सत्तासंघर्षासाठी सर्वच पक्ष सज्ज
रायगड जिल्हा परिषद निवडणूक चुरशीची; शिंदे गटाचे सर्वाधिक ४० उमेदवार रिंगणात
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १ : रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रचाराची रंगत वाढत चालली असून, सर्वच पक्ष झुंज देण्यास सज्ज झाले आहेत. पक्षनिहाय उमेदवारीच्या आकडेवारीत शिंदे गटाने सर्वाधिक ४० उमेदवार उभे करत आपली ताकद दाखवली आहे. भाजपने ३० तर अजित पवार गटाने २९ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. मागील निवडणुकीत २३ जागा जिंकून जिल्हा परिषदेत सत्तेचा प्रमुख घटक ठरलेला शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) यंदा मात्र १९ जागांवरच लढत देत असल्याने त्याची पीछेहाट स्पष्टपणे दिसून येत आहे.
निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उघड झाले असून, सत्ताधारी महायुतीमधील घटक पक्ष अनेक ठिकाणी एकमेकांविरुद्ध उभे ठाकल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदाची जिल्हा परिषद निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. प्रत्येक पक्षाने आपली ताकद वाढवण्यासाठी रणनीती आखली असून, ग्रामीण मतदारसंघांत जोरदार प्रचार सुरू आहे. शिंदे गटाने उत्तर रायगडात भाजपसोबत युती केली असली तरी सर्वाधिक ४० जागांवर उमेदवार उभे करून आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपने ३० मतदारसंघांत उमेदवार उतरवले असून, दक्षिण रायगडात भाजपसोबत युती असलेल्या अजित पवार गटाने २९ जागांवर उमेदवारी जाहीर केली आहे. शेकाप आणि ठाकरे गट यांनी प्रत्येकी १९ मतदारसंघांत उमेदवार दिले आहेत. काँग्रेस पक्षाने नऊ जागांवर आपले उमेदवार उभे केले असून, मनसेने तीन मतदारसंघांत उमेदवारी दिली आहे. वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांनी प्रत्येकी एका जागेवर उमेदवार दिल्याने या पक्षांची भूमिका मर्यादित स्वरूपाची राहणार असल्याचे चित्र आहे. याशिवाय २१ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून, त्यामध्ये विविध पक्षांचे बंडखोर उमेदवारही आहेत.
शेकापची अस्थित्वाची लढाई
सातत्याने जिल्हा परिषदेत सत्तेत राहिलेल्या शेकापसाठी यंदाची निवडणूक आव्हानात्मक ठरताना दिसत आहे. मागील निवडणुकीत २३ जागा जिंकून शेकाप सत्तेतील प्रमुख घटक ठरला होता आणि जिल्हा परिषद अध्यक्षपदही पक्षाकडे होते. मात्र, या वेळी अनेक नेते व कार्यकर्ते पक्ष सोडून अन्य पक्षांत सामील झाल्याने उमेदवार शोधण्यात पक्षाला अडचणी आल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेकापच्या प्रभावाला आव्हान निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मॅजिक फिगर गाठण्यासाठी चढाओढ
जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेला ३१ चा ‘मॅजिक फिगर’ गाठण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची चढाओढ सुरू आहे. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणे कठीण असल्याने अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या भूमिकेला महत्त्व येणार आहे. बंडखोर उमेदवार आणि स्थानिक समीकरणे निकालावर निर्णायक प्रभाव टाकू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पक्ष उमेदवारांची संख्या
शिंदे गट ४०
भाजप ३०
अजित पवार गट २९
शेकाप १९
ठाकरे गट १९
काँग्रेस ९
मनसे ३
इतर प्रत्येकी १ जागा
(वंचित, आप, कम्युनिस्ट)
अपक्ष २१ बंडखोरांमुळे चुरस वाढली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.