oral mayo therapy clinic
oral mayo therapy clinic sakal mumbai
मुंबई

मुलांसाठी ओरल मायोथेरपी क्लिनिक; मुंबईत देशातील पहिले रुग्णालय

भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईच्या शासकीय दंतमहाविद्यालय व वैद्यकीय रुग्णालयात (Government dental college) मुलांच्या दातांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित केले आहे. यातून ओपीडीत (opd) येणाऱ्या लहान मुलांना तोंडाचे व्यायाम शिकवले जातात. मुलांसाठी विशेष आणि स्वतंत्र ओरल मायोथेरपी क्लिनिक (oral mayo therapy clinic) सुरू करणारे मुंबईतील सेंट जॉर्ज परिसरातील शासकीय दंतमहाविद्यालय व रुग्णालय हे देशातील पहिले रुग्णालय आहे.

आजही पालक आणि लहान मुलांमध्ये दातांच्या समस्या किंवा दातांची वाढ, जबडा, चेहऱ्याचे हावभाव याविषयी जनजागृती नाही. जर बालपणातच मुलांच्या संपूर्ण चेहऱ्याची आणि तोंडाची काळजी घेतली, तर पुढच्या इतर समस्या टाळता येऊ शकतात. याच विचारातून हे क्लिनिक सुरू झाले आहे. लहान मुलांचे बदलते राहणीमान, जीवनमान, वाढलेले प्रदूषण, वारंवार होणारे सर्दी, खोकला, दमा आदी श्वसनाचे विकार तसेच अपुरे स्तनपान, बाटलीचा वाढलेला वापर इत्यादींमुळे माऊथ ब्रीदिंग व गिळण्याची अयोग्य पद्धत, जिभेची अयोग्य ठेवण अशा नवनवीन समस्या निर्माण होत आहेत. या अयोग्य सवयींमुळे जबड्यांची अनियमित, अपुरी वाढ होते. चेहऱ्याचे व जिभेचे स्नायू कमकुवत राहतात. दातांची रचना बिघडते. तसेच मुलांमध्ये घोरण्याचे प्रमाण वाढते आहे.

या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी शासकीय दंतमहाविद्यालय वैद्यकीय रुग्णालय मुंबई येथील बाल दंतरोगशास्त्र विभागात ओरल मायोथेरपी क्लिनिक सुरू केले आहे. संपूर्ण आठवड्यात विविध दंतउपचारांसाठी विभागात येणाऱ्या मुलांमध्ये अशा प्रकारच्या समस्या असतील तर त्याचे निदान करून त्यांना दर गुरुवारी सकाळी १० ते १२ च्या दरम्यान ओरल मायोथेरपी क्लिनिकमध्ये बोलावून त्यांना प्रशिक्षित डॉक्टरांमार्फत विविध व्यायाम शिकवले जातात. यामुळे मुले योग्य पद्धतीने श्वास घेण्यास व गिळण्यास शिकतात. तसेच चेहऱ्याच्या स्नायूंना बळकटी मिळते.

संपूर्ण भारतभरात एकमेव

या सर्व व्यायामांचा दंतआरोग्यासोबत सर्वांगीण आरोग्याची निगा राखण्यासदेखील उपयोग होतो. संपूर्ण भारतभरात अशा प्रकारे उपचार देणारे शासकीय दंतमहाविद्यालय वैद्यकीय रुग्णालय मुंबई हे एकमेव दंतमहाविद्यालय आहे. या अभिनव उपक्रमाची सुरुवात संस्थेच्या अधिष्ठाता तसेच बालदंतरोगशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. डिंपल पाडावे यांनी केली.

दातांच्या समस्या या छोट्या दिसतात, पण त्याकडे दुर्लक्ष केले की त्याचा त्रास आयुष्यभर होतो. लहान मुलांचे दात बऱ्याचदा वेडेवाकडे असतात. जबड्याचे स्नायू हे आधी सक्रिय नसतात. काही मुलांच्या ओठांचे आकार वेगळे असतात. त्यासंदर्भातील व्यायाम दिले तर भविष्यातील इतर समस्या टाळता येतात. मुंबईत शासकीय दंत हे पहिले रुग्णालय आहे जिथे असे केंद्र आहे. याबाबत पालकांमध्ये जनजागृतीची मोठी गरज आहे. जवळपास १० ते १२ सोपे व्यायामाचे प्रकार आहेत जे मुले योग्य पद्धतीने करू शकतात. ही सुविधा मोफत उपलब्ध आहे.
- डॉ. डिंपल पाडावे, अधिष्ठाता, बालदंतरोगशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख, शासकीय दंतमहाविद्यालय वैद्यकीय रुग्णालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT