मुक्तपीठ

कथा फुलांची

स्नेहलता कुंचूर

आईसाठी तिची दोन्ही मुले सारखीच असतात. पण एक मूल सर्वसाधारण आहे आणि दुसरे मूल मतिमंद आहे, असं लक्षात आल्यावर तिला धक्काच बसतो. त्या दुसऱ्या मुलाचं व्यावहारिक जगात कसं निभावेल याची चिंताच तिला अधिक असते.

रेडिओवर गाणं लागलं होतं - "अशी ही दोन फुलांची कथा, जन्म जरी एकाच वेलीवर, भाग्यामधले महद अंतर'...
हे अंतर सामान्य अंतर नाही. केवळ रंग, रूप, हुशारीतील थोडे अंतर कोणाला काही नाही वाटत. परंतु एक हुशार किंवा सर्वसाधारण मूल व दुसरे मतिमंद मूल हे अंतर आई-वडिलांच्या मानसिक सहनशक्तीचा अंत बघणारे ठरते.

मोठा मुलगा पूर्णपणे साधारण. त्याच्या नंतरच्या दोन खेपा बिनसल्या आणि देवदत्तच्या वेळीदेखील नऊ महिने त्रास होत होता. अखेर देवावर हवाला ठेवूनच मी दवाखान्यात गेले. माझी नीट सुटका झाली आणि जन्मलेला मुलगादेखील जरा अशक्त असला, तरी अव्यंग आहे, हाती-पायी नीट आहे हे पाहून सर्वांनीच सुटकेचा निःश्‍वास सोडला. पहिल्यापासूनच अशक्त असल्यामुळे, तसेच चालणे-बोलणे उशिरा, तसेच सर्वसाधारण मुलापेक्षा त्याची सर्वच प्रगती मंदपणे झाली. आम्ही डॉक्‍टरांचा सल्ला घेतला व त्यांच्या सल्ल्यानुसार त्याला के.ई.एम. रुग्णालयात टी.डी.एच. सेंटरला नेऊन दाखवले. तिथे जमलेल्या इतर मुलांना बघूनच आम्हाला धक्का बसला. कारण ती मुले चेहऱ्यावरून, दिसण्यावरूनच मतिमंद वाटत होती. आमचा देवदत्त अव्यंग आणि दिसायला बराचसा सर्वसाधारण मुलांसारखा असल्यामुळे तो मतिमंद असेल ही कल्पनाच कधी मनाला शिवली नव्हती. फक्त तो सावकाश शिकेल व फार शिकणार नाही ही भावना होती. पण सत्य हे अखेर नेहमीच कटु असते. देवदत्त मतिमंद असल्याचे तपासणीतून निष्पन्न झाले आणि मनाला धक्का बसला. आम्ही दोघांनी समंजसपणे या कटु सत्याचा स्वीकार केला, आलेल्या परिस्थितीला धैर्याने सामोरे गेलो, तरच आपल्याला सुख-समाधान लाभेल व देवदत्तच्या जीवनातही थोडाफार आनंद फुलवता येईल असा विचार केला.

त्याला आम्ही विशेष मुलांसाठी नव्याने सुरू झालेल्या "दिलासा केंद्रा'त दाखल केले. तेथील मुख्याध्यापिका संध्या देवरुखकर व इतर शिक्षिकांच्या मार्गदर्शनाखाली त्याला अक्षर व आकडे ओळख झाली. तेथील काही किरकोळ कामाच्या शिक्षणातून तो घडत गेला, पण हिशेबाच्या बाबतीत तो कमीच राहिला. व्यवहारात नेहमीच लागणाऱ्या या महत्त्वाच्या गोष्टीतील कमतरतेमुळे त्याची प्रगती खुंटली. वयोमर्यादेमुळे त्याला शाळा सोडावी लागली, पण त्याला कुठेतरी गुंतवणे हे आमचे काम होते. त्याला आम्ही रद्दी कागदाच्या पिशव्या करणे शिकवले व प्लॅस्टिकला पर्याय असलेल्या या उद्योगात त्याने चांगली प्रगती केली आहे. आता तोच त्याचा एकमेव उद्योग झाला आहे. त्याला आता दहा वर्षे पूर्ण झाली.

कोणतेही व्यंग असलेल्या व्यक्ती ज्या आत्मिक किंवा बुद्धी-मनाच्या बळावर जगात, जीवनात यशस्वी होतात, त्याचीच मतिमंद व्यक्तींमध्ये कमतरता असते. मानसिक दौर्बल्य, बुद्धीची कमतरता, मेंदूचा भाग मृत होणे, मेंदूला धक्का बसणे अशामुळे मतिमंदत्व येते. इतर अपंगांचे जीवन, वैज्ञानिक प्रगतीतून निर्माण झालेल्या उपयोगी साधनांनी बऱ्याच प्रमाणात सुसह्य करता येते. एखादा कारखाना सर्व यंत्रसामग्रीसह बांधून सुसज्ज आहे, पण तेथे विद्युतपुरवठाच पोचला नाही किंवा कमी दाबाने होत असेल, तर कारखाना सुरूच होणार नाही. काहीशी अशीच अवस्था शरीराने धडधाकट असणाऱ्या मतिमंद व्यक्तींची असते. यामुळे अशा मुलांचे जीवन अधिकच कष्टमय होते. जन्मापासूनच अशा मुलांचे पालन-पोषण करण्यात त्याचे पालक-आई, बाप यांना खूपच खस्ता खाव्या लागतात. काही वेळा कुटुंबातील अगदी जवळच्या सख्ख्या माणसांचेही सहकार्य मिळतेच असे नाही. मग समाजातून होणाऱ्या हेळसांडीविषयी, दुर्लक्षाबद्दल तक्रार करण्यात काहीच अर्थ नसतो. पण आम्ही मात्र देवदत्त मतिमंद आहे म्हणून त्याला कधीच अंतर दिले नाही, अगर वेगळी वागणूक दिली नाही. त्याच्या मोठ्या भावानेही त्याच्याबद्दल खंत बाळगली नाही, त्यामुळे आपल्या दादाबद्दल देवदत्तच्या मनात नितांत प्रेम आहे. शेजारी तसेच नातेवाइकांकडूनही त्याला आपुलकीची वागणूक मिळते. त्याची वैयक्तिक कामे तो स्वतःच करतो. स्वच्छ राहतो. अशा काही जमेच्या बाजू असल्याने अशा प्रकारच्या अन्य मुलांकडे पाहता आम्ही स्वतःला खूपच सुदैवी व समाधानी मानतो. पेला अर्धा भरला आहे असाच विचार करतो, अर्धा रिकामा आहे असा करत नाही.

सकृत दर्शनी जी मुले मतिमंद दिसून येतात, त्यांच्याबद्दल समाजात सहानुभूती दिसून येते. पण जी मुले अशी दिसत नाहीत त्यांची समाजाकडून काही वेळा छळणूक वा टवाळी होताना दिसते. माणूस प्राण्यांवर, झाडावर प्रेम करतो, पण अशा व्यक्तीशी प्रतारणा करतो हे एक दुर्दैवी वास्तव. हे व्यंग समाजाच्या जेवढे लवकर लक्षात येईल व समाज जेव्हा एका वेगळ्या, अर्थात माणुसकीच्या जाणीवेतून याकडे पाहिल व वागेल, तो सुदिन होय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराज, राणी चन्नम्मांचा अपमान केला, बेळगावात मोदींचा घणाघात

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

SCROLL FOR NEXT