रायगडात फुटणार ‘राजकीय’ दहीहंडी
गोविंदांना राजकीय लोण्याचा लाभ
महाड, ता. ११ (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यात दहीहंडी उत्सवाला यंदा राजकीय रंग चढला असून, गोविंदांच्या थरांबरोबरच राजकीय थरही रचले जाणार आहेत. पालकमंत्रिपदामुळे तापलेले जिल्ह्याचे राजकीय वातावरण, पक्षांतर्गत गटबाजी तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुका या साऱ्या पार्श्वभूमीवर यंदाची दहीहंडी राजकीय कुरघोडीचे मैदान ठरणार आहे.
अलीकडच्या काळात दहीहंडी आणि गोपाळकाला हे केवळ धार्मिक-सांस्कृतिक उत्सव न राहता, सार्वजनिक व राजकीय इव्हेंटमध्ये परावर्तित झाले आहेत. अनेक ठिकाणी राजकीय नेते आपली ताकद दाखवण्यासाठी मोठ्या बक्षिसांच्या दहीहंड्या लावत आहेत. रायगड जिल्हाही त्याला अपवाद नाही. मागील पाच वर्षांत जिल्ह्याच्या राजकारणात मोठे उलथापालथीचे टप्पे आले असून, त्याचे पडसाद आता उत्सवात उमटत आहेत.
यंदा जिल्ह्यात तब्बल ८,५१० दहीहंड्या उभारल्या जाणार आहेत. यापैकी ६,६४२ खासगी आणि १,८६८ सार्वजनिक आहेत. शिवसेना, भाजप, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशा प्रमुख पक्षांकडून गोविंदांना लाखो रुपयांच्या बक्षिसांचे लोणी दाखवले जात आहे. काही तालुक्यांत एक लाखाहून अधिक रकमेच्या दहीहंड्या लावल्या जात असून, एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी त्याहून जास्त रकमेची दहीहंडी उभारण्याची स्पर्धा सुरू आहे.
पेणमध्ये वैकुंठशेठ पाटील मित्रमंडळाकडून प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघानुसार वेगवेगळ्या रकमेच्या दहीहंड्या ठेवण्यात आल्या आहेत. पाली येथे भाजपकडून २,२२,२२२ ची दहीहंडी, तर बालगोपाळासाठी ५१,०००ची हंडी जाहीर करण्यात आली आहे. यावर मात करण्यासाठी शिवसेना (शिंदे गट)कडून तब्बल तीन लाखांची हंडी उभारण्यात येणार आहे. रोह्यात सुनील तटकरे मित्रमंडळाची दहीहंडी परंपरेने मोठी असते, पण यंदा अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनीही स्पर्धेत उतरत दहीहंडी उभारण्याचा निर्धार केला आहे. महाडमध्ये आमदार भरत गोगावले मित्रमंडळ, अलिबागमध्ये प्रशांत नाईक मित्रमंडळ तसेच पेण, रोहा, कर्जत या ठिकाणीही मोठ्या रकमेच्या दहीहंड्या राजकीय पक्षांकडून आयोजित केल्या आहेत.
यंदाच्या उत्सवात गोविंदांसाठी फक्त बक्षीसच नव्हे तर राजकीय पक्षांचे टी-शर्ट, टोप्या, पट्ट्या अशा प्रचारात्मक वस्तूंचीही मागणी वाढली आहे. त्यामुळे पारंपरिक ढाकूमाकूमच्या तालाबरोबरच राजकीय घोषणाही कानावर पडण्याची शक्यता आहे. मोठ्या बक्षिसांच्या आमिषामुळे महिला गोविंदा पथकांमध्येही उत्साह वाढला आहे. उत्सव संपल्यानंतर मात्र खरी उत्सुकता असेल, कोणाचा राजकीय थर गडगडतो, कोणाची दहीहंडी फुटते आणि कोणाला यशाचे बक्षीस मिळते हे पाहण्याची.
..........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.