जलक्रीडांमुळे जीवाची बाजी
बंदी असताना किनाऱ्यावरील साहसी खेळांना सुरुवात
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २१ ः ढगाळ वातावरण, उसळणाऱ्या लाटांमध्ये किनाऱ्यांवरील साहसी खेळ सुरू झाले आहेत; पण कोणत्याही विभागाने परवानगी दिलेली नसताना अशा खेळांना सुरुवात झाल्याने पर्यटकांच्या जीवाशी खेळ सुरू झाला आहे.
मेच्या मध्यापासून कोकणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांच्या मनोरंजनासाठीचे साहसी खेळ बंद आहेत. नवा हंगाम लवकर सुरू होत नसल्याने कामगारांचा पगार, गुंतवणुकीवर झालेला खर्च वाढतच जात असल्याने व्यावसायिकांनी साहसी जलक्रीडा सुरू केले आहेत. खराब हवामानामुळे जलवाहतूक, मासेमारी पूर्ण क्षमतेने होत नसताना शनिवार, रविवारी समुद्रकिनाऱ्यांवर बनाना राईड्स, जेट स्कीईंग, पॅरासेलिंग आणि बम्पर राईड्ससारख्या जलक्रीडांचा आनंद घेत आहेत. हा प्रकार जीवावर बेतण्याचा धोका अधिक असल्याने खराब हवामानात साहसी खेळांना परवानगी कोणी दिली, असा प्रश्न स्थानिकांमधून विचारला जात आहे.
----
पर्यटकांची सुरक्षा सर्व व्यावसायिकांची आहे. अतिथी देवो भवप्रमाणे त्यांना वागणूक देणे अपेक्षित असताना काही व्यावसायिक त्यांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. संबंधित यंत्रणेने अशा व्यावसायिकांवर कारवाई करावी.
- सिद्धार्थ पाटील, स्थानिक नागरिक