रायगडमध्ये स्थलांतरित पाहुण्यांचे आगमन
हजारो किलोमीटरचा प्रवास करून पक्षी दाखल; पर्यटकांना पर्वणी
पाली, ता. ६ (वार्ताहर) : जिल्ह्यात लांबलेला पाऊस व प्रतिकूल हवामान याचा पक्ष्यांच्या स्थलांतरावर परिणाम झाला होता, मात्र आता वातावरणात अनुकूल बदल झाले आहेत. थंडीच्या हंगामात हजारो किलोमीटरचा प्रवास करून विविध देशी व विदेशी स्थलांतरित पक्षी रायगड जिल्ह्यात दाखल होत आहेत. या पक्ष्यांसाठी वातावरण अनुकूल झाले आहे. थंडीही चांगली पडू लागली असल्याने हे स्थलांतरित व स्थानिक पक्षी स्थिरावले आहेत. त्यामुळे पक्षी अभ्यासक, निरीक्षक व पर्यटक सुखावले आहेत.
स्थलांतरित पक्ष्यांसाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली असल्याने त्यांनी जिल्ह्यात हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. गुलाबी थंडीची चाहूल लागल्याने निसर्गरम्य रायगड जिल्ह्यात परदेशी स्थलांतरित पक्षी आणि काही स्थानिक स्थलांतरित पक्ष्यांची रेलचेल पाहायला मिळत आहे. गवतामधील कीटक व अळ्या तसेच साठलेल्या जलाशयामधील कीटक, कृमी, मृदुकाय जीव-जंतू खाण्यासाठी पक्षी साधारणत: नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान येत असतात. विशेष म्हणजे समुद्रकिनारे, दलदलीच्या भागातील छोटे खेकडे, मृदुकाय प्राणी, मासे, जलकीटक खाऊन पर्यावरणाचे संरक्षण व जैवविविधता समृद्ध करण्यासाठी हे स्थलांतरित पक्षी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. या पक्ष्यांचे दर्शन जिल्ह्यातील समुद्रकिनारे, दलदलीच्या जागा, जंगले, भातशेते, खाड्या तसेच गवताळ प्रदेशात सध्या होत आहे. परिणामी पक्षी अभ्यासक व निरीक्षकांना तसेच पर्यटकांना ही मोठी पर्वणीच आहे.
..............................
चौकट
परदेशी स्थलांतरित पक्ष्यांचा बोलबाला
ब्ल्यू थ्रोट (शंकर), युरोपियन रोलर (तास पक्षी), युरेशियन रायनेक (मानमोडी), सायबेरियन स्टोनचाट (गप्पीदास पक्षी), बंटिंग्स (भारीट पक्षी), पॅलिड हॅरिअर (पांढुरका भोवत्या) या परदेशी स्थलांतरित पक्ष्यांचा बोलबाला येथे पाहायला मिळतो.
..................
चौकट
स्थानिक पक्ष्यांचे आगमन
पॅराडाइज फ्लाय कॅचेर (स्वर्गीय नर्तक), इंडियन रोलर (भारतीय तास पक्षी), श्राईक (खाटीक), युरेशियन हुपू (हुदहुद), क्रेस्टेड बंटिंग (युवराज) या स्थानिक पक्ष्यांचे आगमन सुरू झाले आहे.
....................
समुद्रकिनारे गजबजले
पक्षी अभ्यासक शंतनू कुवेसकर यांनी सांगितले, की रायगड जिल्ह्यात ४०० हून अधिक पक्षी प्रजातींची नोंद आहे. हजारो किनारी पक्षी महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या पाणथळ प्रदेशात आणि वालुकामय किनाऱ्यांवर येतात. हे स्थलांतर हा एक उल्लेखनीय प्रवास आहे, ज्यामध्ये पक्षी त्यांच्या प्रजननाच्या ठिकाणापासून हजारो किलोमीटर प्रवास करून सायबेरिया आणि उत्तर युरोपसारख्या ठिकाणी कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी किंवा चीनमधूनही उष्ण हवामानात मुबलक अन्न स्रोत शोधण्यासाठी भारतात येतात. भारतातील हिवाळी पक्षी मध्य आशियाई फ्लायवे वापरतात. येथील समुद्रकिनारी प्रामुख्याने तुतवार, चिखल्या, कुरव, व्हिमब्रेल्स, लहान कोरल, युरेशिअन कोरल, सामान्य टीलवा, हिरवा तुतवार, पाणलावे, सुरय, समुद्री काळे बगळे आणि कालवफोडे आणि चिंबोरी खाऊ, रंगीत भाट तितर हे असामान्य पक्षी आहेत. पक्षी छायाचित्रकार या पक्षी हालचालींच्या कृती छायाचित्रबद्ध करण्याच्या संधीचा आनंद घेतात.
...................
जगण्यासाठी प्रवास
उत्तर गोलार्धातील युरोप, रशिया आणि उत्तर अमेरिका यासारख्या देशांत थंडीच्या दिवसांत पडणाऱ्या बर्फामुळे जमिनीवरील भूभाग हा बर्फाने आच्छादलेला असतो. त्यामुळे पक्ष्यांना खाद्य मिळणे कठीण होऊन जाते म्हणून हे पक्षी विविध देशात स्थलांतर करून आपली उपजीविका भागवतात. तसेच आपल्याकडे पडणारी थंडी आणि पुरेशा प्रमाणात मिळणारे खाद्य तसेच योग्य अधिवास या सर्व कारणांमुळे या पक्ष्यांना आपली घरटी बांधून पिल्लांचे संगोपन करणे सोपे जाते. म्हणून बऱ्याच स्थलांतरित पक्ष्यांचा विणीचा काळ सुद्धा हाच असतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.