महाड, ता. ७ (बातमीदार) : तालुक्यातील सव आणि कोंडिवते येथील गरम पाण्याच्या कुंडानंतर आता संशोधकांना शिरगाव येथे आणखी एका गरम पाण्याचा झरा आढळला आहे. येथील एम. एम. जगताप महाविद्यालयाच्या भूगोल विषयाच्या विभागप्रमुख गीतांजली पाटील आणि इतिहास विषयाचे डॉ. अंजय धनावडे या दोन संशोधकांनी झऱ्याचा शोध लावला आहे. यामुळे कोकणातील गरम पाण्याचे झरे व कुंड यावर प्रकाशझोत पडणार आहे.
माणगावमधील डी. जी. तटकरे महाविद्यालयात मार्चमध्ये झालेल्या ‘पर्यावरण नियोजन आणि शाश्वततेसाठी भू-स्थानिक तंत्रज्ञानातील प्रगती’ या विषयाच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये ‘शिरगाव येथील गरम पाण्याचा झरा एक चिकित्सक अभ्यास’ या शीर्षकाखाली दोन्ही संशोधकांनी हे संशोधन प्रसिद्ध केले होते. काही दिवसांपूर्वी हे संशोधन पुस्तकरूपाने प्रकाशित झाल्याने त्यात महाड तालुक्यात आढळलेल्या अनेक गरम पाण्याच्या झऱ्यांप्रमाणे शिरगाव येथे आढळलेल्या झऱ्याची नव्याने नोंद झाली आहे. त्याची जीपीएस पद्धतीने स्थान निश्चिती करून, पाण्याचे रासायनिक गुणधर्म, तापमान, चव यांचा वैज्ञानिक आणि भौगोलिक अभ्यास केला गेला आहे.
भूगर्भातील मॅग्मामुळे तलाव आणि झऱ्याचे पाणी गरम होते. उष्णतेमुळे गरम झालेले पाणी पृथ्वीच्या कवचास असलेल्या भेगांमधून पृष्ठभागावर येते यातूनच ज्या ठिकाणी कमकुवत भूपृष्ठ असेल, तिथे गरम पाण्याचे झरे निर्माण होत असल्याचे प्रा. गीतांजली पाटील यांनी सांगितले. शिरगाव येथील गरम पाण्याचे सरासरी तापमान ३८ डिग्री असून त्याचे रासायनिक पृथक्करण केले असता पाण्यात सिलिका क्लोराइड सल्फेटचे प्रमाण आढळून आले. पाण्यास गंधकाचा वास येत असला तरी पाण्यामध्ये सल्फर आणि आयर्नचे प्रमाण सापडले नसल्याचे गीतांजली यांनी स्पष्ट केले.
प्रयोगशाळांमध्ये तपासणीनंतर निष्कर्ष
शिरगाव येथील झऱ्याच्या पाण्यासोबत, सव आणि कोंडीवते येथील गरम पाण्याचेही रासायनिक पृथक्करण केले गेले. प्राथमिक संशोधन एम. एम. जगताप महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत तर नंतर प्रिवी कंपनीच्या प्रयोगशाळेत तपासले गेले. यासाठी विज्ञान विभागाच्या प्रा. ऐश्वर्या पाटील, दिव्या तांबे आणि विद्यार्थी सामीन उभारे, तसेच देवव्रत निवाते यांची मदत झाली. अधिक संशोधनासाठी प्रिवी कंपनीचे संशोधक पराग हेलेकर यांनी मदत केली. या संशोधनासाठी शिरगावचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी परवानगी दिली होती. एम. एम. जगताप महाविद्यालयाकडून संशोधनास नेहमीच वाव दिला जात असल्याचे प्राचार्य डॉ. एम. एन. वाणी यांनी सांगितले.
कोकणात अनेक ठिकाणी गरम पाण्याचे झरे किंवा कुंड आढळून येतात. या कुंडांचे तिथल्या धार्मिक स्थळांशी सांस्कृतिक संबंध असतो. आतापर्यंत महाड तालुक्यात कालवली, कोंडीवते आणि सव या ठिकाणी गरम पाण्याचे कुंड असल्याचे माहीत होते. यासाठी परिसरातील गरम पाण्याच्या झऱ्यासोबत सावित्री नदीची उपनदी, अंबा हिच्या काठावर वसलेल्या शिरगाव येथील गरम पाण्याचादेखील अभ्यास केला. झऱ्यांचा उगम इमारतीसाठी खोदकाम सुरू असताना झाला आहे.
- डॉ. अंजय धनावडे, इतिहास अभ्यासक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.