सुधागडमध्ये गांधीगिरी
निवेदन, तक्रारी, निदर्शने व आंदोलन यातून काही होईना; निबंध स्पर्धेतून पालीतील विविध समस्यांना फुटणार वाचा
पाली, ता. १२ (वार्ताहर) ः अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली शहराला सध्या विविध नागरी समस्यांनी ग्रासले आहे. शुद्ध पाणी योजना, बसस्थानकाची दुरवस्था, रस्त्यातील खड्डे या समस्यांनी नागरिक मेटाकुटीला आले आहेत. याविरोधात नागरिक आणि पाली सुधागड संघर्ष संस्थेच्या माध्यमातून अनेक तक्रारी, निवेदने, निदर्शने, आंदोलने व पाठपुरावा केला, मात्र या मागण्यांना प्रशासन व लोकप्रतिनिधींनी केराची टोपली दाखविली आहे. अखेर संस्थेने गांधीगिरीचा मार्ग अवलंबला असून, नागरिकांकडूनच निबंधाच्या माध्यमातून या विषयाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे.
पाली सुधागड संघर्ष संस्थेच्या माध्यमातून अनोखी निबंध स्पर्धा दर महिन्याला आयोजित केली जाणार आहे. यामध्ये विविध समस्यांवर नागरिकांकडून निबंध मागवले असून, स्पर्धकांना योग्य ते बक्षीस दिले जाणार आहे. किमान या माध्यमातून संबंधित प्रशासन व लोकप्रतिनिधींना लक्ष वेधून समस्या मार्गी लागतील, अशी आशा संस्थेने व्यक्त केली आहे. ऑगस्ट महिन्यात वाकण पाली-खोपोली महामार्गावरील खड्डे व एमएसआरडीसीचे दुर्लक्ष हा विषय आहे. बुधवारी (ता. १३) दुपारी ३ वाजेपर्यंत स्कॅन कॉपी किंवा टाईप केलेले निबंध व्हॉट्सॲपच्या माध्यमातून स्वीकारले जाणार असून, बुधवारी (ता. १५) निकाल जाहीर होणार आहे, तर हे सर्व निबंध हे समाजमाध्यमांवर प्रकाशित केले जाणार आहेत.
शहराला समस्यांनी ग्रासले
शहरात ठिकठिकाणी अतिक्रमणे वाढली आहेत. अंतर्गत रस्ते आणि महामार्गावरदेखील खड्डे पडले आहेत. डम्पिंग ग्राउंडची दुरवस्था आहे. पाली बसस्थानकाचे नूतनीकरण रखडले आहे. पंचवीस कोटीची शुद्ध पाणी योजना अजून लालफितीत अडकली असून, नगर पंचायतीमध्ये वारंवार राजकीय फेरबदल होतात. नगर पंचायतीमध्ये अंतर्गत गटबाजीमुळे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
केराची टोपली
विविध समस्यांवर सनदशीर मार्गाने आवाज उठवला. नगर पंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये झाडे लावून आंदोलन केले. सातत्याने या समस्या मार्गी लावण्यासाठी पाठपुरावादेखील करत आहोत, मात्र या समस्या जैसे थेच आहेत. याकडे संबंधित प्रशासन लोकप्रतिनिधी व पुढारी यांची पूर्णपणे डोळेझाक होताना दिसत आहे. त्यामुळेच निबंध स्पर्धेचा मार्ग असून, चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
फोटो ओळ
पाली ः बसस्थानकाची दुरवस्था
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.