बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवाचे मतदान, तर ९५ व्या वर्षी आजींचादेखील उत्साह
महाड, ता. ७ (बातमीदार) : आधी मतदान आणि मग शुभमंगल सावधान, असे मनाशी खूणगाठ बांधून बोहल्यावर चढण्याआधी महाड तालुक्यातील चांढवे खुर्द गावातील एका नवरदेवाने शनिवारी (ता. ७) मतदानाचा हक्क बजावला, तर दुसऱ्या ठिकाणी ९५ वर्षांच्या आजींनीदेखील उत्साहात मतदान केले.
महाड तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या पाच गटांसाठी, तर पंचायत समितीच्या नऊ गणांसाठी मतदान पार पडले. पंचायत समितीच्या एका गणासाठी यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. महाड तालुक्यात या निवडणुकांमध्ये चुरशीच्या लढती असल्याने एक-एक मत महत्त्वाचे आहे. लोकशाहीमध्ये निवडणुकीच्या मतदानाला मोठे महत्त्व आहे. सरकारकडून मतदान करण्याबाबत अनेकदा जनजागृती मोहीमदेखील राबवली जाते. याचा मोठा परिणाम आता मतदारांमध्ये दिसू लागला आहे. तरुण मतदारदेखील जागरूक राहून आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. महाड तालुक्यामधील चांढवे खुर्द येथील मतदान केंद्रांमध्ये विशाल उत्तेकर या तरुणाने एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे. लग्न मंडपात लग्नाची तयारी सुरू असतानाच विशाल उतेकर या नवरदेवाने प्रथम मतदानाचा हक्क बजावून नंतर बोहल्यावर चढण्याचे ठरविले. आधी मतदान आणि मग शुभमंगल असा निर्धार केलेल्या विशाल उतेकरने डोक्यावर सावलीसाठी चादर धरत वाजत-गाजत मिरवणूक काढली आणि आपला मतदानाचा हक्क बजावला. ग्रामस्थ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडूनदेखील विशालचे याबाबत कौतुक होत आहे.
.......
९५ वर्षांच्या आजीचे मतदान
मतदानाबाबत उदासीन असणाऱ्या आजच्या तरुणांना लोकशाही व निवडणूक यंत्रणेप्रती विश्वास देणारा संदेश प्रदान करण्यासाठी महाडजवळील लाडवली गावातील ९५ वर्षीय मनोरमा विचारे यांनी तालुक्यातील लाडवली येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उत्साहाने मतदान केले. विचारे आजी या प्रत्येक निवडणुकीमध्ये मोठ्या उत्साहाने मतदान करत असतात. तरुणांना लाजवेल असा उत्साह त्यांच्यामध्ये असतो. लोकशाहीच्या कामांमध्ये तरुणांनी मतदानाच्या माध्यमातून आपला सहभाग दिला पाहिजे, असे त्यांनी या वेळी सांगितले.
महाडमध्ये सकाळी पहिल्या सत्रामध्ये मतदारांचा उत्साह कमी प्रमाणात दिसून आला. त्यामुळे साडेनऊपर्यंत अकरा टक्के मतदान झाले होते. परंतु दुपारी दीड वाजेपर्यंत मतदानाचा आकडा ४४ टक्क्यापर्यंत पोहोचला होता.
.........
फोटो - १) नवरदेवाचे मतदान.
२) ९५ वर्षीय मनोरमा विचारे मतदान करून परतत असताना.
.........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.