मत्सशेतीतून हक्काचा रोजगार
महाड तालुक्यातील आदिवासींना लाखोंचे उत्पन्न
महाड, ता. २३ (बातमीदार) : आंबवडे गावातील धरण क्षेत्रात श्रमजीवी सहकारी सामाजिक संस्थेच्या पुढाकारातून मत्स्यशेती प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पांत माशांच्या विविध प्रजातींच्या उत्पादनातून आदिवासी समाजाला हक्काचा रोजगार मिळाला आहे.
आदिवासी, कातकरी समाज पारंपरिकरित्या मासेमारी, जंगलातील फळभाज्यांची विक्री, मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. महाड-पोलादपूर तालुक्यातील नदी-नाले, जलस्रोत औद्योगिक रसायनांमुळे प्रदूषित आहेत. परिणामी, पारंपरिक मत्स्यव्यवसायावर मर्यादा आल्या असून, आदिवासींना उदरनिर्वाहासाठी झगडावे लागत आहे. विशेष म्हणजे, शासनाच्या विविध योजना असूनही प्रत्यक्ष परिणाम मात्र जीवनमानावर झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे तालुक्यातील फौजी आंबवडे गावातील धरण क्षेत्रात मत्स्यशेतीचा प्रकल्प करण्यात आला आहे. या प्रकल्पाला शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, मच्छीमार सहकारी संस्था, मुंबईच्या महानगर गॅस लिमिटेडचे आर्थिक सहकार्य लाभले असून, तिलापिया माशांबरोबर रोहू, कटला, मृगिल अशा विविध जातींचे प्रयोगशील उत्पादन सुरू आहे.
-----------------------------------
९ ते १० लाखांची उलाढाल
तिलापिया माशांचे येथे उत्पादन घेतले जात आहे. १०० ते १५० ग्रॅमपासून दोन किलोपर्यंत वजनाचे मासे किरकोळ बाजारात २०० ते २५० रुपये भावाने विक्री होत आहेत. यातूनच ९ ते १० लाखांची वार्षिक उलाढाल होत आहे. या संस्थेची जबाबदारी विजया पाटेकर सांभाळतात, तर प्रकल्पाचे अध्यक्ष बाळासाहेब कोळेकर, राम आखाडे, व्यवस्थापक विठ्ठल कोळेकर, मंदार जठार, मेधा कदम, आदिवासी समाज संघटना पोलादपूर अध्यक्ष पांडुरंग वाघ, मिथुन मुकणे, पिंटू पठार यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
-----------------------------
संस्थेमार्फत विविध उपक्रम
आदिवासी, कातकरी समाजाकडे स्थावर-जंगम मालमत्ता नसल्यामुळे बँकांकडून कर्ज मिळवणे कठीण आहे. सावकारांकडून घेतलेले कर्ज परतफेडीअभावी आर्थिक परिस्थिती अधिक बिकट बनते. या पार्श्वभूमीवर श्रमजीवी संस्थेने समाजासाठी विशेष पतसंस्था स्थापन केली असून, तिच्यामार्फत आदिवासींना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होत आहे. संस्थेमार्फत प्रायोजित शैक्षणिक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवले जातात. तसेच शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागास आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.