कोलाड : रोहा तालुक्यातील आतोणे गावातील शाळेची इमारत मोडकळीस आल्यामुळे जवळच्या आदिवासी समाज मंदिरात ती भरवली जाते. मात्र, येथेही असुविधांचा बाजार विद्यार्थ्यांसमोर आहे. समाज मंदिरात शौचालय उपलब्ध नसल्याने वेळप्रसंगी विद्यार्थ्यांना उघड्यावर जावे लागते. महत्त्वाचे म्हणजे शाळेत विजेची सुविधा नसल्याने शेजारच्या घरातून तात्पुरती वीज घेऊन एका दिव्याची व्यवस्था केली आहे, अशी माहिती मुख्याध्यापक गजानन जाधव यांनी दिली.
बालकाचा सर्वांगीण विकास हे शिक्षणाचे ध्येय समजून जिल्हा परिषद शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. शाळा नीटनेटकी आणि भौतिक सुविधा असल्या अन् हसत-खेळत शिक्षण मिळाले की, विद्यार्थ्यांचे मन रमते. मात्र, यापैकी एकही घटक नसला की, अडथळे वाढतात.
रोह्यापासून २३ किलोमीटरवर आतोणे गावातील जिल्हा परिषद शाळेत ५९ विद्यार्थी आहेत, तेही कातकरी आदिवासी समाजाचे आहेत. गावात पूर्वी शाळेची इमारत होती; पण गेल्या तीन ते चार वर्षांपासून तिची दुरवस्था झाली आहे. चिंचवली तर्फे आतोणे आदिवासी वाडीवरील एका समाज मंदिरात आता ही शाळा भरतेय. डिजिटलचा नारा सध्या सुरू असताना या शाळेत मात्र सध्या वीज नसल्याने ५९ विद्यार्थी अंधारात शिक्षण घेत आहेत. गेल्या चार वर्षांपासून ही शाळा एका समाज मंदिरात भरत आहे. या समाज मंदिरात अनेकदा गळक्या पत्र्यातून व खिडक्यांना दारे नसल्याने पाणी येते. मुलांना बसण्यापासून ते दुपारचे पोषण आहार खाण्यापर्यंत कसरत करावी लागते.
स्वच्छतागृहाअभावी सर्व मुलांना व शिक्षकांना उघड्यावर काही विधी उरकावे लागतात. किचन शेड नसल्याने एका झोपडीत मध्यान्ह भोजन शिजवून दिले जाते. जिथे ३० मुले मोकळेपणाने बसू शकत नाहीत. त्या जागेत आज ५९ विद्यार्थी शिकत आहेत.
नवीन शाळा बांधकाम व्हावे, यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायतीने अनेकदा प्रस्ताव दिले आहेत; पण अजून त्यात यश मिळाले नाही. अशा अडचणीच्या स्थितीतही आदिवासी मुलांच्या शिक्षणात खंड येऊ नये, यासाठी गट शिक्षण अधिकारी साधुराम बांगारे व केंद्रप्रमुख प्रमोद चवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक गजानन जाधव व सहायक शिक्षक जगन्नाथ अब्दागिरे हे दोन शिक्षक जीवाचे रान करताहेत. हक्काची शाळा मिळाली, तर दुर्गम पाड्यावर ज्ञानगंगा विना अडथळा पोहोचण्यास मदत होईल आणि उद्याची पिढी सक्षमपणे घडवता येईल. अडथळे असले तरी शिक्षण सुटू द्यायचे नाही, असा निर्धारच या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी केल्याचा येथील शैक्षणिक प्रगती पाहिल्यावर दिसून येत आहे.
आतोणे शाळेप्रमाणे जिल्ह्यातील अन्य आदिवासी पाड्यावरील ज्या ज्या शाळांच्या इमारती नादुरुस्त आणि कोसळल्या आहेत, अशा शाळांची दुरुस्ती जिल्हा नियोजनमधून व्हावी, म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. मात्र, अशा शाळांची सरकारने तत्काळ दुरुस्ती करावी.
दयाराम पवार, सदस्य, रायगड जिल्हा परिषद, आंबेवाडी गट
ही शाळा एका आदिवासी समाज मंदिरात भरते. शाळेत शौचालय नसल्याने विद्यार्थ्यांना उघड्यावर शौचास जावे लागते. याशिवाय पावसाळ्यात समाज मंदिर गळत असल्याने पोषण आहरही अशाच जागी द्यावा लागतो. आमच्याकडून पंचायत समितीकडे दुरुस्ती प्रस्ताव दिला आहे. गेली चार वर्षे विद्यार्थ्यांची ही अवस्था आहे.
गजानन जाधव, मुख्याध्यापक, आतोणे प्राथमिक शाळा
आतोणेसारख्या प्राथमिक शाळेच्या अवस्थेबाबत दरवर्षी जिल्हा परिषदेकडे दुरुस्तीचे प्रस्ताव पाठवतो; मात्र अद्याप या प्रस्तावावर मंजुरी नसल्याने हे काम रखडले आहे.
सादूराम बांगारे, गटशिक्षण अधिकारी, रोहा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.