रायगड जिल्हा परिषदेत शिवसेना बलाढ्य
शिवसेनेचा २१ जागांवर विजय; भाजपा १५, राष्ट्रवादी १६
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ९ : रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) सर्वाधिक २१ जागा जिंकत बलाढ्य पक्ष म्हणून पुढे आली आहे. भाजपाचे १५ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे १६ उमेदवार विजयी झाले आहेत. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेला ३० चा बहुमताचा आकडा कोणत्याही पक्षाला गाठता आलेला नसल्याने आता सत्तेसाठी युती अपरिहार्य ठरणार आहे.
या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील राजकीय चुरस विशेष लक्षवेधी ठरली. प्रचारापासून मतमोजणीपर्यंत रंगलेली ही लढत निकालानंतरही कायम आहे. महायुतीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) पुढे कोणाशी हातमिळवणी करणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना भाजपासोबत सत्ता स्थापन करणार की भाजप व राष्ट्रवादी एकत्र येणार, याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. पंचायती समितीमध्येही शिवसेनेने मोठा विजय मिळवला असून १५ पैकी ६ पंचायत समित्यांमध्ये वर्चस्व निर्माण केले आहे.
दरम्यान, या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का बसला असून जिल्हा परिषदेत पक्षाचे खातेही उघडता आलेले नाही. पंचायत समिती स्तरावर मात्र पोलादपूर आणि अलिबाग येथे प्रत्येकी दोन उमेदवार विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीने उरण पंचायत समितीत चांगली कामगिरी केली असली तरी जिल्ह्याच्या इतर भागांत अपेक्षित प्रभाव दाखवता आलेला नाही. स्थानिक पातळीवर भाजपाने पेण आणि पनवेलमध्ये आपला गड अधिक मजबूत केला आहे. तर शिवसेनेने अलिबाग, महाड, माणगाव आणि पोलादपूरमध्ये प्रभाव वाढवला असल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. स्पष्ट बहुमत नसल्याने पुढील काही दिवसांत सत्तास्थापनेसाठी राजकीय हालचाली वेग घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.