मेट्रो स्थानकाखालील अनधिकृत पार्किंग धोक्याचे
भीषण आगीचा धोका, कठोर कारवाई करण्याची गरज
बापू सुळे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : सध्या पश्चिम द्रुतगती मार्गाला समांतर असलेल्या गुंदवली-दहिसर या मेट्रो-७ उन्नत मेट्रो मार्गावरून दररोज लाखो प्रवासी गारेगार प्रवास करीत आहेत. या मेट्रो मार्गाची बहुतांश स्थानके पश्चिम द्रुतगती मार्गाला लागून असल्याने स्थानकाखाली अनधिकृतपणे बस, ट्रक, डम्पर अशी वाहने उभी केली जातात. नुकतीच देवीपाडा मेट्रो स्थानकाखाली उभ्या असलेल्या खासगी बसला अचानक लागलेल्या आगीमुळे स्थानकात धुराचे लोट उसळले होते. त्यामुळे अशा अनधिकृत पार्किंगमुळे भविष्यात आगीचा भडका उडून मेट्रो स्थानकाबरोबरच येथील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे वाहतूक पोलिस, पालिका आणि मेट्रो प्रशासन देवीपाडा स्थानकाच्या रिकाम्या बसला लागलेल्या आगीतून काही धडा घेणार का, हा प्रश्न आहे.
बोरिवली येथे पश्चिम द्रुतगती मार्गाला लागून असलेल्या देवीपाडा मेट्रो स्थानकाखाली उभ्या असलेल्या बसला अचानक आग लागल्याची घटना नुकतीच घडली. त्यामुळे मेट्रो स्थानकासह द्रुतगती मार्गावर काहीकाळ धुराचे लोट उसळले होते. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मेट्रो स्थानक आणि येथील प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे सर्रासपणे मेट्रो स्थानकाखाली असलेल्या जागेत उभारल्या जाणाऱ्या वाहनांमुळे अपघात होऊ नये, आग लागण्याच्या घटना घडू नयेत, यासाठी या वाहनांवर बंदी घालणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासनाने अशा प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी होत आहे.
सध्या शॉर्टसर्किट होऊन इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहने, गॅसवरील वाहनांना मेट्रो स्थानकाखाली उभ्या करण्यावर निर्बंध आणल्यास भविष्यातील संभाव्य आगीच्या घटना टाळणे शक्य होईल.
एमएमओसीएल म्हणते सर्व स्थानके अग्निरोधक
महामुंबई मेट्रो ऑपरेशन कार्पोरेशन लिमिटेडकडून (एमएमओसीएल) पश्चिम द्रुतगती मार्गाला समांतर असलेल्या मेट्रो-७ या मेट्रो मार्गाचे संचालन केले जाते. देवीपाडा स्थानकाखाली बसला लागलेल्या आगीबाबत विचारले असता मेट्रोची सर्व स्थानकात आग विझवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व फायरप्रूफ यंत्रणा असल्याचे स्पष्ट केले आहे.
अशी आहे यंत्रणा...
स्थानक परिसरात अग्निशमन व्यवस्था, आवश्यक उपकरणे आहेत.
- सर्व मेट्रो स्थानकांच्या जमिनीच्या पातळीवर स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा
- प्रत्येक इलेक्ट्रिक गंभीर स्वरूपाच्या खोल्यांमध्ये आणि जमिनीच्या पातळीवरील उपयुक्तता खोल्यांमध्ये पुरेशा प्रमाणात अग्निशामक उपकरणे
- सर्व स्थानकांवर धूर शोधक, आपत्कालात संपर्काची व्यवस्था, हूटर आदी अग्निशमन यंत्रणा लावली आहे.
- जमिनीच्या पातळीवर, फ्लशिंग आणि फायर पंप रूमसारख्या वेगळ्या खोल्यांमध्ये शोध यंत्रणा
- स्थानकावरील दूरसंचार उपकरणे कक्ष, यूपीएस रूम, सिग्नल आणि दूरसंचार कक्ष, इलेक्ट्रिकल पटल आणि विद्युत राेहित्र अशी महत्त्वाची ठिकाणे विशेष यंत्रणेने सुसज्ज
- प्रत्येक मेट्रो स्थानकासाठी समर्पित पाण्याच्या टाकीसह एक अग्निशमन पंप रूमची व्यवस्था.
- सर्व मेट्रो कर्मचारी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याच्या दृष्टीने प्रशिक्षित
- स्थानक परिसरात आग लागल्यास काय करावे, याबाबत मार्गदर्शक नियमावली
- एमएमएमओसीएलच्या अग्निशमन अधिकाऱ्यांकडून दर आठवड्याला स्थानकावर अग्निशमन सराव
सध्या प्रत्यक्ष आग लागून होणाऱ्या जीवितहानीच्या तुलनेत धुरामुळे गुदमरून मृत्युमुखी किंवा बाधित होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय इमारत मानक संहितेप्रमाणे प्रत्येक इमारतीचे बेसमेंट, शाॅपिंग माॅल, भुयारी मेट्रो, एलिव्हेटेड मेट्रो अशा मर्यादित आणि बंदिस्त जागेच्या ठिकाणी आगीसारखी घटना घडली तर मोठा अनर्थ घडू नये, यासाठी धूर व्यवस्थापन यंत्रणा असायला हवी. तसेच प्रवाशांचा किंवा लोकांचा जास्त वावर असलेल्या सार्वजनिक ठिकाणी ज्वलनशील किंवा आग लागेल अशा वस्तू, वाहने ठेवणे टाळायला हवे.
- एम. व्ही. देशमुख, माजी संचालक, राज्य अग्निशमन दल
पश्चिम द्रुतगती मार्गाच्या दोन्ही बाजूने वाहने पार्किंग कशी केली जातात, हाच महत्त्वाचा प्रश्न. वाहतूक पोलिस काय करतात? या वाहनांमुळे आधी वाहतूक कोंडी होत होती, आता मेट्रोच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. त्याची गंभीर दखल न घेतल्यास मोठी दुर्घटना घडू शकते.
- ॲड. गॉडफ्रे पिमेंटा, वाहतूक तज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.