दगडी पाट्यावर अशा पद्धतीने वाटण केले जात होते.
दगडी पाट्यावर अशा पद्धतीने वाटण केले जात होते. 
मुंबई

दगडी पाटा, वरवंटा शहरासह ग्रामीण भागातून कालबाह्य

देवेंद्र दरेकर : सकाळ वृत्तसेवा

पोलादपूर : स्वयंपाक म्हटला की वाटप आलेच आणि हे वाटप दगडी पाटा, वरंवट्यावरील असेल, तर जेवणाचा स्वादच वेगळा असतो. मात्र, आधुनिक राहणीमान उंचावल्याने पूर्वी वापरात असणारे चूल, दगडी जाते, पाटे-वरवंटे या वस्तूंची जागा आता अनुक्रमे गॅस, पीठ गिरणी व मिक्‍सरने घेतल्याने त्या अडगळीच्या ठिकाणी दिसत आहेत. 

पूर्वी पोलादपुरात प्रत्येक घराच्या बाहेर वाटण व इतर पदार्थ वाटण्यासाठी पाट्याचा व वरवंट्याचा उपयोग केला जात होता. त्या पदार्थाला एक वेगळीच चव निर्माण होत असे. वाटण वाटून झाले की पाटा व वरवंटा घरच्या बाहेर अंगणात उभा करून ठेवला जायचा. घरच्या जेवणात वाटण हे नेहमीच लागते. त्यामुळे दररोज पाटा, वरवंटा वापरात असायचा. रोजच्या वापरामुळे त्याची टाकी झिजून जायची. अशा वेळी घरातील पाटा-वरवंट्याला टाकी लावून घ्यायची असेल, तर घरातील गृहिणी टाकी लावणाऱ्या बाईला बोलवत असे. तिच्याकडे घरातील पाटा-वरवंटा टाकी लावण्यासाठी सुपूर्द केल्या जायच्या. 

कुटण्यासाठी खलबत्ता उपयोगी पडत असला, तरी त्यात फक्त कोरडे पदार्थ बनवणे शक्‍य होत असते; परंतु पदार्थाला ओलसरपणा असण्याची गरज असेल, तर त्यासाठी मात्र पाटा-वरवंटा वापरण्याशिवाय पर्याय नव्हता. साधारण दोन ते तीन इंच जाडीचा काळ्या दगडापासून पंचकोनी आकारात पाटा बनवण्यात येतो. हा पंचकोनी असला तरी त्याचा साधारण आकार पोस्टाच्या उघड्या पाकिटासारखा असतो. म्हणजे समान लांबीच्या दोन समांतर बाजू, एक बाजू त्यापेक्षा कमी लांबीची आणि वरच्या दोन बाजू वर निमुळत्या होत एका ठिकाणी मिळालेल्या. जमिनीपासून थोडा वर राहावा म्हणून त्याच्या एका बाजूला त्याच दगडातून कोरून एक सपाट उंचवटा तयार केलेला असतो. म्हणजे जमिनीवर तो आडवा टाकला की, वाटणाऱ्या व्यक्तीला त्याच्यावर वाटण करणे सोपे जाते. याबरोबरच वरवंटा असल्याशिवाय हा संच पूर्ण होत नाही. वरवंटादेखील काळ्या दगडापासून बनवलेला असतो.

वरवंट्याची लांबी आणि जाडी पाट्याच्या आकाराला योग्य अशा प्रमाणात असते. दंडगोलाकृती काळ्या दगडापासून बनवलेल्या वरवंटाच्या दोन्ही बाजू मधल्या बाजूपेक्षा कमी जाडीच्या आणि किंचित उतरत्या स्वरूपात असतात. ज्या पदार्थाचे वाटण करायचे असेल तो पदार्थ पाटा आणि वरवंट्यामध्ये घर्षण करत मध्ये मध्ये आवश्‍यक तितके पाणी वापरून त्याचा एकसंध ओला गोळा तयार करता येतो. हे वाटण करताना वाटणाऱ्याला पदार्थ किती बारीक झाला आहे याचा वारंवार अंदाज घेता येतो आणि त्यामुळे पदार्थ जितका बारीक करणे आवश्‍यक आहे, तितकाच तो करणे शक्‍य होतो. मिक्‍सर ग्राईंडरमध्ये ते शक्‍य होत नाही. शिवाय, यात घर्षणाने अधिक उष्णता निर्माण होत नसल्यामुळे पदार्थाची मूळ चव कमी न होता उलटपक्षी अधिक चवदार वस्तू बनते. पुरणपोळीसाठी डाळीचे पुरण, ओला किंवा सुका नारळ घालून केलेली चटणी किंवा वाटली डाळ, आंबे डाळ किंवा इडली-वड्यासारखे दक्षिणी पदार्थ, मांसाहार किंवा मत्स्याहार करण्यासाठी जो ओला मसाला करावा लागतो त्यासाठी पाटा-वरवंटा नेहमी वापरला जायचा. 

पाटा-वरवंट्यामुळे महिलांमध्ये असणारा कणखरपणा मिक्‍सरवरील कामामुळे कमी झाला आहे. याबरोबरच खाण्यातील सकसपणाही कालबाह्य झाला आहे. त्यासोबत शरीरस्वास्थ्यही लयाला गेल्याचे पाहायला मिळते.

शोभेच्या वस्तूत जमा
सद्यस्थितीत प्रत्येक घराच्या बाहेर व रोज वापरात असणारा पाटा, वरवंटा; तसेच कुटण्यासाठी लागणारा खलबत्ता पोलादपूरसह सर्वत्र आधुनिक स्वयंपाकघरांतून आता अदृश्‍य झाला आहे. त्याऐवजी विजेवर चालणारा मिक्‍सर आला आहे. इतर काही वस्तूंबरोबरच पाटा-वरवंटा आता इतिहासजमा होणार असे म्हणायला हरकत नाही. काही घरात तो पाहायला मिळतो; मात्र तोही फक्त अडगळीत किंवा संग्रहालय अथवा शोभेची वस्तू म्हणून ठेवलेला आढळतो. 

पाटा, वरवंटा काही वर्षांपूर्वी सर्वत्र वापरात होता. त्यातून वाटलेल्या पदार्थाला चव वेगळीच जाणवत असायची. जी चव आज दुर्मीळ झालेली आहे. 
- ताराबाई शिंदे, ज्येष्ठ महिला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: कोणतेही काम करण्यापूर्वी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थानी जातो: PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT