मुंबई, ता. ३० : शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची सोडत आज पुण्यात काढण्यात आली. यात किती जागांवर प्रवेश जाहीर झाले, याची माहिती मात्र प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केली नाही, त्यामुळे या माहितीसाठी विलंब होणार आहे; तर दुसरीकडे ज्या विद्यार्थ्यांना या सोडतीत प्रवेश जाहीर झाले असतील, त्या पालकांना सोमवारपासून प्रवेशाचा एसएमएस उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
आज प्राथमिक शिक्षण संचानालयाने पुणे येथील विद्या प्राधिकरणाच्या सभागृहात आरटीई प्रवेशाची ऑनलाईन सोडत काढली. यावेळी प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर, उपसंचालक राजेश क्षीरसागर यांच्यासह पालक प्रतिनिधीदेखील उपस्थित होते. आज जाहीर झालेल्या सोडतीसाठी राज्यातील ९ हजार ८८ शाळांमधील १ लाख १ हजार ९७७ जागांसाठी २ लाख ८२ हजार ७७८ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते. यात मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर आदी शहरांतील खासगी शाळांतील प्रवेशाची पालकांनी सर्वाधिक अर्ज केले आहेत. मुंबईतील दक्षिण मुंबईत असलेल्या शाळांमध्ये पालकांचे सर्वाधिक अर्ज आलेले असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले; तर पुण्यातील पोदार इंंटरनॅशनल स्कूलमध्ये उपलब्ध असलेल्या पहिलीच्या वर्गाच्या ७४ जागांसाठी तब्बल ३ हजार १०२ विद्यार्थ्यांचे अर्ज आलेले असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. पुणे विभागात उपलब्ध असलेल्या ९५७ शाळांमधील १५ हजार १३१ जागांसाठी ६२ हजार ९५६ विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत.
आरटीई प्रवेशाच्या लाॅटरी प्रक्रियेत नाव आलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना सोमवार, ४ एप्रिल सायंकाळी ४ वाजल्यापासून प्रवेश मिळाल्याचा एसएमएस पाठविण्यात येणार आहे. मात्र पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई प्रवेशाच्या वेबसाईटवरून प्रवेश मिळाल्याची खात्री करून घ्यावी, अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जारी केल्या आहेत; तर मुंबईतील ३४३ शाळांमधील ६ हजार ४८१ जागांसाठी १५ हजार ५० विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज आले असून त्यात सर्वाधिक अर्ज हे दक्षिण मुंबईत असलेल्या शाळांसाठी असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.