muktapeeth 
मुक्तपीठ

बदललेला पाणवठा

सुनील गाडगीळ

महाविद्यालयात असताना पाषाण तलावावर अनेकदा गेलो होतो. मध्यंतरीच्या काळात तिकडे जाणे झाले नव्हते. आता निघालो, तर आठवणीतल्या सगळ्या जुन्या वाटा बंद झालेल्या. पार वळसा घालून पाणवठ्याला भेट दिली. पाणवठा बदलला होता.

कित्येक वर्षे लोटली. पाषाण तलावावर जाणे काही जमले नव्हते. नुकतीच छायाचित्रणकला शिकायला सुरवात केली. पक्षी, प्राणी आणि निसर्ग यांची छायाचित्रे काढायला आवडतात. म्हणून पाषाण तलावावर जाण्याचे ठरविले. महाविद्यालयात असताना अनेकदा गेलो होतो, पण मध्यंतरीच्या काळात तिकडे जाणे झाले नव्हते. त्या जुन्या आठवणीप्रमाणे निघालो, तर पाण्याकडे जायचा रस्ताच सापडेना. आठवणीतल्या सगळ्या जुन्या वाटा बंद झालेल्या. सुरक्षेचा प्रश्न म्हणून सर्व रस्ते बंद केले गेल्याचे कळले. आता तलावाकाठी जायचे तर पूर्ण वळसा घालून, सुतारवाडीतून जावे लागेल असे कळले. त्या रस्त्याने पहिल्यांदा गेलो तेव्हा संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच तलाव व तेथील उद्यान खुले असते, असे समजले.

मग चार वाजताच पोचलो. हा जलाशय ब्रिटिशांनी बांधला. गेल्या काही वर्षांपासून तलाव व त्याचा सर्व परिसर हा पुणे महापालिका सांभाळते. भव्य प्रवेशद्वारातून आत गेले की एक रुंद रस्ता आपल्याला आत घेऊन जातो. प्रवेशद्वारातच स्वच्छतागृह आहेत. ती फारशी स्वच्छ नाहीत. एवढी मोठी जागा उपलब्ध असूनदेखील वाहनांसाठी आत वाहनतळ नाही याचे आश्‍चर्य वाटते. सर्व वाहने बाहेर रस्त्यावर व फुटपाथवरच लावावी लागतात. एकेकाळी ओबडधोबड, रानवट स्थितीत असणाऱ्या या तलावाला पुणे महापालिकेने दत्तक घेऊन एक नवे आकर्षक रूप दिले आहे. इथे असणारी स्वच्छतादेखील कौतुकास्पद. वाहनतळाच्या व्यवस्थेकडे व स्वच्छ स्वच्छतागृहाकडे थोडे लक्ष देणे जरुरीचे आहे. लक्षात आले, पाणवठा बदलला आहे.

तलावाकाठी गेलो की उजवीकडून एक कच्चा, तांबड्या मातीचा रस्ता काठाकाठाने बऱ्याच दूरपर्यंत जातो. आजूबाजूला व वरसुद्धा असणाऱ्या झाडोऱ्यामुळे ऊन लागत नाही. बांबूची अनेक झाडे ठीकठिकाणी लावलेली आहेत. ती जोमाने वाढून त्यांची आता घनदाट बने झाली आहेत. त्या झाडीच्या तळातच तलावाचा काठ आहे. दगडकाम करून व त्यावर जाळी बसवून तो भक्कम केला आहे. त्या काठावर बसून समोरच्या जलाशयाकडे व त्यात विहार करणाऱ्या पाणपक्ष्यांकडे आपण नीट बघू शकतो. इथे मुख्य जाणवते ती इथली शांतता. शेजारूनच मुंबई-बंगळूर महामार्गाचा बाह्यवळण मार्ग जात असूनसुद्धा आतील शांततेला तडा जात नाही.

या कच्च्या रस्त्याच्या कडेला येणाऱ्या लोकांना बसण्यासाठी सिमेंटचे बाक आहेत. त्यावर अनेक जोडपी बसली होती. काही कॉलेजियन्स, काही कुटुंबेदेखील आली होती.
मला तिथे एक अतिशय सुंदर पक्षी दिसला. छोटासा, चिमणीपेक्षा ही लहान, तपकिरी, निळा, पिवळा रंगांचा हा पक्षी विलक्षण सुंदर असतो. त्याचे नाव "टिकल्स ब्लू फ्लाय कॅचर' ऊर्फ नीलिमा. आता या काठावर वावर वाढल्यामुळे जास्तीत जास्त पक्षी हे दूरवरच्या काठावर पूर्वेच्या बाजूला मुक्कामाला गेलेले दिसले. तलावात काही ठिकाणी नैसर्गिक बेटे दिसली. त्यातील एका वर दोन-तीन मोठी झाडे आहेत. त्या झाडांवर तीन-चार बगळे बसलेले दिसले. दूरवर अनेक बगळे, पाणकोंबड्या, कोमोरेट्‌स, कॅटल इगरेट्‌स, छानपणे पाण्यात पोहताना व पाणगवतात वावरताना दिसत होत्या. काही पक्षी आकाशात उडत होते. त्यातील एखादा मध्येच पाण्यावर उतरताना दिसत होता. एखादे विमान उतरावे अगदी तसेच हे पक्षी पाण्यावर अलगद उतरत होते. एक किंगफिशर वेगात उडत गेला. त्याचा निळा रंग डोळ्यात भरला.

त्या विशाल जलाशयात एखादा मासा सुळकन्‌ उडी मारून परत पाण्यात लुप्त होताना दिसत होता. चुळूक असा आवाज होऊन पाण्यावर काही क्षण वर्तुळे उमटायची व परत पाणी एकसारखे होऊन जायचे. अचानक उद्यानाबाहेरील सुतारवाडीत कोणीतरी मोठा फटाका लावला. त्या आवाजासरशी शेकडो पक्षी एकदम उडाले. दोन-तीन मोठ्या थव्यांत कलकलाट करत उडत राहिले. उडणाऱ्या थव्याने दिशा बदलली. थोड्या वेळाने सगळे शांत झाल्यावर परत सगळे पक्षी खाली उतरले. निवांत झाले.
तलावात असणाऱ्या दूरच्या बेटावर काही स्थानिक मंडळी मासे पकडत होती. त्यांच्या पलीकडे, मागे गावातील काही इमारती दिसत होत्या.
पाण्याच्या काठी बसून अनेक छायाचित्रे घेतली. सहज घड्याळात बघितले तर सहा वाजायला आले होते. दिवस मावळतीकडे झुकला होता. वेळ कसा गेला ते कळलेच नव्हते. शहरात परतण्याची वेळ झाली होती.
पण एका भेटीत या तलावाची नीट ओळख झाली नाही.
आता वेगवेगळ्या वेळी येथे परत येणे हे होणारच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT