लीच तिने आम्हाला दिली आहे.

पाऊसपाणी, कडाक्‍याची थंडी... काहीही असो; पण न चुकता अंगणात सडारांगोळी करणारी माझी आजी, दवाखान्यात कोणीही आजारी असो, त्यांना अंथरूण पांघरुणापासून ते जेवणापर्यंत सारे पुरवणारी माझी आजी, समाजसेवा अत्यंत मनापासून करणारी माझी आजी! खरेच विविधरंगी होते माझ्या आजीचे व्यक्तिमत्त्व. हे सारे करत असताना ज्या काळात बायका फारशा बाहेरही पडत नसत, त्या काळात माझ्या आजीने शिरूर नगर परिषदेचे सदस्यपद दहा वर्षे सांभाळले. अनेक वर्षे तिने महिला मंडळाचे अध्यक्षपद सांभाळले. खरेच खूप अभिमान वाटतो या सगळ्याचा आणि आजीचे हे संस्कार घेऊन आम्ही सारे यशस्वी आणि सुखेनैव वाटचाल करीत आहोत. मुळातच सौंदर्याची देणगी लाभलेली आणि सधन माहेर असलेली माझी आजी! पण कशाचाही अहंकार न धरता सावलीसारखी आजोबांच्या मागे राहिली. त्यांना सदैव साथ दिली; पण केवळ सावली बनून राहिली नाही. तिचे झाड भर उन्हातही स्वतंत्र वाढले आणि म्हणूनच बहरलेला वटवृक्ष साऱ्यांना अनुभवायला मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T Raja Singh Resignation : ‘’आजच्याच दिवशी बरोबर ११ वर्षांपूर्वी मी...’’ ; भाजपने राजीनामा मंजूर करताच टी.राजा भावनिक!

Pune: सूपमध्ये झुरळ सापडले; पण तक्रारीकडे हॉटेल व्यवस्थापनाचे दुर्लक्ष, नंतर महिलेनं...; पुण्यातील खळबळजनक घटना

IND vs ENG 3rd Test: KL Rahul ने झेल सोडला! शुभमन गिल अम्पायरसोबत भांडला; Umpire ने मागे ढकलले अन् म्हणाले, जा...

Hinjewadi Electric Supply : हिंजवडीतील वीजपुरवठा ७२ तासांनी पूर्वपदावर; नागरिकांकडून सुटकेचा निःश्वास

World Record Internet Speed: इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड! 10,000 पेक्षा जास्त 4K सिनेमे एका क्षणात झाले डाउनलोड, कुठे घडला हा चमत्कार?

SCROLL FOR NEXT