परतीच्या पावसाचा फटका
तब्बल सहा महिने मुक्काम; भातशेतीबरोबर अनेक व्यावसायिकांचे नुकसान
पाली, ता. २८ (वार्ताहर) ः परतीच्या पावसाचा फटका जिल्ह्यातील भातशेतीबरोबरच अनेक व्यवसायांना बसला आहे. यंदा जिल्ह्यात मेपासूनच पावसाला सुरुवात झाली; मात्र अद्यापही ऑक्टोबरच्या अखेरीसही तो मुसळधार कोसळत आहे. त्यामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे.
पावसाळा लांबल्याने बांधकाम, विकासकामे, भात गिरणी, वीटभट्टी, कुंभारकाम, सुकी मासळी, मंडप व डेकोरेशन आदी व्यावसायिक हतबल झाले आहेत. त्यांना प्रचंड नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. लांबलेल्या पावसामुळे विविध व्यवसाय अक्षरशः डबघाईला आले आहेत. शेतामध्ये भातपीक डोलू लागले होते आणि तयार झालेला भातकापणीसाठी शेतकरीदेखील सज्ज होता. या हंगामात शेतकरी कापणी करून भात गिरण्यांवर तो भरडण्यासाठी गर्दी करतात; मात्र तयार झालेला भात शेतात पाण्यात आडवा पडल्यामुळे शेतकऱ्यांचे तर नुकसान झालेच; मात्र भात गिरणी व्यावसायिकांचेदेखील नुकसानीमुळे कंबरडे मोडले आहे.
..................
कुंभारकाम व्यवसायावर पाणी
पालीतील कुंभारकाम व्यावसायिक म्हणाले, की परतीच्या पावसामुळे मडकी, चुली व मातीच्या इतर वस्तू आणि मातीची खेळणी खराब झाल्या आहेत. शिवाय, पाऊस आणि गारवा असल्याने मडकी व चुलींची विक्रीदेखील थांबली आहे. ऐन दिवाळीच्या हंगामात पाऊस असल्यामुळे पणती विक्रीलाही त्याचा फटका बसला. मातीच्या वस्तू भाजण्यासाठी लागणारा पेंढा, लाकडे व कोळसादेखील भिजला आहे. त्यामुळे भट्टी लावणे अवघड झाले आहे. माती भिजल्याने ती पुन्हा वापरता येणार नाही. मालाला उठावसुद्धा मिळत नाही. त्यात झालेले नुकसान यामुळे खूप वाताहत होत आहे.
................
चौकट २
मंडप व डेकोरेशन व्यवसाय नुकसानीत
सुधागड तालुक्यातील मंडप व डेकोरेशन व्यावसायिक सखाराम साजेकर म्हणाले, की मे महिन्यात ऐन हंगामात पाऊस सुरू झाल्याने प्रचंड नुकसान झाले. शिवाय कापड, पडदे, इलेक्ट्रिक व डेकोरेशनचे सामान भिजून खराब झाले. सध्या लग्नसराई व सार्वजनिक आणि राजकीय कार्यक्रम सुरू होतील; मात्र ऐनवेळी कोसळणाऱ्या परतीच्या पावसामुळे काही ऑर्डर रद्द झाल्या आहेत. अचानक पाऊस कोसळत असल्याने धास्ती वाटते, असेदेखील ते म्हणाले.
................
चौकट ३
बांधकाम व्यवसायावर गदा
जिल्ह्यात बांधकाम व्यवसाय व फार्महाऊस व्यवसाय वाढत चालला आहे. नवनिर्माणाची कामेदेखील काही प्रमाणात होताना दिसत आहेत; मात्र स्लॅब टाकणे, वीटकाम करणे, भराव किंवा उत्खनन करणे, रंगकाम करणे आदी कामांना परतीच्या पावसामुळे प्रचंड अडथळा येत आहे. त्यामुळे ही कामे पूर्णता खोळंबली आहेत. पालीतील ग्रीन टच नर्सरीचे मालक अमित निंबाळकर यांनी सांगितले, की विविध ठिकाणी गार्डनिंगची आणि विकसकाची कामे सुरू आहेत; मात्र ऐनवेळी येणाऱ्या परतीच्या पावसामुळे सर्व कामे खोळंबली आहेत; मात्र कामे बंद असली तरी मजुरी द्यावी लागते. त्यामुळे अनेकांना नुकसान होत आहे.
...............
चौकट ४
वीटभट्टी व्यवसाय संकटात
वीटभट्टी व्यवसाय हा बांधकाम व्यवसायाचा कणा मानला जातो. त्यामुळे जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात वीटभट्टी व्यवसाय रुजला आणि वाढला आहे. दरवर्षी पावसाळा कमी झाल्यावर सर्वच वीटभट्ट्यांवर कामाची लगबग सुरू होते; मात्र यंदा पाऊस खूपच लांबला आहे. यामुळे वीटभट्टी व्यवसाय संकटात सापडला आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी लहान-मोठे शेकडो वीटभट्टी व्यवसाय आहेत. कित्येक करोडो रुपयांचा हा उद्योग चालतो. परतीच्या पावसामुळे मात्र या व्यवसायासाठी आवश्यक असणारी पूर्वतयारी करणे अवघड झाले आहे. अनेक शेतांत पाणी साचले आहे. त्यामुळे पाणी सुकेपर्यंत तिथे वीटभट्टी सुरू करणे शक्य होत नाही. असंख्य कच्च्या विटा पावसामुळे खराब झाल्या आहेत. विटा पाडण्यासाठी जमा करून ठेवलेली मातीदेखील पावसामुळे वाहून गेली आहे. विटा भाजण्यासाठी लागणार कोळसा, भाताचा कोंडा किंवा तूसदेखील भिजून खराब झाला आहे. याबरोबरच काही ठिकाणी विटा पाडण्याचे काम सुरू न झाल्याने काही मजुरांना आगाऊ दिलेली रक्कमदेखील वाया गेली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे अशा विविध मार्गाने वीटभट्टी चालक व मालकांचे नुकसान झाले आहे.
.............
व्यापारी व विक्रेते चिंतेत
अवकाळी पाऊस सुरू असल्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बाजारपेठांमध्ये गिऱ्हाईक फिरकत नाही. त्यामुळे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. याशिवाय आठवडा बाजारपेठांवरदेखील अवकाळी पावसाचे संकट ओढावले आहे. फिरते विक्रेतेदेखील अवकाळी पावसामुळे हतबल झाले आहेत.
..............
सुकी मासळी व्यवसायाला फटका
सुधागड तालुक्यातील पेडली येथील सुकी मासळीविक्रेते सुनील कोळी यांनी सांगितले, की यंदा मे मध्येच पावसाला सुरुवात झाली आणि याच वेळी सुक्या मासळीचा व्यवसाय तेजीत असतो. त्यामुळे मे मध्ये मोठ्या प्रमाणात माल भरून ठेवला होता; मात्र अवकाळी पाऊस सुरू झाल्याने सर्व माल खराब झाला. परिणामी, नुकसानीला सामोरे जावे लागले. आता दिवाळीमध्येदेखील सुकी मासळीचा धंदा तेजीत असतो; मात्र परतीचा पाऊस सुरू असल्यामुळे माल खराब होण्याची भीती आहे. मालाला उठावदेखील कमी झाला आहे. शिवाय, घाऊक बाजारात सुक्या मासळीच्या किमतीदेखील वाढल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.