ताडदेव आग प्रकरण
---
रहिवासी दोन दिवसांपासून बेघरच
वीज, पाणीपुरवठा बंद असल्याने गैरसोय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ ः ताडदेव येथील ‘कमला’ इमारतीला शनिवारी (ता. २२) लागलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर सर्व रहिवाशांना बाहेर काढण्यात आले. दोन दिवसांनंतरही इमारतीचा वीज, पाणीपुरवठा सुरू झाला नाही. रहिवाशांना अद्याप त्यांच्या घरी जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे रहिवासी अजूनही बेघर असल्यासारखे राहत आहेत. दरम्यान, आतापर्यंत या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला, तर २३ जण जखमी आहेत.
कमला इमारतीच्या १८ व्या मजल्यावर आग लागल्यानंतर तिची झळ १९ व्या मजल्यावर, तसेच खालील १६ ते १५ व्या मजल्यापर्यंत बसली. त्यामुळे इमारतीतल्या अनेक घरांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. तसेच इमारतीचा वीज आणि पाणीपुरवठा अजूनही सुरू करण्यात आलेला नाही. त्यामुळे रहिवाशांना दोन दिवसांनंतरही बेघर म्हणून राहावं लागत आहे. सध्या रहिवाशांना त्यांच्या घरातून काही सामान घ्यायचे असल्यास, त्यांना पोलिस शिपाई आणि इमारतीच्या सुरक्षा रक्षकांना घेऊन जावे लागत असल्याचे इमारतीतील रहिवासी गणेश सावंत यांनी सांगितले.
---
स्ट्रक्चरल ऑडिट होणार
कमला इमारतीत इलेक्ट्रिक डक्टमधून आग लागली होती. त्यामुळे वीजजोडणीची पूर्ण तपासणी केल्याशिवाय वीजपुरवठा सुरू करणे शक्य नसल्याची माहिती बेस्टकडून देण्यात आली आहे. आगीमुळे काही घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे घरांच्या दुरुस्तीलाही वेळ लागणार आहे. आग विझवण्यासाठी पाण्याचा मारा केल्याने सर्व घरांमध्ये पाणी साचलेले आहे, ते स्वच्छ करायलाही वेळ लागेल. त्यामुळे आम्हाला घरात जायला आणखी किमान पुढचे १० दिवस तरी लागतील, असा रहिवाशांचा अंदाज आहे.
---
अग्निशमन दलाच्या अहवालानंतर कारवाई
गावदेवी पोलिसांनी आगीत झालेल्या मृत्यूंची अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली आहे. अद्याप कुणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. अग्निशमन दल सध्या आगीचा तपास करत आहे, तसेच बेस्टकडूनही तपास सुरू आहे. तपासात कुणी दोषी आढळल्यास त्यानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गावदेवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामपियारे राजभर यांनी दिली.
---
बीएमसी शाळेत आसरा
कमला इमारतीच्या बी विंगमध्ये जवळपास १०० रहिवासी राहत होते. आग लागल्यानंतर सगळे बाहेर पडले. अनेक जणांनी मित्र आणि नातेवाईकांकडे आसरा घेतला आहे. तसेच नजीकच्या महापालिकेच्या शाळेतही रहिवाशांची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. इमारतीतील २५ रहिवासी सध्या या शाळेत राहत आहेत. त्यांच्यासाठी जेवण, औषधं आदी सर्व गोष्टी पुरवण्यात येत असल्याचे रहिवाशांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.