Mumbai Sakal
मुंबई

ना रस्ता,ना वीज ,ना पाणी भिवंडीतील धर्मीपाडा पारतंत्र्याच्या अंधारात

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही आदिवासी पाड्यांची व्यथा

दीपक हिरे

वर्जेश्वरी : धर्मीबाई रायात वय ८५ जिच्या नावावर एका आदिवासी पाड्याचे नाव आहे, असा हा धर्मीचा पाडा या आजीचा पाय काही दिवसांपूर्वी फ्रॅक्चर झाला. वेदनेने व्हिवळणाऱ्या या आजीला उपचारांसाठी रुग्णालयात एका लोखंडी पलंगाचा स्ट्रेचर बनवून नेण्यात आले. जिच्या नावावर पाड्याचे नाव आहे, त्या धर्मीच्या पाड्याची करुण व्यथाच यानिमित्ताने समोर आली. स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही या आदिवासी पाड्यात ना पक्का रस्ता पोहचला, ना वीज, ना पाणी स्वातंत्र्याच्या या अमृतमहोत्सवी वर्षातही मुंबईपासून अवघ्या ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या या छोटाशा आदिवासी पाड्याच्या नशिबी पारतंत्र्याच्या काळोखी जगणे येत असेल तर यापेक्षा दुर्दैव काय असेल, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

भिवंडी तालुक्यातील दिघाशी या गावात आदिवासींची २५ कुटुंबे असलेला धर्मीचा पाडा आहे. येथील बहुतेक कुटुंबे ही शेतमजुरी करत असून त्यातूनच त्यांना दोन वेळची भाकरी मिळते. विशेष म्हणजे दिघाशी गावाचा बऱ्यापैकी विकास होत असताना या पाड्यात मात्र रस्त्याचा साधा दगडही पडलेला नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना चिखल तुडवत, नाले ओलांडत दीड किलोमीटरचा प्रवास करत मुख्य रस्ता गाठावा लागतो. आतापर्यंत या गावात कुठलीही नळयोजना पोहचली नाही. पिण्याच्या पाण्यासाठी आधार आहे तो केवळ दोन हातपंपांचा. त्यातील एक पंप ३० वर्षे जुना आहे, तर दुसरा चार वर्षांपूर्वीच लावण्यात आला आहे. मार्च महिना संपताच या हातपंपाचे पाणी आटते. त्यामुळे उन्हाळ्यात या पाड्याची पाण्यासाठी भटकंती सुरू होते. धक्कादायक म्हणजे रस्ता, पाणी सोडाच, पण या पाड्यात अजूनही वीज पोहचलेली नाही. काही वर्षांपूर्वी विजेचे पोल बसवण्यात आले. पण पुढे काहीच कार्यवाही न झाल्याने केवळ दोन घरे सोडली तर संपूर्ण पाडा अंधारात बुडाला आहे.

२५ कुटुंबे असलेल्या धर्मीचा पाड्यात ४० मतदार आहेत. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीसाठी ते नियमित मतदान करतात. पण निवडणुकीच्या वेळी स्वतःला कार्यसम्राट, विकासपुरुष म्हणवून घेणाऱ्या नेत्यांना आदिवासी बांधवांच्या गावकुसाबाहेरील या पाड्यात जाण्यासाठी अजूनही रस्ता सापडलेला नाही. पाड्यात शिक्षणाचीही बोंब आहे. कुपोषणमुक्तीसाठी सरकार अनेक योजना राबवत असताना या पाड्यात साधी अंगणवाडीही नसल्याचे समोर आले आहे. रस्ताच नसल्याने अंगणवाडी सेविकाही या पाड्याकडे फिरकत नाहीत. पावसाळ्यात तर रस्ताच नसल्याने विद्यार्थी चार महिने शाळेत फिरकत नसल्याने हळूहळू ते शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकले जात आहेत.

‘श्रमजीवी’ मदतीला धावली
८५ वर्षीय धर्मीबाई रायात यांचा पाय फ्रॅक्चर झाल्यावर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी अक्षरशः एका जुन्या २ लोखंडी पलंगांचा आधार घेत पालखी करून मुख्य रस्त्यापर्यंत नेण्यात आले. ही बाब समजताच श्रमजीवी संघटनेचे प्रमोद पवार आणि त्यांचे सहकारी नवनाथ भोये, रुपेश जाधव, नीलेश चव्हाण, सुशांत चौधरी यांनी स्थानिक गावकमिटी कार्यकर्त्या संगीता भोईर, बाळा भोईर तसेच आदेश रायात यांच्या सोबतीने या पाड्यात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी कमीत कमी रस्ते कसे करता येतील याबाबत ग्रामस्थांची मते जाणून घेतली.

...पण मोबाईल नेटवर्क फुल्ल
धर्मीचा पाड्यात कोणत्याही मूलभूत सुविधा नाहीत. मात्र मोबाईलचे नेटवर्क फुल्ल आहे. इथूनच प्रमोद पवार यांनी गुगल मॅपचा वापर करून हा पाडा ते मुंबई मंत्रालयाचे अंतर मोजले, तर ते केवळ ८१ किलोमीटर आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय अवघ्या ४२ किलोमीटरवर आहे. भिवंडी तहसील कार्यालयही २४ किलोमीटरवर आहे. त्यामुळे या शहरांपासून तासाभराच्या अंतरावर असलेल्या या आदिवासी पाड्याला स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत मूलभूत सुविधाही मिळत नसल्याची शोकांतिका व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: हिंसक कारवाईची मोठी किंमत! हत्याकांड प्रकरणी शेख हसीना दोषी; बांगलादेश न्यायालयाकडून मृत्युदंडाची शिक्षा

Latest Marathi Breaking News:बिबट्यांची नसबंदी करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी : नाईक

Ironman Competition: 'पांगरीच्या अजय दडस यांचे आयर्नमॅन स्पर्धेत यश'; गोव्यातील स्पर्धेत ३३ देशांतील सुमारे १३०० खेळाडू सहभागी

Viral Jugaad Video : चाक नसतानाही सुस्साट धावू लागला टेम्पो, जुगाडाचा बादशहा ठरला ड्रायव्हर; व्हिडिओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Pushkar Singh Dhami : सीएम धामींनी संरक्षण मंत्र्यांसमोर ठेवल्या सामरिक महत्त्वाच्या मागण्या; नंदा राजजात यात्रेच्या मार्गावरही केली चर्चा

SCROLL FOR NEXT