मुंबई, ता. १० : महाराष्ट्रात दररोज सरासरी २५ जणांना कर्करोगामुळे आपला जीव गमवावा लागतो, अशी आकडेवारी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.
सरकारी अधिकाऱ्यांच्या मते, पुरुषांमध्ये तोंडाच्या आणि महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या व स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. तज्ज्ञांच्या मते कर्करोगाबाबत अधिक जागरुकतेची आवश्यकता आहे. निदान आणि तातडीने उपचार सर्वांत महत्त्वाचे आहेत.
राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार तीन वर्षांत कर्करोगामुळे २७,२९४ जणांना जीव गमवावा लागला. २०२०-२१ मध्ये राज्यात कर्करोगामुळे ९६८८ मृत्यू झाले. २०२१-२२ मध्ये ८७३२ मृत्यूंची नोंद झाली. २०२२-२३ मध्ये ८८७४ जणांचा आजाराने मृत्यू झाला.
एका आरोग्य अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ‘सुमारे ६० ते ७० टक्के कर्करोगाच्या रुग्णांना तोंडाचा त्रास होत आहे. शहरी आणि ग्रामीण भागात पुरुष व स्त्रियांमध्ये तो अधिक सामान्य आहे.
तंबाखूचे सेवन त्यास कारणीभूत ठरत आहे. गर्भाशयाच्या मुखाचे आणि स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण स्त्रियांमध्ये जास्त आहे.’दरम्यान, अस्वच्छ परिस्थितीमुळे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग ग्रामीण भागात अधिक आढळतो.
रुग्ण उपचारांसाठी पोहोचेपर्यंत आजाराची उशिरा ओळख होणे मृत्यूचे प्रमुख कारण आहे. सातत्याने स्क्रिनिंग गरजेचे आहे. त्याने आजार लवकर शोधण्यास आणि उपचारास मदत होते.
हेड-नेक कॅन्सर सर्जन आणि टाटा मेमोरियल सेंटरच्या सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमिओलॉजीचे डेप्युटी डायरेक्टर डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी सांगितले, की आमच्याकडे आलेले बहुतांश कर्करुग्ण प्रगत अवस्थेत असतात.
त्यामुळे ते बचावण्याची शक्यता फारच कमी असते. कर्करोग लवकरात लवकर शोधण्यावर सरकारला भर द्यावा लागेल.
तृतीय सेवा रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रतिबंधात्मक औषध विभाग प्रतिबंध आणि जनजागृतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. प्रतिबंधात्मक औषध विभाग ॲन्कोलॉजीची गरज आहे.
मौखिक आणि गर्भाशयाच्या मुखासारख्या सामान्य कर्करोगांमध्ये जागरुकता महत्त्वाची आहे. डॉक्टरांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे जेणेकरून ते कर्करोगाची लक्षणे ओळखू शकतील. लवकर निदान होईल, वेळेवर उपचार मिळतील आणि मृत्यूची संख्या कमी होईल.
तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रेत्यांवर कारवाईची गरज
सरकारने गुटखा-पान मसाल्यावर बंदी घातली असली तरी त्यांची विक्री खुलेआम सुरू आहे. सेलिब्रिटीज अशा जाहिराती करत आहेत, ज्या थांबवायला हव्यात. बंदी असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रेत्यांवर कडक कारवाई अपेक्षित आहे; अन्यथा भविष्यात त्यांची संख्या आणखी वाढेल, असे डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.